मुलांचे मित्र 

ऋता बावडेकर 
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

सहजच...

‘ए.. कोणाचा फोन रे?’.. 

आईच्या चेहऱ्यावर प्रचंड उत्सुकता होती.. 

मुलाने काहीतरी उत्तर दिले.. आणि तो जोरात हसला. संभाषणात काही गमतीशीर घडले होते.. 

‘काय रे?.. कोण काय म्हणालं?’ आईच्या हसऱ्या चेहऱ्यावरची उत्सुकता शिगेला पोचली होती. त्या संभाषणात तीच बुडून गेली होती. मुलगा काही सांगेल या अपेक्षेने बघत होती.. 

मुलाने दुर्लक्ष केले.. परत हास्याचा स्फोट झाला.. 

आता तिला धीर निघेना.. ‘काय रे एवढे हसताय?’ मुलाच्या हातातला फोन घेऊन त्या गप्पांत सामील होणे तेवढे आता तिचे बाकी होते. 

पण एव्हाना मुलाचाही धीर सुटला होता.. ‘मी नंतर बोलतो..’ असे म्हणून त्याने कॉल बंद केला आणि.. 

‘काय आहे तुझं मधे मधे?.. किती डिस्टर्ब करतेस? आमच्या गप्पांत तुला काय इंटरेस्ट?’ मुलगा कडाडला. 

मुलगा संभाषणाबाबत बोलेल या अपेक्षेने त्याच्याकडे बघणाऱ्या आईचा चेहरा खर्रकन उतरला.. आपले काय चुकले, हेच तिला कळेना.. ‘अरे मी.. अरे मी..’ करत ती आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होती.. पण मुलगा आज काहीही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत दिसत नव्हता.. 

‘तुझं दरवेळेचंच आहे.. माझे मित्र आले की त्यांच्याबरोबर तुला गप्पा मारायच्या असतात. माझे कॉल्स तुला रिसीव्ह करायचे असतात. माझ्या मित्र-मैत्रिणींबरोबर तुला बोलायचं असतं.. आई, तुला माहिती आहे, माझे मित्र हसतात मला.. टिंगल करतात माझी.. पण तुझं चालूच - तुझे मित्र ते माझेही मित्र आहेत.. असे कसे असतील? आम्ही केवढे, तू केवढी...’ 

तिचा चेहरा अगदी रडवेला झाला होता, कधीही बांध फुटेल असे वातावरण होते.. बाबा मधे पडले आणि दोघांनाही त्यांनी शांत केले. पण वातावरण धुमसतेच होते. मुलगा तणतणत वरच्या खोलीत निघून गेला. काय करावे न कळून आई सोफ्यावर बसली.. बाबा लॅपटॉपवर आपले काम करत बसले. पण प्रत्येकजण आतून हलला होता... ही कोंडी फुटायची कशी? 

००० 

टीनएज मुलगे - मुली असलेल्या बहुतेक घरांतील हे प्रातिनिधीक चित्र आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. यातील आई व मुलाची भूमिका बदलती असते.. कधी तिथे बाबा, एकत्र कुटुंब असेल तर आजी, आजोबा, काका, आत्या, मावशी असतात.. मुलाच्या जागी मुलगी असू शकते; संवाद वेगळे असू शकतात, पण प्रसंग याच पद्धतीचा... 

कोणी याला जनरेशन गॅप म्हणेल.. अर्थात, आहेही हे पिढीतील अंतर; पण फक्त तेवढेच आहे का? पूर्वी हे पिढीतील अंतर चांगले २०-२५ वर्षांचे होते म्हणे, नंतर कमी होत होत ते अनेक वर्षे १२ वर्षांवर स्थिरावले.. आता तर म्हणे अगदी १-२ वर्षांइतके कमी झाले आहे. म्हणे कशाला? आपल्यालाही ते जाणवतेच की! पाठोपाठ जन्मलेल्या भावंडांच्या विचारांत किती फरक दिसतो. पूर्वीही तो असणारच, फक्त व्यक्त होण्याचे प्रमाण कमी - किंबहुना नसेलच! आता मुले बोलायला लागली आहेत.. व्यक्त व्हायला लागली आहेत, त्यामुळे हे अंतर तीव्रतेने जाणवते आहे. 

मात्र, जनरेशन गॅपपलीकडेही काही या प्रसंगांत आहे.. विशेषतः वरील प्रसंगात! 

००० 

एकत्र कुटुंबांची कधीच विभक्त कुटुंबे झाली. आम्ही दोघे, आमचा/ची एक किंवा दोन, एवढे मर्यादित चित्र झाले. साहजिकच सगळे लक्ष या एका किंवा दोन मुलांवर (यात मुलीही येतात) केंद्रित झाले. त्यांचे खाणे-पिणे, त्यांचे कपडे, त्यांचे प्लेग्रुप्स, त्यांच्या शाळा.. नंतर त्यांचे अभ्यासक्रम, कॉलेजेस... सगळे निर्णय आईवडीलच - बऱ्याच प्रसंगांत आईच घेऊ लागली.. त्यांचे मित्रमंडळही नजरेच्या कक्षेत येऊ लागले.. आजच्या काळात त्यात काहीही चूक नाही. पण खोटे वाटेल, आपल्या मुलांचे मित्र कोण असावेत हेही बरेचदा पालक - विशेषतः आई ठरवू लागली. घर आणि नोकरी करत असेल, तर नोकरी आणि मुले यापलीकडे तिचे विश्‍वच नसते. त्यामुळे मुलांचे मित्र (मैत्रिणीही), तेच आपले मित्र अशी गल्लत तिच्याकडून होण्याची दाट शक्यता असते. 

आपल्या मुलांचे मित्र, पालकांना आपले मित्र वाटू शकतात; पण प्रत्यक्षात तसे होऊ शकत नाही. अशी मैत्री होऊ शकली तरी वयातील अंतरामुळं या नात्याला मर्यादा येतातच.. प्रत्येक पिढीचे आपले विषय, आपली भाषा, आजच्या भाषेत बोलायचे तर आपले स्लँग्ज असतात.. ते मागच्या पिढीने किती समजून घ्यायचे? किंवा मागच्या पिढीचे जबाबदारीचे ओझे नवीन पिढीने किती ओढायचे? त्यामुळे आपल्या समवयीनांबरोबर मैत्री करणे केव्हाही चांगले. मात्र समवयीनांचे आपले नियम असतात, सगळ्यांना त्याचे पालन करावे लागते, कारण इथे सगळे एकसमान असतात.. आणि तेच अनेकांना नको असते. म्हणून शिंग मोडून वासरांत शिरण्याचा प्रयत्न होतो किंवा आपल्यापेक्षा मोठ्यांत मिसळण्याचा प्रयत्न होतो. पण ती ज्याची त्याची समस्या असते, मुलांना ती कशी कळावी आणि कशी रुचावी? 

प्रत्येक नात्याच्या काही अटी, काही नियम, काही अपेक्षा असतात.. त्या समजून घेतल्या आणि मुख्य म्हणजे आपल्या वयाप्रमाणे वागले तर (एका मर्यादेत) मुलांचे मित्र होणे शक्य असते..

संबंधित बातम्या