चौल्हेर-रतनगड

मिलिंद देशपांडे
मंगळवार, 27 एप्रिल 2021

सह्यगिरी

बागलाणच्या रांगेवरील एक मोठी दुर्गयात्रा करत आम्ही चौल्हेर ते मांगी-तुंगी हा प्रवास केला. मागील दोन पुष्पात आपण साल्हेर-सालोटा मुल्हेर मोरा आणि हरगड हे पायाखालून घातले. साल्हेर-सालोटाच्या प्रथम लेखात मी अगदी पहिला किल्ला म्हणून चौल्हेरच्या किल्ल्याचा ओझरता उल्लेख केला होता. आज या लेखात आपण चौल्हेर आणि रतनगड ऊर्फ न्हावी किल्ला यांची यात्रा करूया. 

खरेतर या रांगेची सुरुवातच चौल्हेर या किल्ल्यापासून होते. पुण्याहून नाशिक-सटाणा-ताहराबाद-तिळवण आणि पायथ्याशी असलेल्या वाडी चौल्हेरमध्ये आम्ही सकाळीच पोहोचलो होतो. गावामध्ये वाटाड्याची चौकशी केली असता एक वयस्कर सद्‍गृहस्थ लगेचच तयार झाले. पाण्याच्या बाटल्या, थोडेसे तहान आणि भूक लाडू इतकेच जुजबी सामान घेऊन आम्ही गडाकडे प्रस्थान ठेवले. गावातून हा किल्ला बऱ्यापैकी पसरलेला आणि उंच दिसतो. गाव सोडताच एक डोंगराचा दांडा सरळ किल्ल्याकडे वरपर्यंत जातो. वाटही सोपी आणि सरळसोट; पण हा संपूर्ण रस्ता मात्र उजाड आहे. काही ठिकाणी वनखात्याने खड्डे खणून वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलेला बघून खूप बरे वाटले. काही काळातच येथे वनछाया निर्माण होईल आणि गडभ्रमंती सुखकर होईल या जाणिवेने मनाला बरे वाटले. या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या तिळवण या गावामुळे तिळवणचा किल्ला किंवा चौरगड असेही संबोधले जाते. ३,७०० फूट उंची असलेला हा किल्ला चढायला साधारण दीड ते दोन तास अवधी पुरेसा आहे. 

मजल दर मजल करीत दीड तासातच आम्ही गडाच्या अगदी प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो. तेथील कातळटप्प्याचा उपयोग करत घडविलेल्या पायऱ्या चढून, आम्ही अगदी पहिल्या दरवाजापाशी पोहोचलो. या दरवाजाची उत्तम स्थिती तसेच तो ज्या ठिकाणी निर्माण केला आहे ते बघून आणि त्यावेळेच्या स्थापत्यकलेचा हा उत्तम नमुना बघून अक्षरशः अवाक झालो. या निर्मात्यांना खरेच शतशः प्रणाम करायलाच हवेत. या दरवाजात थांबून थोडासा विसावा घेणे गरजेचे होते आणि आठवणींसाठी फोटोदेखील. तिथून गडाच्या माचीवर कूच करीत असताना एकामागोमाग एक असे तीन दरवाजे लागले आणि हे पार करूनच आम्ही गडाच्या छोट्या माचीवर प्रकटलो. दरवाजानंतर डाव्या हाताला दिसणारी ही पसरट जागा म्हणजेच चौल्हेरची माची होय. या माचीवरून किल्ल्याचा उठवलेला उर्वरित भाग दिसतो, तो म्हणजे बालेकिल्ला आणि यावर जायला उजवीकडून मार्ग आहे. हा मार्ग पायऱ्‍यांचा आहे आणि वाटेत पाण्याची टाकीदेखील आहेत. माचीवर एका छोट्या पत्र्याच्या शेडमध्ये चौरंगनाथ आणि हनुमानाच्या मूर्ती आहेत. गडाच्या सर्वोच्च भागावरदेखील पाण्याच्या टाक्यांची सोय उपलब्ध आहे. ‘मोती’, ‘शेवाळे’, ‘हत्यारे’, ‘खेकड्या’ ही तेथील टाक्यांची नावे, असे आमच्या डोंगरभाऊंनी सांगताच, कोणी आणि का ठेवली असतील ही नावे असा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे. पण या दुर्लक्षित किल्ल्यांवर जास्त भटकंती होत नाही आणि इतिहासाला तेथील घटनांची फारशी माहिती नसल्याने, किंबहुना पर्यटकांची पावले या किल्ल्यांकडे फारशी वळत नसल्याने आजमितीस हे किल्ले स्वतःकडेच बघत आणि बोलत एकाकी पडले आहेत. पण आमच्यासारखे भटके जेव्हा यांचे अद्‍भुत सौंदर्य अनुभवायला जातात, तेव्हा मात्र या किल्ल्यांना काही काळ तरी समाधान वाटत असेल अशी भाबडी कल्पना माझ्या मनात येऊन गेली. 

किल्ल्याच्या माथ्यावरून म्हणजेच बालेकिल्ल्यावरून सात माळ रांगेतील आणि आपण फिरलेल्या सेलबारी-डोलबारी रांगेचे आणि त्यावर पदभ्रमिकांची वाट पाहत असलेले भरभक्कम दुर्ग फारच मनोहारी दिसतात. गिरणा, पुनंद आणि आरम या नद्यांच्या खोऱ्यावर डौलदारपणे उभा असलेल्या, पण रांगेपासून थोडा बाजूला असलेल्या या किल्ल्यावर राहायची सोय नाही. मोती टाक्यातील पाणी फक्त पिण्याजोगे असल्याने, सकाळी लवकर जाऊन दुपारपर्यंत परतणे आणि पुढील किल्ल्याच्या जवळ मुक्कामी जाणे हेच योग्य ठरेल. या रांगेतील थोडा वेगळा, पण त्याच्या आकाराच्या आणि पसाऱ्याच्या साधर्म्यामुळे साल्हेरचा जुळा भाऊ दिसणाऱ्या किंवा वाटणाऱ्या या किल्ल्यावर जाऊन सेलबारी-डोलबारी रांगेची मुहूर्तमेढ करायला काहीच हरकत नाही. 

 चौल्हेरच्या भारदस्त सुरुवातीने खूश होत आम्ही पुढील चार दिवस साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरा आणि हर गडची भन्नाट भटकंती करत, जैन धर्मीयांचे तीर्थक्षेत्र असलेल्या मांगी-तुंगी या शिखरांच्या परिसरात पोहोचलो. आता शेवटचे दर्शन घ्यायचे होते ते म्हणजे रतनगड ऊर्फ न्हावी किल्ल्याचे आणि मग खूप काही बाकी ठेवून पण वेगळे आणि अपरिचित हाती गवसल्याच्या आनंदात नाइलाजास्तव पुण्याकडे परतणार होतो. अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यानात भटकताना बऱ्याच पर्यटकांचा फक्त वाघ दिसला पाहिजे हाच हेतू असतो. तसेच बहुतांश ट्रेकर्सदेखील ज्यांचे नाव झालेले आहे असे मुख्य आणि परिचित किल्लेच बघतात. ज्यांना सातत्याने नावीन्याचा शोध घ्यायची इच्छा असते, असे ट्रेकर्स थोडे आडबाजूचे किल्ले पाहतात. 

असो, १२५३ मीटर म्हणजे ४०५० फूट उंचीचा रतनगड हा किल्ला अगदी मांगी-तुंगी शिखरांचा सखासोबती म्हणून उभा आहे. मांगी-तुंगी शिखरांच्या पायथ्याशी असलेल्या भिलवाड या गावापासून वडाखेलमार्गे किल्ल्याच्या अगदी पायथ्याशी असलेल्या पाताळ वाडी या गावापर्यंत आता बऱ्यापैकी चांगला रस्ता झाला आहे. मांगी-तुंगीचे दूरदर्शन घेत आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो तेव्हा नऊ वाजून गेले होते. हे गाव कसले, अगदी छोटीशी आदिवासी वस्ती होती. योग्य जागा बघून गाडी पार्क करून आम्ही बाहेर पडलो, तर एक नऊ दहा वर्षांची गोजिरवाणी मुलगी कडेवर तिचे छोटेसे भावंड घेऊन आमच्याकडे कुतूहलाने बघत होती. मी तिला, ‘बाळा कोणी घरात आहे का आणि थोडं पाणी मिळेल का?’ असा आवाज दिल्यावर तिची आई घराबाहेर आली आणि लगेचच तिने पाण्याचा हंडादेखील आणला. किती प्रेम आणि माया असते या लोकांकडे... बोलण्याअंती कळले की त्यांना पाणी खूपच दूरवरून आणावे लागत होते. आमच्याकडील बाटल्या भरलेल्या असल्याने, आम्ही फक्त घसा ओला केला. त्या गृहिणीला कोणी गडावर येईल का वाट दाखवायला असा सवाल करताक्षणीच ती बारकुडी मुलगी एका पायावर तयार झाली. आम्ही सगळ्यांनीच एकमेकांकडे जरा साशंक नजरेने पाहिले, पण तिच्या आईने सांगितले की धनी बाहेर गेलेत आणि मला काम असल्याने हीच येईल तुमच्या बरोबर. मग काय पूर्ण विश्वासाने तिला नेतृत्व बहाल करून आम्ही तिच्या मागे चालायला सुरुवात केली. अंगात फ्रॉक, पायात स्लीपर घालून ती गिरिकन्या ताड-ताड पुढे चालत होती. तिचा हा वेश आणि चाल बघून आपले किती नखरे आहेत ट्रेकला जाण्यासाठी म्हणून स्वतःचेच हसू आले. 

किल्ल्याचा एक दांडा अगदी माथ्यापर्यंत गेलेला, वाटेवरून सहज नजरेत भरतो. त्याचा सुळका आणि अंतिम टप्प्यातील बुरुजदेखील, खालूनच आपले लक्ष वेधून घेतो. साधारणतः तासाभरातच आपण या दांड्यावरून एका सपाट जागी येतो, अगदी बुरुजाच्या खाली. येथूनदेखील पूर्वी पायरी मार्ग असावा अशा काही खुणा तिथे दिसतात. या सपाटीवरच गडदेवता सप्तशृंगीचे एक ठाणे आहे आणि या देवाच्या शेजारी पाण्याची सुकून बुजलेली काही टाकी आहेत. येथूनच बुरुजाच्या बरोबर खाली एक वाट डावीकडे वळते. इथपर्यंत आल्यावर या वाटेवर छानशी पाण्याची टाकी आहेत आणि त्यातले पाणी पिण्याजोगेही आहे. यापैकी एक खांबटाके आहे. तिथे पोहोचल्यावर मात्र या छोटुकलीने, ‘मी इथेच थांबते तुम्ही या वर जाऊन, कारण पुढे मला भ्या वाटते,’ असे सांगितल्यावर मात्र आम्ही जर चाचपलो. पण तेवढ्यात पलीकडच्या झाडीतून गावातील काही लहान मुले आमच्यापाशी येऊन धडकली आणि ते पण गडावर चाललेत हे ऐकून आम्ही सुटकेचा निःश्वास टाकला. 

मुलांच्या मागोमाग आम्हीदेखील आता गडाच्या अवघड अशा पायरी मार्गावर भिडलो. या पायऱ्या थोड्याशा नागमोडी पद्धतीने सुळक्याच्या पोटापर्यंत घेऊन जातात. साधारण सत्तर अंश कोनातील या पायऱ्या व त्यावरील पसरलेला मुरूम यामुळे जरा जपूनच जावे लागते आणि उतरताना तर चांगलीच सावधगिरी बाळगावी लागते. पायऱ्या चढून वर पोहोचल्यावर एका फुटक्या तटबंदीतून आपण उजवीकडे जाणाऱ्या आडव्या वाटेवर वळतो. तेथे असलेल्या सुंदर पाण्याच्या टाक्यामुळे आपल्याला सुखद धक्का बसतो. ही वाट संपताक्षणीच आपण अंतिम टप्प्यावर पोहोचतो. हा मार्ग फुटलेला असल्याने आणि निसरडा असल्याने, मी प्रथम वर जाऊन माथ्यापर्यंत रोप फिक्स करून ठेवला होता. जेणेकरून इतरांना वर येण्यास आणि उतरण्यास याचा उपयोग होईल. या किल्ल्यांवर जाणाऱ्या गिरिमित्रांना मी नक्कीच सांगेन की बरोबर किमान साठ-सत्तर फुटांचा रोप असणे आवश्यक आहे. सुरक्षा प्रथम हाच गिर्यारोहणाचा मूलमंत्र आहे. 

गडाच्या माथ्यावर प्रवेश करताना दरवाजा असा नाहीच आणि माथ्यावर फारसा परिसरही नाही, पण दोन प्रचंड मोठी पाण्याची टाकी आपले लक्ष वेधून घेतात. काही उद्‍ध्वस्त इमारतींचे अवशेषदेखील बघायला मिळतात. इथून पुढे मात्र एक अवघड सुळका आहे. तो गडाचा सर्वोच्च माथा असला तरी त्यावर कृत्रिम पद्धतीने गिर्यारोहण केल्याशिवाय पोहोचतादेखील येणार नसल्याने, आपण परतीचा मार्ग धरलेला बरा. गडावरून तांबोळ्यापासून मांगी-तुंगीपर्यंत आणि आपण आधीच्या लेखात पाहिलेल्या सर्व दुर्गांची माळ फारच सुंदर दिसते. आलेल्या वाटेने रोपचा आधार घेत आम्ही पुन्हा ती गिरिकन्या थांबली होती त्या ठिकाणी पोहोचलो. तिच्यासकट सगळ्यांनी पोटपूजा उरकली आणि आम्ही तिच्यापाठोपाठ पुन्हा गावाकडे निघालो. गावात पोहोचताच तिला योग्य ते पैसे आणि खूप खाऊ देऊन आम्ही आमच्या पुढच्या, म्हणजेच अगदी जवळ असलेल्या मांगी-तुंगी शिखरांचे दर्शन घेण्यासाठी निघालो. फारशी गर्दी नसल्याने पण अवेळी आलेल्या पावसाने, आम्ही अक्षरशः धावत पळतच मांगी-तुंगीचे दर्शन घेतले. पायथ्याशी असलेल्या भिलवड या गावी शेवटचा मुक्काम करून, एका सुफळ यात्रेचा आनंद घेत दुसऱ्या दिवशी स्वगृहाकडे निघालो..

संबंधित बातम्या