खायचे की दाखवायचे ?

प्रा. राधिका काकतकर-इंगळे
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

रुआ आणि आरू 
रुआनच्या प्रश्‍नांना आरू कशी उत्तरं देते? आणि त्यांच्यातला 'इंटरेस्टिंग' संवाद.
प्रा. राधिका काकतकर इंगळे 

रुआ - अक्खी रात्र जागा होतो यार मी काल आरू! दात बेक्कार दुखत होता माझा. काल  रात्री आइस्क्रीम खाताना एकदम कळ आली आणि मग जो दात दुखायला लागला तो रात्रभर. आज सकाळी dentist काकानी painkiller दिली तेव्हा कुठे बरं वाटलं. #wassupaaru, दात का दुखतो? मला जरा दातांबद्दल नीट info दे ना!

आरू -Sure!

आपल्याला दुधाचे दात सहा महिन्यांच्या वयात यायला सुरू होतात. दोन अडीच वर्षात हे दात पूर्णपणे येतात. सहा-सात वर्षांपर्यंत हे टिकतात. सात ते नऊ या वर्षांमध्ये दात आले त्या क्रमाने पडायला लागतात. दुधाचे दात एकूण वीस असतात. दुधाचे दात येताना बऱ्याच बाळांना एक-दोन दिवस पोटदुखीचा त्रास होतो असे दिसते. दुधाचे दात नाजूक असतात, त्यामुळे ते लवकर किडतात. दुधाचे दात किडले असल्यास लवकर भरून घ्यावेत.

साधारण सहा वर्षे वयाच्या मुलांना नवीन- कायमचे दात यायला सुरुवात होते. सर्वात आधी दाढा यायला सुरुवात होते. या वेळी दुधाचे दात अजून असल्याने ब-याच जणांना या दाढा दुधाच्या आहेत असे वाटते. यानंतर वरच्या जबडयाचे पुढचे दात येतात. आठ- नऊ वर्षाच्या दरम्यान ही प्रक्रिया चालू होते. वयाच्या बाराव्या -सोळाव्या वर्षापर्यंत २८ दात आलेले असतात. अक्कलदाढा त्यानंतर कधीतरी येतात. पण कधी कधी अक्कलदाढा येतही नाहीत. Evolution मध्ये अक्कलदाढांची फारशी आवश्यकता राहिलेली नाही. कारण मानवाचे अन्न जास्त मऊ झालेले आहे. अक्कलदाढा जबडयाच्या कोनाशी असल्याने त्याचा फारसा फायदाही होत नाही. काही वेळा शस्त्रक्रिया करून त्या काढाव्या लागतात. अक्कलदाढा येताना दुखण्याचा त्रास होतो पण यासाठी सहसा painkiller देणे पुरते.

दाढांना ‘दळण्यासाठी’ पसरट व खडबडीत डोके असते. सुळे टोकदार आणि घुसण्यासाठी बनवलेले असतात. अन्न तोडण्या-फाडण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पुढचे दात कुऱ्हाडी प्रमाणे कडा असणारे असतात त्यामुळे अन्न ‘तोडण्याचे’ काम करता येते. खालचा आणि वरचा जबडा मिळून अडकित्त्यासारखी रचना होते. अडकित्त्याच्या कोनाकडे जास्त ताकद निर्माण होते. जबडयाचे स्नायू कसे काम करतात? जेवताना गालाला हात लावला तर हे सहज कळेल. दात आणि जबडयाचे हे काम अन्न तोडणे, फोडणे, दळणे या पध्दतीने होत राहते.

दात दुधाचे असोत की कायमचे असोत, दाताला कीड लागली की दातदुखी सुरू होते. दात किती किडला आहे यावरच त्याचे दुखणे व परिणाम अवलंबून असतात.

काही ठिकाणी पाण्यामध्ये फ्लोराईड कमी असते हे दात किडण्याचे एक कारण. गावात दात किडण्याचे प्रमाण फार असेल  

तर हे कारण असणे शक्य आहे. दातांची काळजी न घेणे हे सर्वात महत्त्वाचे कारण. दातांची निगा न राखल्यास दातांच्या फटींमध्ये अन्नकण, साखर, इत्यादी साठून सूक्ष्मजंतू वाढतात. यामुळे हळूहळू दातांचे टणक कवच ठिसूळ होते. याने कवचाची झीज होऊन दाताला खड्डे पडतात. हे खड्डे आतल्या पोकळीपर्यंत खोलवर पोहोचले तर पोकळी उघडी पडते आणि दात दुखायला लागतो.

रुआ -I will take care of my teeth henceforth Aaru! But खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे म्हणजे काय?

आरू -हा हा हा! अरे काही काही लोकं बोलतात एक आणि वागतात वेगळंच ... त्यांच्याबद्दल असं म्हटले जातं की त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहेत!

रुआ -म्हणजे same आना सारखे...मला एक सांगते आणि खाली जाऊन पर्णिकाला वेगळंच! Thank you Aaru!!

संबंधित बातम्या