किल्ले वेताळवाडी आणि रुद्रेश्वर लेणी

मिलिंद देशपांडे
सोमवार, 30 ऑगस्ट 2021


सह्यगिरी

मागच्या लेखात उल्लेख केलेला जंजाळा हा अजस्र पसारा असलेला किल्ला, घटोत्कच लेणे, अन्वा आणि अंभई ही दोन मंदिरे हे सगळे पाहून आमचा मुक्काम परत फर्दापूर येथेच होता. आम्ही पावसाच्या ओढीने आणि बऱ्यापैकी थंड हवेत आपला प्रवास होणार या अपेक्षेने गेलेलो; मात्र प्रचंड उन्हाचा आणि आर्द्रतेचा त्रास सहन करीत भरपूर घामाघूम होत झालेला आमचा तो दिवस खूप थकवा आणणारा असाच होता. आता वेध लागले होते ते या दुर्ग साखळीतील सगळ्यात आकर्षक आणि रूपवान अशा वेताळवाडीच्या किल्ल्याकडे जायचे... थकलेल्या शरीराने कधी बिछाना पकडला हे कळलेच नाही.

वेताळवाडी किल्ल्याकडे जाण्यासाठी फर्दापूर-चाळीसगाव रस्ता पकडून सोयगाव या ठिकाणी जावे लागते. सोयगावपासून अंदाजे चार किलोमीटर अंतरावर वेताळवाडी गाव आहे. पूर्वी खराब असलेला रस्ता आता अगदी गावापर्यंत व्यवस्थित झाला आहे. सकाळी साडेसहाला उठूनच आम्ही फर्दापूर ते वेताळवाडी हा प्रवास चालू केला. तासाभराच्या अंतराने आम्ही वेताळवाडी गावात पोहोचलो. गावाच्या अगदी काही मीटर अंतरावर असलेल्या एका ओढ्याच्या पुलावर मी अचानक गाडी थांबवली. बाकी सगळ्यांनी काय झाले अचानक गाडी थांबवायला तुला, असा प्रश्न विचारताच मी न बोलता हळूच खिडकीची काच खाली करून तारेवर कोवळ्या उन्हात बसलेल्या खंड्याकडे (किंगफिशर) बोट दाखविले. त्याने ओढ्यातून पकडून आणलेला एक बीटल चोचीत पकडला होता आणि तो तारेवर आपटत होता. कॅमेरा तयारच असल्याने मी इतरांची वाट न बघता गाडीतून उतरलो आणि त्याच्या चोचीतील शिकारीसह फोटो मिळवला. सुरुवात छान झाल्याने सगळेच खूश होते.

पूर्वी वेताळवाडी गावातून किल्ल्यावर चालत जायला लागायचे, पण आता मात्र हळदा घाटाच्या नवीन रस्त्याने अगदी किल्ल्याच्या समीप जाणे सोईस्कर झाले आहे. गावाच्या वळणावरील कट्ट्यावर काही ग्रामस्थ बसले होते, त्यांच्याकडे गड दाखवायला कोणी येईल का असा प्रश्न विचारताच एक उमदा तरुण लगेच तयार झाला. आरिफ पठाण त्याचे नाव. खरे म्हणजे कोणीही गडावर सहज फेरफटका मारून येऊ शकतो असा हा किल्ला आहे, पण स्थानिकांना बरोबर घेऊन गेले की परिसराचे चांगले ज्ञान मिळते आणि त्यांना थोडा रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल आपल्याही मनाला समाधान मिळते, हा आमचा कायमचा हेतू असतो. आरिफला गाडीत बसवून दहा मिनिटांतच आम्ही गडाच्या ऐन कुशीत असलेल्या हळदा घाट मार्गावरील एका खिंडीवजा भागात पोहोचलो. इथून गडाचा संपूर्ण परिसर एका नजरेत तुम्ही बघू शकता. खिंडीच्या आणि त्याला खेटून असलेल्या वेताळवाडी किल्ल्याच्या विरुद्ध दिशेला असलेल्या डोंगरावर वनखात्याने एक निरीक्षण मनोरा बसविला आहे. हिरव्या वनराजीत तो मनोरा, वेताळवाडी धरणाचा जलाशय आणि त्यामागे दूरवर पसरलेला जंजाळा किल्ला यांचे मनोहरी दृश्‍य डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवत आम्ही गडाकडे प्रस्थान ठेवले. खिंडीकडून किल्ल्याकडे पाहिल्यावर त्याचे रूप म्हणजे लहानपणी दिवाळीत बांधलेल्या किल्ल्याची आठवण करून देणारे होते. तटबंदी, बुरूज, दरवाजा यांच्या भक्कमपणाची आणि सुस्थितीची जाणीव करून देत होते. इतिहासाची साक्ष देत उभे असलेले हे दुर्लक्षित किल्ले खरेतर महाराष्ट्राचे वैभव आणि स्फूर्तिस्थाने आहेत. यांची डागडुजी करून ते भ्रमंती योग्य केले तर निश्चितच या आडवाटेवरच्या किल्ल्यांची पुन्हा एक वेगळी ओळख होऊन पर्यटन विकास होऊ शकतो. फक्त इच्छा हवी हे मात्र खरे.

खिंडीतून अगदी दहा-बारा मिनिटांतच आम्ही पहिल्या दरवाजापाशी पोहोचलो. याचे दोन भक्कम बुरुज अगदी अंगावर आल्याचा भास होतो. यांच्यामागे असलेला आणखी एक महाकाय बुरुज यांच्यापेक्षा मोठा थोरला आहे. अगदी यू टर्न मारल्यासारखे यातून जात आपण प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. खालून येणाऱ्या शत्रूला पहिल्या बुरुजांपाशीच अडवून वरील मोठ्या बुरुजावरून शत्रूवर मारा करता यावा हे थोडेसे डिफेन्स मेकॅनिझम म्हणावे लागेल अशी या मार्गाची आणि बुरुजांची रचना आहे. दरवाजातून उलटे वळून मागे पाहिल्यास जंजाळा किल्ल्याचे दूरदर्शन होते म्हणूनच या दरवाजाचे नाव जंजाळा असे आहे.

आता आम्ही उंची गाठल्याने वेताळवाडी धरण आणि जंजाळा परिसर हे अधिकच उठून दिसायला लागले होते. दरवाजावर शरभ या काल्पनिक प्राण्यांची दोन चिन्हे कोरली आहेत आणि ती अजूनही व्यवस्थित उठून दिसतात. दरवाज्याच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत आणि बाजूच्या दगडी जिन्याने आपण दरवाजावर जाऊ शकतो. दरवाजाच्या शेजारील तटबंदीवर आता एका लाकडी गाड्यावर एक भक्कम तोफ उभी करून ठेवली आहे. तिच्याकडे बघितल्यावर मन मात्र एकदम इतिहासात डोकावते.

प्रवेशद्वाराच्या बरोबर समोर थोडे वर चढून गेल्यावर जरा झाडोऱ्यामध्ये लपलेले एक खांब टाके आहे, पण त्याची परिस्थिती मात्र भयानकच म्हणावी लागेल. खरेतर या पाण्याचा उपसा करून दिल्यास हे सुंदर टाके भटक्यांची तहान नक्कीच भागवेल. इथूनच तटबंदी उजवीकडे ठेवत बालेकिल्ल्यावर म्हणजे गडाच्या सर्वात उंच टप्प्यावर जायचा मार्ग आहे. शेकडो वर्षांपूर्वीच्या या तटबंदीची आणि भरभक्कम बुरुजांची आजची स्थिती बघून या गड निर्मात्यांच्या अजोड बांधणीची ताकद आपल्या लक्षात येते. बालेकिल्ल्यावरील डोमच्या आकाराची इमारत आणि तिला प्रकाश येण्यासाठी वरून केलेला झरोका हेदेखील पाहण्याजोगे. पुढच्या टप्प्यात जमिनीत असलेले तुपाचे टाके बघून अचंबित व्हायला होते. याच्या शेजारीच असलेली धान्य कोठाराची इमारतदेखील बऱ्‍यापैकी शाबूत आहे. याच्या पुढच्या बाजूला एक मशीद असून तिला नमाजगिर म्हणतात, असे अशरफ वाटाड्याने आम्हाला सांगितले. त्याच्यावर कोरलेले निजामाचे चिन्ह आणि क्रॉस हे आवर्जून बघण्याजोगे.

हे बघत आपण बालेकिल्ल्याच्या उत्तर टोकावर येतो. या टोकावरच एक दोन कमानी असलेली आणि बऱ्यापैकी टिकून असलेली इमारत आपल्याला दुरूनच खुणावते. त्यातून दिसणारी आकाशाची निळाई मला कॅमेरात साठवायला प्रेरित करत होती. फोटो काढून त्या कमानीपाशी पोहोचलो. उन्हाने हैराण झाल्यावर त्या बाजूने येणाऱ्या सुंदर वाऱ्याच्या झुळुकेने आम्ही काही क्षण तिथेच रेंगाळत राहिलो. या कमानीतून एक घसरडी आणि तीव्र उताराची वाट गडाच्या खालच्या म्हणजे तटबंदीच्या टप्प्यात जाते. पण ती वाट टाळून कमानीपासून शंभर फूट मागे येऊन सोप्या वाटेने उतरावे म्हणजे आपण निर्धोकपणे गडाच्या या बाजूला असलेल्या मुख्य दरवाजापाशी पोहोचू शकतो. या दरवाजाच्या जवळच तटबंदीतून जाणारी एक चोरवाट आहे आणि इथे पडलेली तोफ आता जंजाळा दरवाजाच्या जवळ लाकडी गाड्यावर मोठ्या दिमाखात उभी आहे. चोरवाटेवर बऱ्यापैकी झाडी असल्याने थोडे पुढे जाऊन, खालचा परिसर बघून रीतसर मागे फिरावे. गडाच्या मुख्य दरवाजावरदेखील दोन सुंदर शरभाची शिल्पे कोरलेली आपल्याला दिसतात आणि या दरवाजातून दिसणारा जंजाळा तसेच धरणाचा जलाशय केवळ अवर्णनीय असाच म्हणावा लागेल. इथून गडाची मुख्य ठिकाणे संपतात आणि आपण परत एकदा तटबंदी उजव्या हाताला ठेवत, सपाट रस्त्यावरून जंजाळा दरवाजाकडे पोहोचतो. ही गड प्रदक्षिणा इथेच संपते. जंजाळा दरवाजाच्या सज्जावर दोन भली मोठी आग्या माश्‍यांची पोळी सुखाने नांदत आहेत, हे इथे जाणाऱ्या पर्यटकांनी आवर्जून लक्षात ठेवावे. गोंगाट करणे किंवा त्याच्या बुरुजावर जाऊन सेल्फी काढण्याच्या नादात कदाचित या माशा उठून मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल म्हणूनच ही धोक्याची सूचना.

गडदर्शन उरकून आता आम्ही उतावळे झालो होतो ते किल्ल्याच्या पूर्व बाजूला असलेल्या आणि डोंगराच्या कुशीत दडलेले हिंदू किंवा ब्राह्मणी लेणी असलेले रुद्रेश्वर हे ठिकाण पाहायला. खिंडीत येऊन काही पक्ष्यांचे फोटो काढत बरोबर आणलेल्या भूक लाडूंचा समाचार घेऊन आणि थंडगार पाणी रिचवत आरिफच्या मदतीने रुद्रेश्वर लेण्यांकडे आमची घोडदौड चालू केली (अर्थातच गाडीने). खिंडीतून वेताळवाडी गावापर्यंत छान हिरव्याकंच गाडीच्या रस्त्याने आम्ही आलो आणि तेथून मात्र लेण्यांकडे जाणारा रस्ता भयाण पद्धतीचाच होता. छोटी गाडी असेल तर कृपया शेवटचे दोन किलोमीटर अंतर चालत जाणे हेच हितावह आहे. वळवू शकू अशा योग्य ठिकाणी गाडी लावून आम्ही बऱ्यापैकी चढणीच्या मार्गाने पंचवीस मिनिटांतच या छोट्याशा लेण्यांपाशी पोहोचलो. अगदी जवळ जाईपर्यंत ही लेणी दिसत नाहीत कारण ती खोलगट भागात दडली आहेत. व्यवस्थित पाऊस पडला तर लेण्यांच्या शेजारून एक छान जलप्रपात साधारण साठ ते सत्तर फुटांवरून कोसळताना दिसतो, पण आमच्या नशिबी मात्र तो कोरडाच बघण्याचे भाग्य होते. आधीच्या पावसामुळे मात्र लेण्यांसमोरील कुंडात अतिशय रुचकर पाणी आमची तहान भागवायला तयार होते. लेण्यांच्या आत भगवान शंकर, नंदी, नरसिंह, गणराया आणि भैरव यांच्या मूर्ती असून त्यांनादेखील शेंदूर फासल्याने त्यांचे मूळ रूप नष्ट झाले आहे. तिथे थोडा विसावा घेऊन आम्ही पक्ष्यांचे सुंदर कूजन ऐकत आणि बहरलेल्या जंगलातील वाट तुडवत पुन्हा गाडीच्या दिशेने निघालो. या मार्गावरून येताना अर्धवट लपलेला वेताळवाडीचा किल्ला आणि त्याचे बांधकाम दूरवरूनदेखील मनाला आनंद देत होते.

संबंधित बातम्या