आडवाटेवरचा दुर्गभांडार

मिलिंद देशपांडे
सोमवार, 24 मे 2021

सह्यगिरी

नाशिकच्या पश्चिमेला आणि इगतपुरीच्या उत्तरेला पसरलेली त्र्यंबक रांग जरा हटकेच आहे. नाशिक पासून अगदी जवळच म्हणजे तीस किलोमीटर अंतरावर असलेले त्रंबकेश्वर उभ्या महाराष्ट्रालाच काय, तर देशाविदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेले ठिकाण. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले आणि भक्तगणांच्या श्रद्धेने ओसंडून वाहत असलेले हे ठिकाण तसे बारामाही गर्दीचे. या ऐतिहासिक ठिकाणाला भेट देण्याचा योग दोन-तीन वेळा आलेला, पण मंदिराच्या ऐन माथ्यावरील रांगेत वसलेल्या ब्रह्मगिरी पर्वत म्हणजेच त्र्यंबक गडावर जायचा योग खूप उशिरा आला. 

प्राचीन काळी गुजरातमध्ये जाणारा व्यापारी मार्ग त्रंबकेश्वरवरून जात असल्याने या संपूर्ण पट्ट्याचा वापर अगदी सातवाहन काळापासून चालूच आहे. या मार्गावर नजर ठेवण्यासाठी निर्माण झालेला किल्ला म्हणजेच ब्रह्मगिरी किंवा त्र्यंबकगड आणि याला अगदी खेटूनच उभा असलेला एक रांगडा दुर्ग म्हणजेच दुर्गभांडार. खरेतर हा जोड किल्ला किंवा उपदुर्गच आहे ब्रह्मगिरीचा. ब्रह्मगिरीवर अनेक भक्तगणांची आणि आमच्यासारख्या वेगळी वाट चोखाळणाऱ्या भटक्यांची वर्दळ कायमच बघायला मिळते, पण याच माथ्यावरून थोडी वाट वाकडी करून हे कातळशिल्प किंवा दुर्ग निर्मितीचा अद्‍भुत नमुना पाहायला फारसे कोणी इकडे फिरकत नाहीत; गेले तर ते आडवाटेवरचा महाराष्ट्र पाहणारे ट्रेकरच असतात. 

एकांडा शिलेदार म्हणून बाजूला असलेल्या या दुर्गावर जायला मात्र प्रथम ब्रह्मगिरीच्या माथ्यावर पोहोचायलाच लागते. त्र्यंबकेश्वर मंदिरापासून पुढे पायऱ्यांची वाट आपल्याला ब्रह्मगिरीवर नेऊन सोडते. मंदिरापासून थोडे पुढे गेल्यावर एक वाट उजवीकडे गंगाद्वार या ठिकाणाकडे तर डावीकडची वाट थेट ब्रह्मगिरीवर जाते. सुरुवातीला वनखात्याने निर्माण केलेला पायरी मार्ग काही काळातच एका सपाटीवजा जागेवर किंवा मेटावर घेऊन जातो. तेथे एक दगडी बांधकाम केलेली दुमजली सुरेख वास्तू दिसते, तिला धर्मशाळा असे म्हणतात. तिच्या बाहेरील बाजूच्या दगडी जिने आणि त्यावर कोरलेली काही सुरेख शिल्पे आपले लक्ष वेधून घेतात. हा टप्पा ओलांडून पुढे जाताना शेवटच्या टप्प्यातील जुना दगडी आणि कोरून काढलेला एकसंध पायरी मार्ग आपल्याला थेट माथ्यावर घेऊन जातो. या वाटेवर आता शासनातर्फे लोखंडी सुरक्षा कठडे बसविले आहेत, पण मुळातच चिंचोळा असलेला हा मार्ग तेथे असलेल्या माकडांमुळे जरा धोकादायक झालेला आहे. आपल्याबरोबर हातात काहीही खाण्याचे पदार्थ अथवा पाण्याची बाटली असल्यास ती निर्ढावलेली मर्कट मंडळी 

अगदी तुमची वाट अडवून, हातातून ते हिसकावून घेणारच. त्यामुळे या सर्व गोष्टी पाठपिशवीत घेऊनच गेलेले बरे हे मी अनुभवातूनच सांगतोय. 

या पायरी मार्गावरील वाटेवर ब्रह्मदेवाची गुहा, हनुमानाची विशाल मूर्ती हे सगळे जरा दम घेऊन बघण्याजोगे. हे सगळे आणि मर्कटलीला पाहत आपण शेवटच्या टप्प्यातील उभ्या चढणीचा कातळटप्पा पार करत आणि एकामागोमाग असलेले दोन दरवाजे ओलांडून ब्रह्मगिरीच्या माथ्यावर प्रकटतो. या सगळ्या चढणीला सुमारे एक ते दीड तासांचा अवधी पुरतो. 

या भटकंतीमध्ये माझ्याबरोबर वयाने बुजुर्ग पण मनाने तरुण असलेले जोशीकाका आणि कायम साथ देणारा नाशिकचा अभिजितदेखील होता. आम्हालादेखील माथ्यावर पोहोचायला दीड तास लागला. माथ्यावर बऱ्यापैकी सपाटी आहे आणि येणाऱ्या भक्तांसाठी सुविधा म्हणून चहा-पाणी, सरबत यांच्या छोट्या टपऱ्यादेखील आहेत. आम्ही पण आता थोडे विसावून थंडगार पाण्याचे चार घोट घशाखाली

रिचवून, फक्कड चहाचा आस्वाद घेतला. पुरेशा विश्रांतीनंतर आम्ही तिघेजण आता तयार झालो होतो ते म्हणजे बऱ्याच दिवसांपासून माझ्या भटकंतीच्या यादीत असलेल्या दुर्गभांडारच्या दर्शनासाठी. 

माथ्यावरून उजवीकडे जाणारी वाट या जोड किल्ल्याकडे जाते. वर असलेले जटाशंकरचे प्रसिद्ध मंदिर, जिथे प्रभू शंकराने जटा आपटून गंगा निर्माण केली अशी कथा आहे, ते मंदिर, त्यामागचे पाण्याचे टाके, बुरुज आणि काही प्राचीन अवशेष पाहून आम्ही मार्गस्थ झालो ते थेट दुर्गभांडारकडे. उत्तरेकडे जाणाऱ्या पाय वाटेने (ट्रॅव्हर्स) चालू लागले की बराच वेळ या दुर्गाचे दर्शन आपल्याला होत नाही. पण एका वळणावरून मात्र त्याचे दूरदर्शन आणि दोन्ही बाजूंनी वरून खालपर्यंत असलेले ताशीव कडे बघून या निसर्गाच्या वेगळ्या धाटणीच्या आविष्कारामुळे मनात जरा धडकीच भरते. याचे प्रथम दर्शन पाहून आणि विस्मयाने अचंबित होत मनात पहिला प्रश्न निर्माण होतो, की यावर जायचे कसे? ब्रह्मगिरी आणि दुर्गभांडार यांना जोडलेल्या भिंतीच्या जवळ जाईपर्यंत हा प्रश्न सतावत राहतो कारण, तोपर्यंत वर जाणारी वाट आपल्या दृष्टीने गुप्तच राहते. अगदी समीप आल्यावर त्याच्या माथ्यावर चढणाऱ्या काही पायऱ्या बघून मनाचा अक्षरशः थरकाप उडतो, पण लगेचच खंदकातून उतरवत नेलेल्या पायऱ्या पाहून आपले मन तात्पुरते शांत होते. चिंचोळ्या बोळकांडीतून किंवा उतरत्या चरातून खडक फोडून निर्माण केलेल्या या एकसंध पायऱ्या बघताक्षणी आपले मन उल्हसित होते. या अलौकिक पायऱ्या निर्माण करणाऱ्या कारागिरांपुढे केवळ नतमस्तक होणेच आपल्या हातात असते. 

खरेच दुर्गस्थापत्याचा अजोड नमुना काही दुर्गांवर बघायला मिळतो, त्यापैकी हा एक खासा दुर्गच म्हणावा लागेल. या पायऱ्या आपल्याला नक्की कुठे घेऊन जाणार याचा अजिबात थांगपत्ता लागत नाही, पण तरीही मोठ्या उत्कंठेने आपण त्या उतरायला सुरुवात करतो. या पायऱ्या उतरल्यावर आपण एका बुजलेल्या किंवा चीणलेल्या भुयारी मार्गातून एका सपाटीवर प्रवेश करतो. आता हा दरवाजा तेथील माती काढून टाकल्याने सुकर झाला आहे आणि तेथील जायचा हा मार्ग आता आपण ताठ मानेने ओलांडू शकतो. ही सपाट जागा म्हणजे दोन्ही

दुर्गांना जोडणारा पूलच म्हणाना... अतिशय अरुंद असलेल्या या जागेवरून जाताना बरोबर मध्यावरून चालणे गरजेचे, कारण दोन्ही बाजूला किमान पाचशे फूट उंचीचे कातळ आ वासून उभे आहेत. त्यामुळे इथे उगीचच सेल्फी काढण्याचा मोह टाळत संयमाने आणि शहाणपणाने दुर्गाकडे वाटचाल चालू ठेवणे हेच हिताचे. 

खरेतर सह्याद्रीमधील डाईकची रचना असलेला धोडप किल्ला, तैलबैला भिंती असाच काहीसा प्रकार या दुर्गभांडारवर आपल्याला पाहायला मिळतो. ऐंशी ते शंभर मीटरची ही अरुंद आणि सपाट वाट संपवून, आपण दुर्गाच्या अगदी पोटात असलेल्या दुसऱ्या भुयारातून किंवा दरवाजातून परत कातळात कोरलेल्या पायऱ्या चढून मुख्य गडावर प्रवेश करतो. आता आपण पुनश्च दुर्गाचा उठावलेला डोंगर डाव्या हाताला ठेवत, अरुंद अशा वाटेवरून किल्ल्याच्या शेवटच्या टोकाकडे जायला निघतो. थकल्या-भागल्या जीवांना बरोबर योग्य वेळी पाण्याच्या दोन टाक्यांचे होणारे दर्शन एकदम सुखावून जाते. इकडे पदभ्रमिकांचा फारसा राबता नसल्याने आणि पाण्याचा उपसा नसल्याने या दोनही टाक्यांची परिस्थिती फारशी चांगली नाही, पण त्यातील एका टाक्याचे पाणी मात्र निश्चित पिण्याजोगे आहे. इथून पुढे आपण गडाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आणि पूर्ण पाषाण फोडून निर्माण केलेल्या बुरुजापाशी येतो आणि इथेच गडाचा विस्तार संपला आहे. या बुरुजाखाली असलेला ताशीव कडा आणि त्या वरून दिसणारे त्रंबकेश्वर परिसराचे दर्शन निव्वळ अवर्णनीय असेच आहे. किल्ल्याचा टेकडीवजा माथा आणि एकूणच किल्ल्याचा परिसर अगदीच छोटेखानी असाच आहे, त्यामुळे गडफेरी करायला अर्धा ते पाऊण तास खूप झाला. या माथ्यावरून अंजनेरी पर्वत, त्रिंगलवाडी, हरिहर किल्ला आणि बसगड हे अगदीच नजरेच्या टप्प्यात आणि त्यांच्या आकारामुळे सहज ओळखता येतात. कड्याच्या पोटातील दिसणारे गंगाद्वार, निवृत्तीनाथांचे समाधी स्थळ हे सारे डोळ्यात भरून ठेवण्याजोगेच आहे. आल्या वाटेने परत ब्रह्मगिरीच्या सपाटीवर जाईपर्यंत आपण मात्र जरा जपूनच जावे आणि हो, पावसाळ्यात तर इकडे यायचे धाडस बिलकुल करू नये, कारण हा दुर्ग वाटतो तितका सोपा नाही याचे भान जरूर ठेवायला हवे.

त्र्यंबक गडाचा राखणदार, सातवाहनांच्या काळातील अजोड बांधणीचा हा दुर्गम किल्ला पाहायचा असेल आणि जोडीला हरिहर, बसगड, त्रिंगलवाडी या किल्ल्यांची जोड यात्रा करायची असेल तर पुढच्या सीझनची तयारी ठेवा. मी शासनास, विशेषतः वनविभागास एक जरूर आवाहन करेन, की ब्रह्मगिरीसारख्या पवित्र तीर्थक्षेत्री प्रचंड प्लॅस्टिक बाटल्यांचा आणि पिशव्यांचा खच संपूर्ण मार्गावर इतका पसरला आहे की, त्यातूनच चालावे लागते. आम्ही ट्रेकर्स मंडळी कधीही निसर्गात कचरा करतनाही. उलट सफाई करण्याचाच प्रयत्न करतो, त्यामुळे पर्यटकांना योग्य ती 

शिस्त लावून आणि त्यांच्याकडून या बाटल्यांच्या पोटी अनामत रक्कम वसूल केल्यास या अपप्रवृत्तींना निश्चित आळा बसेल यात शंका नाही. आम्ही पण येताना जमेल तेवढा कचरा सॅकमध्ये भरून खाली जमा केला याचा आनंद आणि समाधान वाटते. 

आता परतीचे वेध लागले होते. काकांच्या गुडघ्यांचा त्रास लक्षात घेता, शांतपणे उतरत आम्ही तळ गाठला आणि शेवटच्या क्षणी माझी नजर एका फलकावर पडली. ‘दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्यास नाही यमपुरी, नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्या नाही गणना.’ हे वाचून आमच्या पदरीदेखील वेगळ्या वाटेचे सौंदर्य पाहून पुण्य जमा झाले, या भावनेने आम्ही पुन्हा शहराच्या गर्दीत मिसळायला निघालो.

संबंधित बातम्या