लई हवेत उडायला लागली... 

ऋता बावडेकर
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

सहजच..

ती आली तीच सुचलेले डोळे घेऊन.. नाक सूं सूं करत होतं.. गप्प गप्प होती, पण शांत नव्हती.. आत धुमसत होती.. काहीतरी बिनसलं होतं आणि काय बिनसलं होतं कारण कळत नसलं तरी कोणामुळे बिनसलंय ते उघड होतं. 

मी काहीच बोलले नाही.. तिला कामावर यायला खूपच उशीर झाला होता, मी काहीतरी बोलीन असं तिला वाटत होतं.. अशावेळी शांत राहणं योग्य असतं.. अखेर कोंडी फुटली... 

‘ताई, काय समजतात हो हे लोक स्वतःला! दिवसरात्र घरासाठी राबतेय.. कोरोना बघितला नाही, लॉकडाउन बघितलं नाही, पोरींच्या - माझ्या जिवाचा विचार केला नाही... घरात, बाहेर राबतेय... आता सगळं सुरळीत होऊ पाहतंय तर कामाचं बघ म्हटलं तर माझं चुकलं का? जेव्हा खरंच परिस्थिती नव्हती तेव्हा निमूट आख्खं घर सांभाळलं.. आता परिस्थिती निवळतेय तर यानं हातपाय हलवायला नको का? सांगितलं तर राग आला. भांडण काढलं.. ‘लई हवेत उडायला लागली का?’ म्हणाला. त्याचे आईवडीलही त्याला बोलले तर आणखीनच कावला..’ 

ती मोकळी होईपर्यंत बोलू दिलं.. 

खरंच, ही एकट्या ‘ती’ची गोष्ट नाही. ‘हि’ची गोष्ट मला कळली इतकंच.. अशा कितीतरी ‘ती’ असतील.. उच्च, मध्यम, निम्न अशा कुठल्याही स्तरातल्या.. प्रत्येकीची गोष्ट वेगळी असेल, आशय तोच.. ती राब राब राबतेय आणि तो हातपाय पसरून निवांत बसलाय.. अर्थातच अपवाद आहेत, पण अशी परिस्थिती असलेल्या स्त्रियांची संख्याही लक्षणीय आहे.. काही न करण्यासाठी अनेकांना तर कोरोना, लॉकडाउन हे निमित्त मिळालं आहे. मात्र त्याचवेळी त्यांच्यापैकीच अनेकांनी वेगवेगळे पर्यायही शोधून काढले आहेत. कोणी भाजीपाल्याची गाडी सुरू केली, कोणी दूध टाकणं सुरू केलं, कोणी वस्तू घरपोच देण्याचा व्यवसाय सुरू केला.. जेव्हा खरोखरच शक्य नव्हतं, त्या काळाबद्दल कोणाचीच तक्रार नव्हती; पण जेव्हा थोडेफार व्यवहार सुरू झाले, तेव्हा अनेकांनी काही ना काही उद्योग करण्याचा प्रयत्न केला. पण त्यातच ‘हे’ मूठभर का असेना, काही लोक होते - आहेत, जे अजूनही आरामात बसून आहेत. काम न करण्याची कारणंही त्यांच्याकडं भरपूर आहेत - ती तुम्हाला पटोत किंवा न पटोत... ते आपल्या वागण्याचं जोरदार समर्थन करतात. हे समर्थन लंगडं आहे, हे त्यांनाही कळत असतं, म्हणूनच असे अंगावर येतात. एकूण काय - गिरे तो भी... 

वर उल्लेख केल्याप्रमाणं, सगळीकडंच अशी परिस्थिती आहे असं नाही. पण बहुतांश बायकांची हीच अवस्था आहे. असं का होत असेल? आपल्या घरासाठी, घरातील आपल्या माणसांसाठी झडझडून काम करावं, पैसे कमवावेत असं यांना खरंच वाटत नसेल? तुम्ही किती कमवता, हे महत्त्वाचं नसते; आपला नवरा कमवतो, हे आजही स्त्रियांना भूषणावह वाटतं. ते योग्य आहे की नाही हा मुद्दा नाही, पण ही गोष्ट तिच्या दृष्टीनं आजही खूप महत्त्वाची आहे, एवढं नक्की. तसंच, घराला आधार मिळतोच ना.. तिची कमाई ती काय, त्यात खाणारी किमान सात-आठ तोंडं.. आणि प्रश्‍न नुसता खाण्याचा नसतो, कपडेलत्ते, शिक्षण, औषधपाणी.. असे इतर अनेक खर्च असतातच की! तरी देवाधर्माचा खर्च धरलेला नाही.. तो प्रत्येकाच्या भावनेचा मोठा प्रश्‍न असतो... तरी कोरोनामुळं पाहुणेराऊळे येण्याचं प्रमाण खूपच कमी झालं आहे, अन्यथा ‘पाहुणचार’ हा ही मोठा भाग असतो.. त्या बाईची ‘कमाई’ कुठं कुठं पुरी पडणार? एकटा पुरुष कमवत असेल आणि ते उत्पन्न पुरेसं नसेल तरी हीच परिस्थिती निर्माण होते... 

या सगळ्या खर्चात ‘स्वतःवरचा खर्च’ किंवा ‘स्वतःच्या आनंदासाठी केलेला खर्च’ गृहीतच धरलेला नाही. कधी साडी घ्यावीशी वाटते, खोटे का असेना दागिने घ्यावेसे वाटतात, थोड्या शिकलेल्या बाईला पुस्तक घ्यावंसं वाटतं.. पण या ‘चैनी’साठी पैसे कुठून आणायचे? जगण्याचा हा संघर्षच इतका कठीण झाला आहे, की असं ‘उडायला’ तिच्याकडं वेळ नाही आणि पैशांची सवडही नाही... म्हणून हा शब्द खटकतो आणि ती अस्वस्थ होते.. कोणीही होईल! 

मला आश्‍चर्य याचं वाटतं, की हे सगळं दिसत असतानाही उठून काम करावं असं या लोकांना का वाटत नाही? सांगण्याची वेळ का येते? आणि सांगितलं तर ते इतकं जिव्हारी का लागतं? पुरुषी अहंकार डिवचला जातो? काहीही न करता बरा हा अहंकार जागृत असतो! आराम करताना हा अहंकार कुठं असतो? एका व्यक्तीबरोबर बोलताना त्याला विचारलं, ‘आपण काय करता?’ तेव्हा, ‘माझी भाजीची गाडी होती.. पण खूप फिरावं लागायचं; नंतर मी ट्रक चालवायला लागलो, पण खूप प्रवास व्हायचा. त्रास व्हायला लागला.. आता मी बिल्डिंगची कॉंट्रॅक्टस घेणार आहे..’ म्हटलं, ‘त्याला नाही का फिरावं लागणार?’ तर म्हणाला, ‘पण त्यात खूप पैसा असतो..’ म्हटलं, ‘श्रमही तेवढेच असतात..’ अशी शेखचिल्ली स्वप्नं बघताना अहंकार कुठं जातो? 

निष्कर्षापर्यंत नाही, पण एका मतापर्यंत मी आले आहे, की या बऱ्याच जणांना होता होईतो काम टाळायचंच असतं. अगदी अंगाशीच येताना दिसलं, तर आक्रस्ताळेपणा करून बायकोलाच अद्वातद्वा बोलायचं.. त्यातून तिनं ऐकलं ठीक नाहीतर शेवटचं अस्त्र.. एवढं करण्यापेक्षा काम करावं, ते प्रामाणिकपणे शोधावं असं का वाटत नाही? तसं वाटेल तो बायकांच्या दृष्टीनं सुदिन!

संबंधित बातम्या