स्वातंत्र्याचा अर्थ 

ऋता बावडेकर
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

सहजच...
 

काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध लेखिका मालतीबाई बेडेकर यांना भेटण्याची संधी मिळाली होती. फर्ग्युसन रस्त्याला लागूनच घर असल्याने खिडकीतून रस्त्यावरची वर्दळ त्यांना दिसायची. ती बघता बघता आमच्या गप्पा रंगत गेल्या, म्हणजे त्या बोलत होत्या आणि मी मन लावून ऐकत होते, लिहून घेत होते.. बोलता बोलता त्या म्हणाल्या, ‘आजच्या मुलींना कळत नाही. आपले स्वातंत्र्य त्या पणाला लावताहेत..’ मला काही कळले नाही, तर म्हणाल्या, ‘विचार कर.. स्वातंत्र्य मिळवायला आपल्या बायकांना शंभराहून जास्त वर्षे लागली. अपवाद वगळता, पुरुषांच्या मनाविरुद्धचाच हा निर्णय आहे ना! ते त्यांनी खूप उदार मनाने आपल्याला दिलेले आहे (असे त्यांना वाटते); कसे का असेना, आपण काही प्रमाणात का असेना स्वतंत्र तर झालो! अशावेळी हे स्वातंत्र्य जपायला नको का? या मुली जर अशाच वागत राहिल्या, तर तुम्हाला परत स्वयंपाक घरात कोंडायला पुरुष तयारच आहे..’ मी त्यांना विचारले, ‘पण बाई, मग काय मुलींनी कायम घाबरूनच राहायचे का? सतत ‘मर्यादे’तच राहायचे का? त्यांनाही मजा करायला आवडते..’ त्यावर बाई जे बोलल्या ते फार मार्मिक होते. त्या म्हणाल्या, ‘मी तसे म्हणत नाही किंवा पुरुषांची तर अजिबातच बाजू घेत नाही. पण मोकळेपणा आणि उच्छृंखलपणा यात फरक आहे. तुमचा मोकळेपणा कधी स्वैर होईल किंवा तो स्वैर ठरवला जाईल, असे म्हण हवे तर; सांगता येणार नाही. काही थोडक्‍या मुलींमुळे सगळीच स्त्री-जमात परत बंदिस्त व्हायला नको. झगडून मिळवलेल्या ‘स्वातंत्र्या’चा अर्थ समजून घ्यायला हवा. तुम्ही मोकळे वागू नका, असे मला म्हणायचे नाही.. पण त्यामुळे आपण सगळ्याच परत बंदिवान होऊ, असे वागायला माझी हरकत आहे. आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा ज्या खरोखरच चांगला उपयोग करून घेत आहेत, त्या मुली-महिलांना या काही मुली-महिलांच्या वागण्याचा फटका बसायला नको...’ 

मालतीबाईंबरोबरच्या गप्पांतील हा भाग मी कधीही विसरू शकत नाही. इतकी द्रष्टी बाई, तिने केवळ स्त्रियांच्याच नव्हे, तर पुरुषांच्याही; म्हणजेच एकूण समाजाच्याच मानसिकतेवर बोट ठेवले होते. म्हणताना त्या मुली-बायका म्हणत असल्या, तरी त्यांचा रोख ‘पुरुषी मानसिकते’वरच अधिक होता. त्यापासूनच त्या मुलींना सावध करत होत्या. त्यानंतर आजपर्यंत जेव्हा जेव्हा मुली-महिलांवर अत्याचार होतात, तेव्हा तेव्हा मला त्यांचे हे बोलणे आठवते. कारण अशा प्रत्येक अत्याचारावेळी, या घटनांना मुलीच कशा जबाबदार आहेत, हे पुन्हा पुन्हा ठसवले जाते आहे. त्यांच्यावर बंधने लादली जात आहेत. हे असेच चालत राहिले, तर मालतीबाई म्हणतात, तसे व्हायला फार वेळ लागणार नाही. 

याचा अर्थ मुलींनी सतत घाबरून राहावे, दबून राहावे, स्वतःच्या मनाप्रमाणे वागू नये, असे अजिबात नाही. मालतीबाईंनाही अर्थातच ते अभिप्रेत नव्हते. पण मोकळे वागताना त्या मोकळेपणाची जाणीव प्रत्येकीला हवी. अर्थात ती केवळ स्वतःच्या वर्तनाबाबत नाही, तर समाजातील प्रत्येक घटकाबाबत हवी. म्हणजे, केवळ कोणी एक चांगले वागून समाज सुधारणार नाही किंवा मुलींना होणारा त्रास कमी होणार नाही. त्यासाठी त्रास देणाऱ्या घटकावरही संस्कार व्हायला हवेत. मुली किंवा स्वतंत्र मुली म्हणजे पब्लिक प्रॉपर्टी नव्हेत. तर त्यांच्याबद्दल आपलीही काही जबाबदारी आहे, ही जाणीव या घटकाला त्याच्या आई, बहिणी, आत्या, मावश्‍या वगैरेंनी करून दिली पाहिजे. याचाच अर्थ ‘पुरुषी मानसिकते’त बदल घडवायला हवा. कारण ही कोणा पुरुषाविरुद्धची लढाईच नाही, तर ही त्या मानसिकतेविरुद्धची लढाई आहे. ती बदलण्यात पुरुषांचीही मदत मिळू शकते. 

तसेच, अशा काही घटना घडल्या की त्याचे खापर चित्रपटांवर फोडायला आपण अगदी तत्पर असतो. काही प्रमाणात ते खरे असेलही; पण ‘चित्रपटांसाठी असे विषय समाजातूनच मिळतात, अशा विषयांवर आम्ही भाष्य करायचेच नाही का, त्यातून समाज सुधारू शकतो’ असा त्या क्षेत्रातील मंडळींचा युक्तिवाद असतो. पण असे विषय हाताळताना खूप जबाबदारी असते, याचे भान किती जण ठेवतात, हेही बघायला हवे. 

असे विषय हाताळताना आपला प्रेक्षक किती सुजाण आहे, किती ‘तयार’ आहे, हे लेखक-दिग्दर्शकाने समजून घ्यायला हवे. आपण जे दाखवणार आहोत, त्याचे योग्य परिणाम समजून घेण्याइतका हा प्रेक्षक परिपक्व आहे का, हे बघायला हवे, असे मला वाटते. अन्यथा ज्यावर टीका करायची, जे वाईट म्हणून दाखवायचे, त्याचाच प्रभाव प्रेक्षकाच्या मनावर अधिक पडायचा. त्यामुळे अशा कलाकृती करताना फार मोठी जोखीम असते. कारण आपला समाज अजूनही तितका समजूतदार नाही. तसे नसते, तर नाटकांत, चित्रपटांत नको तिथे हशा, टाळ्या आजही आल्या नसत्या. चुकीच्या ठिकाणी प्रतिसाद मिळू लागल्याने नाना पाटेकरांना ‘पुरुष’ हे नाटक सोडावे लागले नसते. 

अर्थात, एवढे सांगून आपली जबाबदारी संपत नाही, तर वाढते. केवळ मुलींवर संस्कार करण्यापेक्षा मुलग्यांवरही ते करावेत. पुरुष म्हणून ते कोणी वेगळे नाहीत हे त्यांना सांगावे, तशी वागणूक घरांतच त्यांना मिळावी. त्यांना स्वतःच्या मनाप्रमाणे जगण्याचा जसा अधिकार आहे, तसाच अधिकार मुलींनाही आहे, हे त्यांच्या मनावर ठसवावे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, नकार पचवण्याची क्षमता-ताकद त्यांच्यात निर्माण करावी. तसे केले तरच हिंगणघाटमधील मुलीसारख्या असंख्य निष्पाप मुलींचे नाहक बळी जाणार नाहीत. 

संबंधित बातम्या