थरार ‘सांधण’ व्हॅलीचा

मिलिंद देशपांडे
सोमवार, 13 सप्टेंबर 2021

सह्यगिरी

सह्याद्रीच्या किल्ल्यांवर भटकण्याची मजा वेगळी आहेच, पण या सह्यगिरीच्या कुशीत काही अनवट ठिकाणे दडली आहेत आणि ही विस्मयकारक ठिकाणे एकदा तरी पाहावीच असे माझे मत आहे. कळसूबाई डोंगर रांगेच्या कक्षेत वसलेले अलंग, मदन, कुलंग, रतनगड, आजोबा किंवा आजा पर्वत ही ठिकाणे म्हणजे भटक्यांची पंढरीच आहे. थोडे किल्ले पायाखालून घालून झाले आणि वरील दुर्गांची यात्रा केली नसेल, तर ‘अरे मित्रा मग तू काय सह्याद्री पाहिला’ अशा नजरेने इतर भटके आपल्याकडे पाहतात. इतकी ताकद या सगळ्या निसर्गसमृद्ध प्रदेशात आहे. रतनगडाच्या ओटीत असलेली सांधण दरी हा या परिसरातील एक थरारक अनुभव आहे. या सांधण दरीबद्दल बोलायचे झाले तर प्रचंड, महाकाय, विशाल आणि अद्‍भुत हीच विशेषणे लावावी लागतात, इतके रांगडे सौंदर्य या दरीमध्ये दडलेले आहे.

सांधण व्हॅलीची दुर्गम वारी  करण्यासाठी पुण्याहून जाणार असाल तर नाशिक महामार्गावरील संगमनेर, अकोले, राजुर, भंडारदरा (शेंडी), पांजरे, उडदावणेमार्गे सांधण दरीच्या काठावर असलेल्या आणि रतनगडाच्या अगदी खेटून असलेल्या साम्रद या गावी जावे लागते. मुंबईहून जाताना मात्र कल्याण, कसारा घाट, इगतपुरी, घोटी मार्गे भंडारदरा आणि पुढे साम्रद या गावी पोहोचावे लागते.

सह्याद्रीच्या कण्यावर म्हणजेच क्रेस्टलाईन वर असलेला हा परिसर आणि सभोवताली पसरलेल्या सह्याद्री रांगेतील महत्त्वाची आणि राकट अशा कळसूबाई या रांगेने या गावाला जणू विळखाच घातला आहे असा भास होतो.

सांधण दरी गेल्या पंधरा वर्षात खूपच प्रकाशझोतात आली आणि भटक्या साहसी लोकांच्या मनाला तर या व्हॅलीने अक्षरशः भुरळ पाडली आहे. सह्याद्री पर्वतातील जिऑग्राफिक फॉल्ट लाईन म्हणजेच भौगोलिक प्रस्तरभंग रेषा असलेली ही दरी म्हणजेच, देशावरून कोकणात उतरणारी ही प्रवाहाची वाट किंवा नाळ साहसप्रेमींना खूप मोठे आव्हान पेलायला लावणारी अशीच आहे. याचे थोडक्यात वर्णन करायचे झाले तर ‘महादरी’ असेच करावे लागेल.

संपूर्ण महाराष्ट्रातून आणि काही जण तर बाहेरूनदेखील निसर्गाचा हा खजिना पाहायला येतात, इतकी मोठी प्रसिद्धी या दरीला मिळाली आहे. माझी ही साहसी भटकंती मात्र तीस वर्षांपूर्वीच झाली आहे. तेव्हा कोणालाच सांधण दरी विषयी फारशी कल्पना नव्हती. माझी मावशी संगमनेरला असल्याने भंडारदरा आणि संपूर्ण कळसूबाई रांग मी अनेकदा भटकलो आहे. अशाच एका भटकंतीत साम्रद गावी मुक्कामी असताना एका बुजूर्ग व्यक्तीने रात्री गप्पा मारताना या दरीचा आणि तेथील बेलाग वाटेचा उल्लेख केला होता. पण तेव्हा रतनगडचा ट्रेक असल्याने आणि तेथून पुढे कात्राबाईमार्गे हरिश्चंद्रगड गाठायचा असल्याने ही माहिती मी मनात जपून ठेवली... पुढे कधीतरी या अद्‍भुत साहसाला सामोरे जाण्यासाठीच. लगेचच पुढील वर्षी आम्हा काही मित्रांचा चमू स्थानिकांच्या मदतीने या मार्गाने खाली जाऊन आलो. निसर्गाचा हा भीतीदायक आणि अद्‍भुत नजारा पाहून अक्षरशः मनाचा आणि हातापायांचा थरकाप उडाला होता. पुढील काळात अगदी गेल्या चार वर्षांपर्यंत या दरीत माझ्या चार वाऱ्या झाल्या, पण अजूनही मन काही भरले नाही. कारण या दरीतील प्रवास निव्वळ थक्क करून सोडणारा असाच आहे.

या घळीत किंवा सांदण दरीत वर्षभरात फक्त चार-पाच महिनेच जाता येते. कारण दख्खनच्या पठारावरून थेट कोकणात उतरणारा हा पाण्याचा निसर्गनिर्मित प्रवाह आहे आणि पावसाळ्यात तर हा मार्ग पूर्ण बंद असतो. अतिशय वेगाने आणि अवखळपणे अनेक जलप्रपात आणि झोत थेट खाली कोकणात कोसळत असतात. काहीजणांनी पावसाळ्यात असा प्रयत्न करून (सुदैवाने) ते यशस्वीदेखील झाल्याचे मी यूट्युबवर पाहिले. पण माझ्या दृष्टीने हा निव्वळ वेडेपणा किंवा वेडे साहस असून ‘आ बैल मुझे मार’ या प्रकारात मोडणारे आहे. त्यामुळे फेब्रुवारी ते मे, फारतर जूनमधील पावसाचा अंदाज घेऊन ही दुर्गम यात्रा केली, तर फारसा धोका न पत्करता ही यात्रा सुफळ संपूर्ण होऊ शकते. पहिल्या दिवशी पुणे अथवा मुंबईवरून वर उल्लेख केलेल्या मार्गाने साम्रद या गावी पोहोचणे. भोजन उरकून घाटण देवी, घाटघरचा कोकण कडा आणि हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प तसेच रतनवाडीचे प्राचीन मंदिर हा फेरफटका करून साम्रद गावातील सुंदर सूर्यास्त पाहत, आकाशाला कवेत घेत तंबूमधील मुक्कामाचा आनंद घ्यावा आणि उद्याच्या साहसाच्या कल्पनेची स्वप्ने पाहत निद्रादेवीच्या अधीन व्हावे.

 भल्या पहाटे उठून पाच ते साडेपाचच्या दरम्यान अगदी अंधारातच साम्रद गाव सोडावे आणि पंचवीस ते तीस मिनिटांच्या सपाट चालीने दरीचे मुख गाठावे. घनदाट जंगलात दडलेले हे मुख. तिथे पोहोचेपर्यंत आपण नक्की कोठे चाललो आहोत याची आपल्याला तसूभरही कल्पना येत नाही आणि तांबडे फुटतानाच आपण या महाकाय किंवा अक्राळ विक्राळ अशा दरीच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. दरीच्या तोंडाशी असलेल्या प्रवाहातील कुंडातून बरोबरच्या पाण्याच्या बाटल्या भरून घेऊन या भन्नाट साहसाला आपण सुरुवात करतो. पुढील अर्ध्या ते पाऊण तासातच आपण दरीतील एका साचलेल्या पाण्यापाशी पोहोचतो आणि असेच पाणी क्रॉस करण्याचे पुढील तीन टप्पे आपल्याला बूट काढून, डोक्यावर सॅक घेऊन ओलांडायला लागतात. तेथून पुढे अंदाजे दोन तासांनी दगड-धोंड्यातील आणि बाजूला दरीतील साथ करणाऱ्या ताशीव कड्यांची अंदाजे उंची दोनशे ते साडे चारशे फूट सोबत करत आपण एका अवघड टप्प्यावर पोहोचतो. आता येथून फक्त रॅपलिंग करूनच खाली उतरता येते. अंदाजे पन्नास ते साठ फुटांचा हा टप्पा पार करून आपण पुढे चाल चालूच ठेवतो. 

काही काळाने यापेक्षा कमी उंचीचा अजून एक टप्पा पार करून आणि काही ठिकाणी फक्त रोपचा आधार घेत लहान मोठ्या प्रस्तर खंडातून वाट काढत, कधी निसर्गनिर्मित खडकांच्या छिद्रातून पार होत, कधी ढिसाळ वाट तुडवत अंदाजे सात ते आठ तासांची अथक वाटचाल करीत दरीच्या सपाट टप्प्यात असलेल्या उंबराच्या पाण्याजवळ पोहोचतो. भोजनाचा आनंद घेऊन बरेच लोक इथे दमल्याने मुक्काम करणे पसंत करतात, पण काहीजण मात्र कोकणातील डेहणे या गावात जातात, तर काहीजण थोडी विश्रांती घेऊन करोली घाटामार्गे धोपट वाटेने पुनःश्च साम्रद या गावी येतात. ग्रुपची सदस्य संख्या आणि किती दमछाक झाली आहे यावर हे अवलंबून असते. पण मुक्काम करायचा असल्यास मात्र तंबू, अन्नधान्य हा सगळा बाडबिस्तरा बरोबर मिरवायला लागतो, हे ध्यानात घेऊनच मोहिमेची आखणी करणे योग्य ठरते. सांदणच्या संपूर्ण वाटेवर दोन्ही बाजूला असलेले ताशीव कडे किंवा मोठ्या प्रस्तर भिंती, अतिथंड पाण्यातून जाणारी व अंगावर रोमांच उभे करणारी वाट, रॅपलिंगचा थरार, तळातून भल्यामोठ्या दिसणाऱ्या व कसलेल्या गिर्यारोहकांना कायम आव्हान देणारा आणि साद घालणारा बाण सुळका, करोली घाटाच्या मार्गे वर येताना हरिश्चंद्रच्या कोकणकड्याची आठवण करून देणारा आणि हुबेहूब भासणारा मिनी कोकणकडा, तसेच हे बेभान साहस संपवून परत साम्रद गावात येताना दिसणारे कळसूबाईसह अलंग, कुलंग, मदन, रतनगड आणि आजोबा यांचे विलोभनीय दर्शन म्हणजे दुधात साखरच वाटते.

डोळ्यांचे पारणे फेडणारा हा आविष्कार पाहायचा असेल तर मात्र सोबत कसलेला गिर्यारोहक, गिर्यारोहणाची उत्तम साधने, स्थानिक वाटाड्या आणि छोटासा चमू बरोबर हवाच. सखासह्याद्रीमध्ये किती विविधता दडून बसली याची प्रचिती या एका यात्रेमुळे सर्व भटक्यांना आल्याशिवाय राहणार नाही, याची माझ्या मनात खात्री आहे.

संबंधित बातम्या