हेरगिरीचा भाष्यकार

रवि आमले
सोमवार, 21 डिसेंबर 2020

स्मरण

हेरकथांचे दोन प्रकार असतात. एकात इअॅन फ्लेमिंगचा जेम्स बॉण्ड, रॉबर्ट लडलमचा जेसन बोर्न अशी मंडळी असतात. मोठे थरारक आणि सनसनाटी असे जग असते ते. तुफान हाणामारी, बंदुकबाजी, पाठलाग, चकचकीत गाड्या, सुंदर ललना आदींनी संपृक्त असे ते विश्व. दुसऱ्या प्रकारातही थरारकता, सनसनाटी असतेच. फसवणूक, लबाडी, क्रौर्य, धोका, हत्या असे सारे मसाल्याचे पदार्थ त्यातही असतात. पण त्या सगळ्याला असतो वास्तवाचा कचकचीत दंश. अशा कथा-कादंबरीकारांची एक तगडी फळी इंग्रजी साहित्यात आहे. टॉम क्लॅन्सी, फ्रेडरिक फोरसिथ हे त्यातलेच. यात ग्रॅहम ग्रीन यांचेही नाव सन्मानाने घ्यावे लागेल. या हेरकादंबरीकारांमधील एक अग्रमानांकित नाव म्हणजे - जॉन ल कार. 

पण हे त्यांचे खरे नाव नव्हे. ते डेव्हिड कॉर्नवेल. ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकत असताना ते ब्रिटनच्या ‘सिक्युरिटी सर्व्हिसेस’ (एमआय फाइव्ह)साठी काम करू लागले. वयाच्या २७व्या वर्षी, १९५८ मध्ये ते एमआय फाइव्हचे पूर्णवेळ एजंट बनले. त्यानंतर चार वर्षांनी त्यांची बदली झाली एमआय सिक्समध्ये. ही परदेशात हेरगिरी करणारी संस्था. हेरगिरीच्या या प्रत्यक्ष अनुभवातून त्यांच्यातील लेखक घडत गेला. गुप्तचर म्हणून काम करीत असतानाच त्यांनी आपली पहिली कादंबरी लिहिली. साल होते १९६१. कादंबरीचे नाव - कॉल फॉर द डेड. ती खऱ्या नावाने प्रसिद्ध करण्यास एमआय सिक्सने परवानगी दिली नाही. म्हणून त्यांनी टोपण नाव धारण केले. यानंतर तीन वर्षांनी त्यांची ‘द स्पाय हू केम इन फ्रॉम द कोल्ड’ कादंबरी आली. ग्रॅहम ग्रीन यांनी सर्वोत्तम हेरकथा म्हणून गौरविलेली ही कादंबरी. ती गाजली. याच काळात किम फिल्बी हा एमआय सिक्सचा वरिष्ठ अधिकारी रशियाला पळून गेला. त्याच्या फितुरीने अनेक गुप्तहेरांची गोपनीयता संपुष्टात आली आणि त्यामुळे ल कार यांनी हेरगिरी सोडून पूर्णवेळ लेखन सुरू केले. या फिल्बी प्रकरणाचा अंश आपल्याला दिसतो ‘टिंकर टेलर सोल्जर स्पाय’मध्ये.

त्यांच्या कादंबऱ्यांची संख्या, खप आदी आकडेवारीला तसा अर्थ नाही. कादंबरीकाराची महत्ता कादंबऱ्यांच्या संख्येवरून ठरवायची नसते. अनेकदा तर खप हेही त्या महत्तेचे परिमाण असत नाही. तेव्हा ल कार हे ‘खूप-खपावू’ लेखक आहेत, गेली सहा दशके त्यांनी कोट्यवधी वाचकांना रिझविले, त्यांनी २३ कादंबऱ्या लिहिल्या, त्या पलीकडे अनेक पुस्तके लिहिली, तीन चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत वगैरे माहिती तशी कमी महत्त्वाची. कादंबरीकार म्हणून त्यांचे महत्त्व दडले आहे ते या कादंबऱ्यांतून त्यांनी काय सांगितले आणि कसे सांगितले यात.

ते ज्या काळात लेखक म्हणून घडले, लिहू लागले तो काळ शीतयुद्धाचा. युद्ध हे नेहमीच युद्धाला जन्म देते याचा दाहक प्रत्यक्षानुभव घेणाऱ्या तेव्हाच्या पिढीचे ते प्रतिनिधी होते. शीत असले तरी ते युद्धच होते आणि कोणत्याही युद्धात कोणीही पूर्ण काळा वा पूर्ण पांढरा असत नाही. ल कार यांच्या कादंबऱ्यांनी त्या युद्धाचाच भाग असलेल्या हेरगिरीतील सर्व करडेपणा, सर्व भ्रष्टता नोंदविली. त्या विश्वात कोणी नायक नसतो आणि पूर्ण खलनायकही, हे त्यांनी ठोसपणे मांडले. त्यांचे जॉर्ज स्मायली हे पात्र असेच होते. बॉण्डच्या अगदी उलट. ही सर्व पात्रे व्यवस्था नावाच्या मोठ्या यंत्राची दातेरी चाके असतात आणि स्वार्थ हेच त्या व्यवस्थेचे वंगण असते ही जाणीव त्यांनी वाचकांना दिली.

त्यांच्या कादंबऱ्या त्याच काळात अडकलेल्या होत्या असे नव्हे. त्याचे पडसाद मात्र त्यात, तसेच त्यांच्या विचारांत सतत उमटत राहिले. महायुद्धाच्या आधीचा फॅसिझमचा प्रभाव आणि नंतरचे शीतयुद्ध आणि तेव्हाचा मॅकार्थिझम हे त्यांनी पाहिलेले होते. आणि म्हणूनच अवघ्या तीन वर्षांपूर्वी त्यांनी इशारा दिला होता, की जगभरात सध्या काही तरी भीषण, भयंकर घडत आहे. त्याला संदर्भ होता अमेरिकेतल्या ट्रम्पीझमचा, वाढत्या फॅसिझमचा. तीसच्या दशकातला स्पेन, जपान आणि अर्थातच जर्मनी यांचे अनेक देशांतील आजच्या परिस्थितीशी साम्य असल्याचे ते सांगत होते. गेल्या ऑक्टोबरमध्ये आलेली ‘एजंट रनिंग इन द फिल्ड’ ही त्यांची अखेरची हेरकादंबरी. ब्रेक्झिटोत्तर ब्रिटिनचे चारित्र्य रेखाटणारी ती कादंबरी तेच साम्य संतापून रेखाटते. त्यांचा तो संताप आहे सडत चाललेल्या व्यवस्थेवरचा, राजकारणावरचा, मानवी भ्रष्टतेवरचा. हाच संताप वाचकांच्या काळजापर्यंत भिडविण्याच्या कौशल्यात ल कार यांच्या कादंबऱ्यांचे यश दडले आहे. त्यांच्या कादंबऱ्या वाचून थरारून जाणे हे नेहमीच घडतेच. पण त्याच बरोबर विविध घटनांतून, पात्रांच्या मुखातून ते करत असलेले भाष्य वाचकाला विचारप्रवृत्त  करते. आणि मग त्या कादंबऱ्या मनोरंजनाच्याही पुढे निघून जातात. हेरकथांनी ही उंची देणाऱ्या, त्यांतून त्या-त्या काळाचे चरित्र मांडणाऱ्या या आपल्या युगाच्या बखरकाराचे, हेरगिरीच्या भाष्यकाराचे नुकतेच, वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले. त्यांना आदरांजली.

संबंधित बातम्या