कल्पवृक्ष

प्रा. राधिका काकतकर-इंगळे
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

रुआ आणि आरू   : एंटरटेनमेंट
रुआनच्या प्रश्‍नांना आरू कशी उत्तरं देते? आणि त्यांच्यातला 'इंटरेस्टिंग' संवाद.

रुआ ः Wassup aaru आज काय amazing tender कोकोनट icecream खाल्लं मी! वेगळीच taste असते ना नारळाची? मी ग्रॅमाला सांगितलं तर ती म्हणाली कल्पवृक्षच असतो नारळाचं झाड म्हणजे. खरंय का हे आरू?

आरू ः अगदी बरोबर. नारळाचं झाड! So get some info!

नारळाच्या झाडाचा उगम नेमका कुठं झाला असावा, याबाबत एकमत नाही. मलेशिया किंवा इंडोनेशियात नारळ हा वृक्ष पहिल्यांदा आढळला. गंगेच्या त्रिभूज प्रदेशात म्हणजे सध्याच्या बांगलादेशात किंवा दक्षिण अमेरिकेत किंवा अगदी आपल्या केरळमध्येही नारळाच्या झाडाचा उगम झाला असल्याची शक्यता आहे. न्यूझीलंडमध्ये, नारळसदृष्य झाडाचे fossils सापडले आहेत आणि ते किमान दीड कोटी वर्षांपूर्वीचे आहेत. अर्थात आपण सध्या ज्या रूपात नारळ पाहतो, तसाच तो निर्माण झाला असावा याची शक्यता कमी आहे. 

नारळाच्या झाडाला ‘कल्पवृक्ष’ म्हणतात. नारळाच्या प्रत्येक भागाचा उपयोग करता येतो आणि झाडाचा कोणताही भाग वाया जात नाही. नारळापासून अनेक उपयुक्त वस्तू बनविल्या जातात. हा एक असा वृक्ष आहे ज्याचा आपण सर्वतोपरी उपयोग करून घेतो, म्हणूनच या वृक्षाला ‘कल्पवृक्ष’ म्हणतात.  

सण, समारंभ, जेवण, विस्तव सगळ्यासाठी आपल्याला एक वस्तू लागतेच ती म्हणजे नारळ. नारळ हे एक फळ आहे. झाडावर जो नारळ तयार होतो, त्याला वरती खूप covering असतं. त्याला असोला नारळ म्हणतात. तो सोलला की आपल्याला एक टणक पृष्ठभागाचं फळ दिसतं. तो सोललेला नारळ फोडला, की त्यात पाणी पण असतं आणि छान चवदार खोबरं पण असतं आणि वरच्या टणक पृष्ठभागाला करवंटी असं म्हणतात.

नारळ तयार होण्याच्या आधी म्हणजे त्याच्यात खोबरं तयार होण्यापूर्वी जो काढला जातो त्याला शहाळं म्हणतात. आजारी लोकांसाठी हे शहाळ्यातलं पाणी अतिशय उपयुक्त असतं. या नारळाच्या झाडाच्या फांद्यांचाही खूप उपयोग केला जातो. केरसुणी बनविण्यासाठी, टोपल्या करण्यासाठी. करवंटी किंवा वरचं सोडणं याचा उपयोग जळण म्हणून केला जातो. खोबरं आपण स्वयंपाकात वापरून स्वयंपाकाची लज्जत वाढवतो. तसेच मोदक, सोलकढी आणि खाण्याचे अनेक प्रकार खोबऱ्याशिवाय बनूच शकत नाहीत.

नारळाच्या पानातील मधली कठीण शीर वेगळी काढून, तिच्यापासून केरसुणी करतात. ही केरसुणी मजबूत असल्याने झाडलोटीच्या कामासाठी उपयोगी ठरतेच. केरळमध्ये तीच मशाल म्हणूनही वापरतात. ही मशाल स्थिर ठेवली तर त्यातली आग विझते आणि परत जोरात हलवली तर पेटते.

या झावळ्यांतील पाने, चटईसारखी विणून जो प्रकार करतात त्याला झापा असं म्हणतात. कोकणात त्याचा वापर छ्परासाठी आणि भिंतीसाठीही केला जातो. हे पान पावसात लवकर कुजत नाही आणि पावसाचा माराही थोपवून धरते. नारळाच्या फळाच्या वरच्या कडक आवरणापासूनही अनेक वस्तू केल्या जातात. त्याचा fuel म्हणूनही उपयोग होतो. पण याचा सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे त्यापासून कॉयर मिळवता येतो. ही प्रक्रिया अत्यंत किचकट आहे, या वरूनच मराठीत ‘काथ्याकूट’ हा शब्द आलाय. या काथ्यापासून दोर तर वळले जातातच. हे दोर अत्यंत strong असतात आणि पाण्यात लवकर कुजत नाहीत. जुन्या पद्धतीच्या होड्यांमध्ये जोडकामासाठी हेच दोर वापरले जात. अजूनही त्यांचा तसा वापर होतोच.

पण यापासून कार्पेट्स, पायपुसणी, भिंतीची आवरणे, शोभेच्या वस्तू असे अनेक प्रकार केले जातात. Mattress मध्ये पण याचा उपयोग होतो. नारळाची करवंटीदेखील वाया जात नाही. जळण म्हणून तिचा उपयोग होतोच. 

भारतातील किनारपट्टीच्या बहुतेक राज्यांमधे आणि खास करून त्या राज्यातील किनारपट्टीच्या भागात, नारळाचा रोजच्या खाद्यपदार्थात उपयोग होतो. नारळाचं खोबरं सुकवून ठेवता येतं आणि ते तुलनेनं जास्त टिकाऊ असतं. 

रुआ ः Wow! नारळाबद्दल एवढं ऐकून आता मला लाडू खावासा वाटतोय! So चाललो मी kitchen मध्ये!!! bye !!   

संबंधित बातम्या