उंदीरमामाची गाडी! 

राधिका इंगळे काकतकर 
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

रुआ आणि आरू
रुआनच्या प्रश्‍नांना आरू कशी उत्तरं देते? आणि त्यांच्यातला 'इंटरेस्टिंग' संवाद.

रुआन जोरजोरात हसत होता.. हसतच म्हणाला, 
‘WassupAaru! आज तर मला नक्की पटलंय, की Gramma has completely lost it! आज मला विचारत होती, की गणपतीबाप्पा गेले का उंदरावरून परत? मी तिला म्हणालो, की अगं तू ऑस्ट्रेलियाला राहूनसुद्धा असं कसं विचारू शकतेस? इतका मोठ्ठा गणपतीबाप्पा कसा काय बसू शकेल उंदीरमामावर? तर मला म्हणाली, ‘मला का विचारतोयस, विचार तुझ्या आरूला!’ पण खरंच आरू, ही उंदीरमामाच्या गाडीची काय स्टोरी आहे? 

आरू - Hey रुआ! बरं झालं विचारलंस या गाडीबद्दल! इंटरनेटवर याची जी गोष्ट आहे ती मी तुला सांगते. खूप मजेदार गोष्ट आहे.. 

इंद्र हा सर्व देवांचा राजा होता. एकदा इंद्रानं सर्व ऋषिमुनींची एक मोठी सभा भरवली  होती. अनेक ऋषी त्या सभेला आले होते. ऋषिमुनींच्या सभेला आपणही जावं असं क्रौंच नावाच्या एका गंधर्वाला वाटत होतं. क्रौंच गंधर्वाला आपल्या ज्ञानाचा खूप गर्व  होता. या सभेला ऋषींचं रूप घेऊन क्रौंच गंधर्वही इंद्राच्या  सभेला आला होता. 

क्रौंचाच्या शेजारीच वामदेव नावाचे ऋषी बसले होते. त्यांची दाढी खूप लांबलचक  होती. ती सारखी क्रौंचाच्या मांडीला लागत होती. क्रौंच गंधर्वानं एक दोन वेळा मांडी बदलली, पण वामदेव ऋषींची दाढी मात्र त्याच्या मांडीलाच गुदगुल्या करी. शेवटी क्रौंच  रागावला व भान न राहून त्यानं वामदेव ऋषींना लाथच मारली. इंद्रानं ते बघितलं. त्याला क्रौंच गंधर्वाचा खूप संताप आला. इंद्रानं तो गंधर्व आहे, ऋषी नाही हे ओळखलं. इंद्र क्रौंचाला म्हणाला, ‘हे मुनीवर, मी आपणाला ओळखलं नाही. आपण आपली ओळख सभेला करून द्यावी आणि आपण वामदेवांना लाथ का मारलीत तेही सांगावं..’ 

तेव्हा क्रौंच घाबरला व इंद्राला नमस्कार करून म्हणाला, ‘मी ऋषी नाही गंधर्व आहे. वामदेवांना चुकून माझी लाथ लागली.’ इंद्र रागानं म्हणाला, ‘हे गंधर्वा, तू ऋषी नसतानाही इथं आलास आणि वामदेवांना लाथ चुकून लागली असं खोटं बोललास म्हणून माझा तुला शाप आहे. तू उंदीर होशील.’ त्या भयंकर शापानं तो गंधर्व घाबरून गेला व इंद्राजवळ उःशाप मागू लागला. तेव्हा इंद्र  म्हणाला, ‘मी तुला तुझी ज्ञानाची हौस बघून उःशाप इतकाच देतो, की तुझ्या डोक्‍यावर सदैव बुद्धिमंतांचा वरदहस्त राहील.’ इंद्राचं बोलणं संपताच क्रौंच गंधर्व तिथंच हळूहळू बारीक होऊ लागला आणि बघता बघता त्याचा उंदीर झाला. तो उंदीर तेथून उड्या मारत जो पसार झाला, तो पराशर ऋषींच्या आश्रमाजवळ येऊन पडला. उंदरानं पराशर ऋषींच्या वस्तू कुरतडण्यास सुरवात केली. कधी तो आश्रमातील ऋषींच्या शिष्यांच्या दाढीला गुदगुल्या करी तर कधी त्यांच्या पायात येऊन त्यांची त्रेधातिरपीट उडवून देई. शेवटी या उंदराला पकडण्यासाठी पराशर ऋषींनी गणपतीला बोलावलं. 

गणपतीनं या खट्याळ उंदराला पकडून देण्याचं कबूल केलं. एक दिवस उंदीर पराशर ऋषींच्या आश्रमाच्या अंगणात बागडत असताना गणपतीनं फास टाकून त्याला पकडलं. फासात अडकलेला उंदीर गणपतीला म्हणाला, ‘तू मला फासात अडकवलंस यात काय तुझं मोठेपण?’ गणपती हसला आणि म्हणाला, ‘मग काय करू? तू ऋषींना त्रास देऊ  नकोस..’  तेव्हा उंदीर म्हणाला, ‘मी कुठं त्रास देतो? हे सगळे ऋषीच मला त्रास देतात. मी काही करत असलो की माझ्या मधे येतात.’ गजाननाला त्याच्या बोलण्याचं हसू आलं व तो म्हणाला, ‘बरं मग तुला काय हवं? तू हवा तो वर माग.’ तेव्हा तो गर्विष्ठ उत्तरला, ‘मला तू कसला वर देणार? तूच माग माझ्यापाशी वर.’ गणपतीला त्याच्या गर्विष्ठपणाचं हसू आलं आणि तो म्हणाला, ‘मागू वर? देशील?’ ‘हो,’ उंदीर म्हणाला. ‘बघ हं, नंतर नाही म्हणशील..’ ‘दिला..’ उंदीर छाती पुढं काढत म्हणाला. ‘आजपासून तू माझं वाहन हो,’ गणपती म्हणाला. उंदरानं एकदा गणपतीकडं बघितलं आणि तो मान हलवून म्हणाला, ‘बरं!’ तेव्हापासून उंदीर गणपतीचं वाहन झाला आहे, तो आजतागायत! 

आहे ना Interesting? आता मला सांग, Moral of the story काय? 

रुआ - गर्वाचं घर खाली! ...म्हणजे अती शहाणपणा करणाऱ्याला त्याच्यापेक्षा हुशार माणूस भेटतोच! आनाला सांगतो ही गोष्ट, म्हणजे यापुढं माझ्याशी नीट वागेल... हा हा हा!

संबंधित बातम्या