गोष्टी सांगणारे मतकरी
स्मरण
काही महिन्यांपूर्वी ‘अलबत्या गलबत्या’ हे नवीन संचात आलेले नाटक बघितले. पहिला अंक सुरू झाला आणि थिएटरमधल्या बालगोपाळांनी थिएटर अक्षरशः डोक्यावर घेतले. केवळ हशा, टाळ्या नाही, तर हे बालगोपाळ रंगमंचावरील कलाकारांशी संवादही साधत होते. कलाकारांनी आपापसांत विचारलेल्या प्रश्नांना थिएटरमधून उत्तरे मिळत होती. त्यामुळे अनेकदा या कलावंतांना कसे रिॲक्ट व्हावे तेदेखील कळत नव्हते. नाटकाचा हा दृश्य परिणाम तर होताच; पण मला तो दुय्यम - दुसऱ्या स्तरावरचा वाटतो. कारण, ‘आडातच नाही, तर पोहऱ्यात कुठून येणार?’ या उक्तीप्रमाणे लिहिलेच नसेल तसे, तर रंगमंचावर ते सादर कसे होणार? बालवयातील प्रेक्षकांची ही मानसिक, भावनिक भूक त्यांनी ओळखली आणि या बालनाटकांचा जन्म झाला.. रत्नाकर मतकरी इथे मोठे ठरतात.
इतर कोणालाही नावे ठेवायची नाहीत, पण कुठलाही साहित्यप्रकार घ्या; मतकरी यांची लेखनशैलीच इतकी चित्रमय आहे, की ती दृश्ये नजरेसमोर उमटत जातात. तसेच ‘गोष्ट सांगण्याची’ त्यांची कला. त्यामुळेच वरील नाटकाच्या दृश्य परिणामाला दुसऱ्या स्तरावरचा म्हटले आहे. यात दिग्दर्शकाचे महत्त्व अजिबात कमी लेखायचे नाही, पण हे नाटक नुसते सादर केले तरी त्याला असाच प्रतिसाद मिळणार होता. याचे कारण लेखनशैली आणि या नाटकाचा लेखक हा दिग्दर्शकही आहे.
हा एक भाग झाला; पण रत्नाकर मतकरी या एका माणसाने कुठे कुठे मुशाफिरी करावी! नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक साहित्य.. एकही क्षेत्र नाही, जे त्यांनी लिहिण्यासाठी वर्ज्य मानले.. आणि लेखन तरी कसे? सकस, तात्कालिक, प्रासंगिक, मनोरंजन करणारे, खिळवून ठेवणारे, अवाक् करणारे, आजच्या काळाशी नाळ जुळलेले, दर्जेदार.. कोणताही आविर्भाव न आणता त्यांनी अगदी सहजपणे ही मुशाफिरी केली. फॉर्म कुठलाही असो, लिहायचे असे एकही क्षेत्र मतकरी यांनी वर्ज्य मानले नाही. कारण मनात येणारा प्रत्येक विचार साहित्याच्या एकाच फॉर्ममध्ये व्यक्त होऊ शकत नाही, हे त्यांना माहिती होते. त्यासाठी साहित्याची वेगवेगळी माध्यमे लागतात. त्यामुळे मतकरी यांनी आपल्या प्रत्येक विचाराला अनुसरून नाटक, बालनाट्य, एकांकिका, कथा, कादंबरी, गूढकथा.. असे साहित्याचे वेगवेगळे फॉर्म निवडले.. आणि त्यांचे लेखन अधिक विश्वसनीय, रंजक, परिणामकारक झाले. फॉर्मचा गुंता केला असता, तर हा परिणाम त्यांना कदाचित तितक्या परिणामकारकणे साधता आला असता का? शंका आहे. अर्थात असे करणारे मतकरी हे काही एकमेव लेखक नव्हेत, पण इतक्या फॉर्ममध्ये परिणामकारकपणे व्यक्त होणाऱ्या खूप कमी लेखकांपैकी ते एक आहेत, एवढे नक्की.
पण मतकरी हे काही केवळ लेखक नव्हते, तर ते रंगकर्मी होते, दिग्दर्शक होते, निर्माता होते, चित्रकारही होते. नर्मदा आंदोलनावेळी त्यांनी काढलेली चित्रमालिका खूप गाजली होती. एवढेच नव्हे, तर महाराष्ट्रात बालरंगभूमीची मुहूर्तमेढ उभारण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. त्यामुळेच मतकरी यांना कोणत्याही एकाच साहित्यप्रकाराशी जोडणे हे त्यांच्यावर अन्याय करणारे होईल.
सुरुवात ‘वेडी माणसे’ या एकांकिका लेखनाने करणारे मतकरी त्यांच्या एकांकिका-लेखनासाठीच आधी प्रसिद्ध होते. या एकांकिकांत भूमिका करून अनेक कलावंत नावारूपाला आले आहेत. मात्र, मतकरी यांनी साहित्याच्या कुठल्याही एका फॉर्मपुरते राहणे नाकारले. मग ते पूर्ण लांबीची नाटके लिहू लागले. कथा, कादंबऱ्या लिहू लागले. त्यांच्या अनेक कथानकांवर दूरचित्रवाणी मालिकाही तयार झाल्या. ‘गहिरे पाणी’, ‘अश्वमेध’, ‘बेरीज वजाबाकी’ या त्यांच्या कथांवर आधारित मालिका अजूनही अनेकांच्या स्मरणात आहेत. त्यांच्या कथेवर आधारित ‘इन्व्हेस्टमेंट’ चित्रपटाला पुरस्कारही मिळाला आहे. पण ते अधिक रमले एकांकिका-नाटकांत.. ‘लोककथा ७८’, ‘दुभंग’, ‘अश्वमेध’, ‘माझे काय चुकले’, `जावई माझा भला’, ‘घर तिघांचे हवे’, ‘खोल खोल पाणी’, ‘इंदिरा’ अशी त्यांची अनेक नाटके गाजली.
मतकरी यांच्या साहित्यावर नजर टाकताना वाटते, की त्यांनी काव्य या प्रकाराकडे दुर्लक्ष केले आहे की काय? पण पूर्णतः तसे म्हणणे चुकीचे ठरेल. त्यांनी कदाचित कविता लिहिल्या नसतील किंवा लिहिल्या असतील पण प्रकाशित केल्या नसतील. पण ‘चार दिवस प्रेमाचे’ आणि ‘जादू तेरी नजर’ अशा काही नाटकांत त्यांनी गाणी जरूर लिहिली आहेत. त्यामुळे काव्य हा प्रकार त्यांना वर्ज्य असावा असे वाटत नाही. त्यात आपण काव्य आणि गाणी यात उगाचच भेदभाव करतो.
मतकरी यांच्या प्रत्येक साहित्यप्रकाराचा चाहतावर्ग आहे. तसाच तो त्यांच्या गूढकथांनाही लाभला. माणसाला नेहमीच गूढतेचे आकर्षण वाटत आले आहे. भीती वाटत असली, त्यातले (अनेकदा) फोलपण लक्षात येत असले तरी अशा कलाकृती विशेष लक्ष वेधून घेतात. पण मतकरी यांनी केवळ वाचकांचे मनोरंजन करण्यासाठी अशा कथा लिहिल्या नाहीत किंवा त्याद्वारे अंधश्रद्धा पसरवण्याचाही त्यांचा कोणताही हेतू नव्हता. अतिशय जबाबदारीने त्यांनी साहित्याचा हा फॉर्म हाताळला. अनेकदा आजूबाजूला असे काही घडत असते, ज्याचा अर्थ सामान्य माणूस लावू शकत नाही. तर्काच्या कसोटीवर तपासून मतकरी यांनी आपले हे साहित्य लिहिले. ‘कबंध’, ‘खेकडा’, ‘गहिरे पाणी’, ‘निजधाम’, ‘निर्मनुष्य’ हे त्यांचे गूढकथासंग्रह चांगलेच गाजले. त्याआधी नारायण धारप यांच्याही गूढकथा अशाच गाजल्या होत्या.
मराठी साहित्य तात्कालिक, प्रासंगिक नसते. ‘आज’चा संदर्भ त्यात फारसा नसतो असे आरोप मराठी लेखकांवर होत असतात. मात्र काही लेखकांप्रमाणे मतकरीही काही प्रमाणात याला अपवाद होते. दिवाळी अंकांत अलीकडे प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या कथा वाचल्या तर याचा अंदाज येऊ शकेल.
मात्र, लेखनापलीकडेही रत्नाकर मतकरी खूप काही होते. ते चित्रकार असल्याचा उल्लेख तर वर आलाच आहे. त्यांच्या चित्रमय लेखनशैलीचे मूळ यात असू शकेल. मतकरी ‘ॲक्टिव्हिस्ट’ही होते, असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. कार्यकर्त्याने प्रत्येक वेळी चळवळीतच भाग घ्यायला हवा असे नाही. विविध माध्यमांतून त्या सामाजिक कार्याला मदत करणारे अनेक असतात, मतकरी तसे होते. नर्मदा बचाव आंदोलनावेळी आपल्या चित्रांतून ते असेच व्यक्त झाले होते.. आणि या चळवळीला हातभार लावला होता.
अगदी सुरुवातीला त्यांच्या बालनाट्याचा उल्लेख केला आहे. मोठ्या व्यक्तींप्रमाणे लहान मुलांचीही बौद्धिक, मानसिक, भावनिक भूक असू शकते किंबहुना असते; हे त्यांनी ओळखले होते. मुलांसाठीचे साहित्य वेगळेच असते आणि असावे, यावर ते आणि त्यांचे त्यावेळचे समविचारी ठाम होते. त्या अनुषंगाने ‘अलबत्या गलबत्या’, ‘निम्मा शिम्मा राक्षस’ वगैरे बालनाट्ये त्यांनी लिहिली आणि या नाटकांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. अगदी आजही ही नाटके जेव्हा नव्या रूपात अवतरली, तेव्हाही हा प्रतिसाद तसाच असल्याचे जाणवले. पण आताच्या मुलांच्या आवडी बदलल्या आहेत, त्यांना अशा गोष्टींपेक्षा कॉप्युटर वगैरेंमध्ये अधिक रस आहे.. असे म्हणून त्यांची ही भूक दुर्दैवाने दाबली जात आहे, असे मला तरी वाटते. याची दोन कारणे मला वाटतात, एक तर आजच्या मुलांची ही गरजच अनेकांच्या लक्षात आलेली नाही किंवा दुसरे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे, ही भूक भागवू शकेल असे सकस लेखन आज कोणी करू शकत नाही. खरे तर सजग प्रयत्न केले तर दोन्ही गोष्टी साध्य होऊ शकतात, तेवढी संवेदनशीलता मात्र हवी.
मतकरी यांनी आपल्या पत्नी प्रतिभाताई मतकरी यांच्याबरोबर जवळजवळ तीस वर्षांहून अधिक काळ बालरंगभूमी चालवण्याचा प्रयत्न केला. या दोघांचे हे योगदान खूप मोठे आहे. अर्थात हेच दोघे हे काम करत होते असे नाही; तर सुधाताई करमरकर, सुलभाताई देशपांडे, अरुण काकडे, कांचनताई सोनटक्के असे अनेकजण बालरंगभूमीसाठी काम करत होते. आज या कामाची अधिक गरज आहे.
मोठी माणसे जातात. त्यांच्याबरोबर एक पर्व संपते. पण त्यांनी निर्माण केलेले कार्य काळाच्या कसोटीवर टिकून राहते. मतकरी यांचे साहित्य - एकांकिका, नाटक, बालनाट्य, कथा, कादंबरी, गूढकथा, मालिका, चित्रपट, चित्रे... अशा विविध माध्यमांतून आजच्या पिढीपर्यंत पोचले आहे. ते बघण्याचे भाग्य त्यांना लाभले.. पुढेही हे साहित्य असेच टिकून राहील, याबद्दल शंका नाही. कारण वाचक बदलतो आहे, त्याची आवडही बदलताना दिसते आहे. त्याच्याबद्दल साचेबद्ध ठोकताळे बांधणाऱ्यांना त्याने अनेकदा आश्चर्याचे धक्के दिले आहेत. याबाबतही असे झाले तर नवल वाटायला नको.
रत्नाकर मतकरी यांचे साहित्य...
कथासंग्रह
खेकडा
निजधाम
सोनेरी मनाची परी
रंगांधळा
मध्यरात्रीचे पडघम
मृत्युंजयी
एक दिवा विझताना
ऐक... टोले पडताहेत
रंगयात्री अवचिन्ह बारा पस्तीस
इन्व्हेस्टमेंट
फँटॅस्टिक
गहिरे पाणी
संदेह
अंश
रत्नाकर मतकरींच्या निवडक गूढकथा
रत्नाकर मतकरी यांच्या श्रेष्ठ कथा भाग १, २
कादंबरी
जौळ
पानगळीचं झाड
अॅडम
काव्यसंग्रह
हे काही शब्द...
नाटके
वाऱ्यावरचा मुशाफिर
वर्तुळाचे दुसरे टोक
ब्रह्महत्या
प्रेमकहाणी
आरण्यक
अजून यौवनात मी
लोककथा ७८
चि. सौ. कां. चंपा गोवेकर
स्पर्श अमृताचा
सत्तांध
कार्टी प्रेमात पडली
घर तिघांचं हवं
जावई माझा भला
शू कुठं बोलायचं नाही
एकदा पाहावं करून
चार दिवस प्रेमाचे
जादू तेरी नजर
इंदिरा
गांधी अंतिम पर्व
अग्निदिव्य
प्रियतमा
दादाची गर्लफ्रेंड
नाट्य रूपांतरे
व्यक्ती आणि वल्ली
असा मी असा मी
अशी बायको हवी
बालनाट्ये
मधुमंजिरी
कळलाव्या कांद्याची कहाणी
गाणारी मैना
अचाटगावची अफाट मावशी
अदृश्य माणूस
राक्षसराज झिंदाबाद
इंद्राचे आसन, नारदाची शेंडी
निम्मा शिम्मा राक्षस
सावळ्या तांडेल
अलबत्या गलबत्या
ललित लेखसंग्रह
सहज
रंगत
गोंदण
सोनेरी सावल्या
सादर सप्रेम
परदेशी
वैचारिक लेखसंग्रह
कायमचे प्रश्न
रंग-रूप - रंगभूमी चिकित्सा
रस-गंध - आस्वादक समीक्षा
आत्मचरित्रात्मक
माझे रंगप्रयोग