ढवळ्या घाटाने आर्थर सीट

मिलिंद देशपांडे
सोमवार, 1 मार्च 2021

सह्यगिरी

महाबळेश्वर परिसरात जावळीच्या खोऱ्याचे एक अलौकिक सौंदर्य आहे.‘हिडिंबेच्या डोक्यामधील ऊ एक वेळ सापडेल पण जावळीच्या जंगलात घुसलेला हत्ती सापडणे मुश्कील’, हे बाबासाहेबांनी जावळीच्या जंगलाचे केलेले वर्णन खरेच यथार्थ असेच आहे. घनदाट किंवा निबीड अरण्य म्हणजे काय याची खरी प्रचिती घ्यायची असेल तर पोलादपूर तालुक्यातील ढवळे गावातून महाबळेश्वरच्या प्रसिद्ध अशा आर्थर सीट पॉइंटवर घेऊन जाणारी आणि आपल्या सहनशीलतेचा कस पाहणारी ही वाट एकदा पायाखालून तुडवायलाच हवी. 

महाबळेश्वर हे तर पर्यटकांचे नंदनवनच आहे. सदाहरित जंगल असलेले हे थंड हवेचे ठिकाण बघायला जगभरातून पर्यटक इथे वर्षभर येत असतात. महाबळेश्वरच्या विविध पॉइंट वरून दिसणारे कोकणाचे भव्य रूप डोळ्यात साठविण्यासाठी पर्यटकांची बारा महिने धडपड चालू असते. कारण तीनही ऋतूत याची मजा वेगळीच असते. महाबळेश्वरचा सर्वांत गाजलेला पॉइंट म्हणजे आर्थर सीट. यालाच क्वीन ऑफ पॉइंट्स असे म्हटले जाते ते खरेच आहे. याच्या माथ्यावरून दिसणाऱ्या सह्याद्रीच्या धारा, सावित्रीचे पात्र आणि विविधरंगी छटा याला तोडच नाही. वरून झेप घ्यावी ती पाण्याच्या झोतानेच आणि खालून वर यावे ते फक्त बेफाम वाऱ्याने, असा हा पॉइंट ट्रेकर्सच्या नजरेतून कसा सुटणार? लाखो पर्यटक याच्या माथ्यावरून हे नयन मनोहारी दृश्य आ वासून बघतात. पण आमच्यासारख्या भटक्यांना मात्र नेमके उलटे करण्यातच विशेष आनंद होतो... आणि ते म्हणजे कोकणातील खोलवर दिसणाऱ्या पोलादपूर तालुक्यातील ढवळे गावातून पूर्ण जावळीचे जंगल तुडवत किमान सात ते आठ तासांची आणि उभ्या चढणीची चाल करत याच्या माथ्यावर प्रकट व्हायचे! 

हाच तो पूर्वीपासून वापरात असलेला ढवळे घाट. पुण्याहून निघून ताम्हिणी घाटमार्गे महाड, पोलादपूर, उमरठ या तानाजी मालुसरे यांचे समाधी स्थळ असलेल्या गावातून पुढे ढवळे या आर्थर सीटच्या अगदी तळात वसलेल्या गावात जाणे किंवा पुणे, महाबळेश्वर, आंबेनळी घाट उतरून कापड फाटा मार्गे ढवळे गावात जाणे, असे दोनही मार्ग सुकर आणि चांगलेच आहेत. उमरठ गावी जाऊन तानाजी मालुसरे यांचा पूर्णाकृती पुतळा आणि समाधीचे दर्शन घेऊन आणि त्यांच्या अजोड कामगिरीसमोर नतमस्तक होत पुढे पाच किलोमीटरवर असलेल्या ढवळे गावात आपण पोहोचू शकतो. या रस्त्यावर पावसाळ्यानंतर दोन महिने अतिशय सुंदर असा मोरझोत नावाचा धबधबा अगदी बेफामपणे वाहत असतो. खूप पूर्वी हा परिसर पिंजून काढताना आमच्या वाटाड्याने इथे तानाजी मालुसरे महाराज आंघोळ करायचे असे सांगून, ‘म्या नाही पाहिलं पण लोक म्हंत्यात,’ असे म्हटल्यावर मात्र त्याच्या भाबडेपणावर आम्ही जाम खूश झालो होतो. पुण्याहून किंवा मुंबईहून निघून आर्थर सीटच्या पोटात आणि ढवळी नदीच्या काठावर वसलेल्या या कोकणी गावात विठोबा मोरे या जबरदस्त वाटाड्याच्या घरी मुक्कामी पोहोचायचे. पूर्वीचा अत्यंत निष्णात शिकारी आणि गावचा माजी सरपंच, तसेच जावळीच्या खोऱ्याची खडानखडा माहिती असलेला हा तरबेज माणूस माझा एकदम घट्ट मित्र. मी याच्या साथीने हा ट्रेक १९८५ साली प्रथम केला आणि या माणसाच्या तसेच जावळीच्या या वनवाटेच्या अक्षरशः प्रेमातच पडलो. आजही आमची मैत्री तशीच टिकून आहे. 

विठोबाकडचा आग्रही आणि भरपेट पाहुणचार घेऊन भल्या पहाटे निघायचे, ते थेट कोकणातून देशावर असलेल्या आणि १४७० मीटर उंचीवर दिमाखात उभ्या असणाऱ्या आर्थर सीट ऊर्फ मढी महालच्या माथ्यावर जाण्यासाठी. सकाळी साडेपाच ते सहा या सुमारास जर गावातून निघालो नाही तर शेवटच्या टप्प्यात उन्हाने आपली फारच दमछाक होते आणि पर्यायाने आपल्याला हा ट्रेक करून आर्थर सीटवर पोहोचायला उशीर होतो. गावातून निघून सुमारे एक ते दीड तासाची चाल करत, वाटेतील महादेव कोळी वस्ती (कोळीवाडा) ओलांडेपर्यंत डाव्या हाताला ढवळी नदीचे खोरे आणि उजव्या हाताला वर उठावलेला चंद्रगड आपली साथ करत असतो. ही चाल सपाटीची आणि फारशी झाडी नसलेली अशी आहे, पण हे अंतर संपताक्षणीच आपण एकदम गर्द झाडीत प्रवेश करतो आणि इथूनच चढाईला सुरुवात होते, ते अगदी आपले पाय आर्थर सीट पॉइंटवर पडेपर्यंत आपण फक्त आणि फक्त चढाईच करत असतो. जंगलात घुसले की अगदी दुपारी बारा वाजतादेखील सूर्यकिरण खाली पोहोचू शकत नाहीत इतके निबीड अरण्य येथे आहे. पुढच्या तासभराच्या चालीनंतर आपले पाय जड झालेले असतात आणि घशाला कोरड पडलेली असते. तेवढ्यात समोर दिसतो तो एक ओढ्यावरचा पाण्याच्या ओहोळाचा खडकाळ भाग, यालाच स्थानिक लोक गाढव खडक असे म्हणतात. पायाला थोडा विराम देत आणि पाण्याचे घोट पोटात ढकलत थोड्या वेळाची विश्रांती घेऊन आपण पुढच्या टप्प्याकडे वळतो. इथून पुढे कधी ओहोळातून तर कधी धारेवरून पण कायमच जंगलाच्या छत्रछायेतून तीव्र चढणीचा आपला प्रवास चालू होतो. आडवा गवंड किंवा साफळ्याच्या खिंडीपर्यंत. कधी सॅकचे वजन पेलत उभ्यानेच आणि कधी बसून विश्रांती घेत मजल दर मजल करत आपण एका आडव्या वाटेच्या (ट्रॅव्हर्स) जवळ पोहोचतो आणि समोरचा उभा कातळ पाहून असे वाटते की चला एकदाचा संपला हा चढ! पण तो निव्वळ गैरसमज असतो. 

इतकावेळ जंगलाच्या कवेत असल्यामुळे आणि आपण नक्की कुठे चाललोय याचा ठाव लागत नसल्याने आपण थोडेसे हैराण झालेले असतो. पण पाणवठ्यावरून मात्र मागे वळून बघितल्यावर खूप खाली असलेला चंद्रगड आणि आडव्या गवंडाचा आकाशात उठावलेला डोंगर आपले लक्ष वेधून घेतो तेव्हा कुठे बरे वाटते. थकलेले शरीर पूर्ण गार व्हायच्या आत आता पुढे मार्गक्रमण करणे क्रमप्राप्त असते. थोडावेळ आडव्या वाटेने चालत आणि खाली जावळीचे पसरलेले हिरवेकंच खोरे बघत आपण चिलीमखड्याला (वाटेवरील तोल सांभाळत दरीवर उभा असलेला एक भला मोठा प्रस्तर) वळसा घालत बहिरीच्या घुमटीकडे आपले पाय वळवतो. बहिरीची घुमटी असलेल्या छोट्या खिंडीकडे जाताना वाटेतील चढावर काही खडकातील जुन्या पायऱ्यांचे अवशेष बघून हा घाट प्राचीन काळापासून वापरला जातोय याची प्रचिती येते. बहिरीच्या घुमटीवर मात्र सर्वजण अक्षरशः पाय ताणून विश्रांती घेतात कारण शरीर आता थकलेले असते, पण तेथून दिसणारा जोर गावाकडचा मार्ग, खूप खोलवर दिसणारा चंद्रगड आणि त्याच्याही पलीकडे असलेले ढवळे गाव आपल्याला तेथेच खिळवून ठेवते. चोहोबाजूला नजर फिरवल्यावर प्रतापगड, मकरंदगड, रायरेश्वर, कोळेश्वर, मंगळगड इत्यादी सह्याद्रीच्या रांगा आणि त्यांचा पसारा बघून शरीराचा थकवा पळून जातो. भरपूर पाणी पिऊन आणि पोटातील भुकेला शांत करून आता शेवटचा टप्पा गाठायचा असतो तो बांबूच्या जंगलातून. 

इथून पुढे मढी महाल म्हणजेच आर्थर सीटचा कडा उजव्या बाजूला ठेवत अरुंद आणि थोड्याशा निसरड्या वाटेने चालू लागतो. दूरवर दिसणाऱ्या आर्थर सीट आणि त्याच्यावर उभ्या असलेल्या पर्यटकांकडे पाहून आपल्या पायात आणि मनात नवचैतन्य निर्माण होते आणि आपसूकच आपला हात शाब्बासकीसाठी आपल्या आणि आपल्या डोंगर मित्रांच्या पाठीवर नकळत पडतो. खरेच काहीतरी जगावेगळे केल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटलेला असतो. शेवटची एक दमवणारी चढण चढून आपण निसर्गाने निर्माण केलेल्या खिडकीपाशी पोहोचतो, तोच हा ‘विंडो पॉइंट’. पर्यटक हा वरूनच न्याहाळतात, पण आपली तेथील उपस्थिती बघून त्यांची बोटे तोंडातच जातात. या खिडकी जवळून आपण शेजारी असलेला सोप्या श्रेणीचा आणि फक्त पंधरा फुटांचा खडकाचा टप्पा पार करून शेवटच्या सोप्या वाटेने काही क्षणातच आपल्या ध्येयापाशी म्हणजेच आर्थर सीटच्या माथ्यावर पोहोचतो. अनेक पर्यटक मोठ्या कुतूहलाने आपली चौकशी करतात, किंबहुना मुलाखतच घेतात म्हणा ना. त्यापुढे जाऊन तुम्ही फारच डेंजर आणि वेडे आहात असे म्हणत आपल्यासह छान फोटोही काढतात. त्यावेळी मनात निर्माण झालेली भावना शब्दांत मांडणे फारच कठीण. 

आत्तापर्यंत ६१ वेळा मी या मार्गाने आलेलो. विठोबा म्हणतो की याला रात्री बारा वाजतादेखील ढवळ्या गावात सोडा, तो न चुकता आर्थर सीटवर येणारच! असे असले तरीसुद्धा माथ्यावरून खालच्या दरीत डोकावून बघताना माझेही डोळे मोठे होतात आणि मनात प्रश्न निर्माण होतो की खरेच आपण या मार्गाने वर आलो... आणि मग भानावर येत म्हणावेसे वाटते, हो ते आम्हीच दुर्ग वेडे आणि भटके! अनेक जण चंद्रगड आणि ढवळ्या घाट एका दिवसात करायचा प्रयत्न करतात, पण माझा असा अनुभवी सल्ला आहे की एक दिवस चंद्रगड दर्शन करून ढवळ्यात मुक्काम करावा. दुसऱ्या दिवशी ढवळे घाटाने आर्थर सीटवर चढाई करावी हे जास्त योग्य आणि झेपण्यासारखे आहे. उन्हाळ्यात तर या बाजूला फिरकूदेखील नये. स्थानिक वाटाड्या घेतल्याशिवाय चुकूनही हा घाट चढायचा प्रयत्न केल्यास हमखास चकवा लागलाच म्हणून समजा. शहाणपणा किंवा फाजील आत्मविश्वास आपल्या अंगाशी येईल यात शंका नाही. तानाजी महाराजांचे कर्मस्थळ, मोरझोतचा धबधबा, चंद्रगडाचे मनोहारी दर्शन महादेवाचा मुऱ्हा हे पाहत आणि रायरेश्वर, कोळेश्वर पठार मनात साठवत आणि आर्थर सीटच्या माथ्यावरील सोबती असलेले माल्कम पॉइंट, मंकी पॉइंट, वाघाचे पाणी किंवा गायत्री टाके, हंटर पॉइंट अशी भारदस्त भटकंती करण्यासाठी आणि विठोबाच्या घरचे प्रेमळ आदरातिथ्य अनुभवायचे असेल, तर पावसाळ्यानंतर हा दर्जेदार ट्रेक भटक्यांनी करायलाच हवा.

संबंधित बातम्या