खणखणीत 

ऋता बावडेकर
सोमवार, 11 मे 2020

स्मरण
 

तो  घोड्यावरून आला नाही, त्याने सुसाट गाडी चालवली नाही, की हेलिकॉप्टरमधून त्याने उडी मारली नाही.. असे काहीही चमत्कृतीपूर्ण त्याने केले नाही. 
ऋषी कपूर फक्त दिवाणखान्यात डोकावला आणि त्याने थेट रसिकांच्या मनातच स्थान निर्माण केले, ते आजतागायत टिकून आहे.. एवढेच कशाला पहिल्या चित्रपटात (मेरा नाम जोकर) तर तो बालकलाकार होता आणि त्याचा दुसरा (नायक म्हणून पहिला) चित्रपट नायिकाप्रधान होता - बॉबी. तरीही तो उठून दिसला. ऋषी कपूर नुसताच गाजला नाही, तर ४०-४५ वर्षे या मोहमयी हिंदी चित्रसृष्टीत टिकला. काळ बदलला तसा स्वतःमध्ये त्याने बदल केला. वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करत सतत स्वतःला सिद्ध करत राहिला.. दुसऱ्या कोणासाठी नाही, स्वतःसाठीच! 

त्याला ‘चॉकलेट हिरो’ म्हणत असले, तरी हळूहळू त्याने त्या इमेजला छेद देणाऱ्या भूमिकाही केल्या.. आणि त्यात तो शोभूनही दिसला. त्याला कुठल्याही गाजावाजाची, प्रसिद्धीची आवश्‍यकता नव्हती. अभिनय अक्षरशः त्याच्या रक्तात होता आणि ते काम त्याने चोख बजावले. बॉबी असो, खेल खेल में असो, रफू चक्कर असो, कर्ज असो, लैला मजनू असो, सरगम असो, नगिना असो, चांदनी असो, कभी कभी असो, हम किसीसे कम नही असो, दूसरा आदमी असो, एक चादर मैली सी असो, प्रेमरोग असो, कपूर अँड सन्स असो, नमस्ते लंडन असो अग्निपथ असो किंवा खोज असो.. ऋषी कपूर प्रत्येक भूमिकेत झळाळून उठला. चित्रपट सोलो हिरोचा असेल, मल्टिस्टारर असेल, विनोदी-गंभीर कसाही असेल; त्यात त्याची भूमिका सकारात्मक - नकारात्मक कुठल्याही स्वरूपाची असेल ऋषी कपूरने आपल्या कामात अजिबात कुचराई केली नाही. त्यामुळेच समोर बडे बडे ‘स्टार’ असले, तरी हा ‘अभिनेता’ टिकून राहिला; अनेकदा तर कांकणभर सरसच ठरला. कारण त्याचे नाणे खणखणीत होते. भूमिका लहान - मोठी, प्रमुख - दुय्यम असा विचार न करता त्याने आपले काम पूर्ण ‘कन्व्हिक्शन’ने केले. त्यामुळेच त्याच्या कारकिर्दीचा ताळेबंद मांडला, तर कुठल्याही इमेजमध्ये तो अडकला नाही असेच म्हणावे लागेल. खऱ्या अभिनेत्याची हीच ओळख असते, हेच कसब असते. 

आपल्या चित्रसृष्टीचे स्वरूप बघितले, तर ही चित्रसृष्टी प्रयोग करायला फारशी तयार नसते. ऋषी कपूरची जेव्हा एंट्री झाली, तेव्हा तर खूपच झापडबंद स्वरूप होते. क्वचित कुठे प्रयोग होत असतील किंवा झाले असतील. पण प्रमाण अगदी नगण्य. दिलीपकुमार ट्रॅजेडी किंग, राज कपूर सामान्य माणूस, देव आनंद रोमँटिक हिरो.. मग पहिल्या वहिल्या सुपरस्टार राजेश खन्नाचा उदय, त्यानंतर अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चनची एंट्री.. सगळे कसे चाकोरीबद्ध, एका साच्यातले! नाही म्हणायला मधेच अमोल पालेकर यांची एंट्री झाली, पण त्यांनाही ‘मध्यमवर्गीय’ या इमेजमध्ये अडकवण्यात आले. याचा अर्थ वेगळे काही घडतच नव्हते असे नाही, पण फार कमी प्रयोग होत होते.. त्यात नाही म्हटले, तरी ऋषी कपूर आणि त्याच्यासारख्या नायकांची कुचंबणा होत होती. ‘बॉबी’नंतर नीतू सिंगच्या बरोबरीने त्याने अनेक यशस्वी चित्रपट दिले. जोडी एकदम लोकप्रिय झाली. त्याबरोबरच जवळजवळ दोन अडीच डझन नायिकांनी ऋषी कपूरबरोबर रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. पण पुढे काय? 

प्रचंड अभिनयक्षमता असूनही योग्य भूमिका मिळत नसल्याने ऋषी कपूर मागे पडत होता.. आणि त्याच सुमारास श्रीदेवीबरोबरचा त्याचा ‘नगिना’ चित्रपट प्रदर्शित झाला. पुन्हा एकदा ऋषी कपूरने उसळी मारली. चित्रपट नायिकाप्रधान असूनही त्याने आपली कामगिरी चोख पार पाडली. त्यानंतर त्याला बऱ्यापैकी चित्रपट मिळत गेले. 

मात्र चेहऱ्यावरची निरागसता तशीच असली, तरी मधल्या काळात शरीरावर परिणाम दिसू लागले होते. कपूर खानदान, खाण्या-पिण्याची हौस, काम नाही.. शरीर स्थूलतेकडे झुकू लागले होते. अशात श्रीदेवी, जयाप्रदा, दिव्या भारती अशा तरुण अभिनेत्रींबरोबर काम करताना हे विजोड दिसू लागले. त्यात त्याच्या पत्नीने नीतू सिंगने शक्कल लढवली.. तिने आपल्या नवऱ्याला थंडी असो नसो, स्वेटर घालायला लावले. त्यात स्थूलता झाकली जाऊ लागली आणि तो त्याचा ‘ट्रेडमार्क’ही झाला. चांदनी बघा, दामिनी बघा किंवा दिवाना बघा.. लगेच लक्षात येईल. बाकी कसर त्याने आपल्या खणखणीत अभिनयाने भरून काढली. त्या बाबतीत त्याची बरोबरी करणारे फारसे कोणी नव्हतेच. 

सुरुवातीचे काही चित्रपट वगळता ऋषी कपूरच्या अभिनयाचा खरा कस अलीकडच्या चित्रपटांत लागला. नवीन दिग्दर्शकांनी त्याच्या क्षमतेचा चांगला वापर करून घेतला असे म्हटले तर वावगे ठरू नये. ‘१०२ नॉट आउट’, ‘मुल्क’, ‘कपूर अँड सन्स’ असे वानगीदाखल काही चित्रपट बघितले तरी त्याची खात्री पटावी. 

अलीकडेच त्याने ‘खुल्लम खुल्ला’ हे आत्मचरित्र लिहिले होते. त्याचे वाचनही त्याने काही ठिकाणी केले होते. सोशल मीडियावर तर तो प्रचंड सक्रीय होता. अनेक वाद त्याने ओढवून घेतले होते. 

हिंदी चित्रसृष्टीत या कपूर खानदानाचा पहिल्यापासून बोलबाला आहे. ऋषी कपूर तसाच होता - अभिनयकुशल, मोकळा, प्रेमळ, तापट आणि स्पष्टवक्ताही!

संबंधित बातम्या