संघर्ष अजूनही संपला नाही...

संपत मोरे
गुरुवार, 5 जुलै 2018

सन्मान
साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार नवनाथ गोरे यांच्या ‘फेसाटी’ कादंबरीला मिळाला. पुरस्कारामुळे नवनाथ गोरे प्रकाशझोतात आले, मात्र त्यांचा या पुरस्कारापर्यंतचा प्रवास काट्याकुट्यांनी भरलेल्या वाटेने झाला आहे. त्यांच्या या संघर्षमयी प्रवासाविषयी...

नवनाथ गोरे यांच्या ’फेसाटी’ कादंबरीला युवा साहित्य पुरस्कार मिळाला, आणि नवनाथ गोरे या नावाच्या दिशेनं सगळा प्रसिद्धीचा झोत पडला.  सांगली जिल्ह्यात साहित्यिकांची मांदियाळी आहे. या मान्यवर लेखकांना हा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला माणूसच माहिती नव्हता. नवनाथबद्दल  काहीतरी सांगा असं जेव्हा पत्रकार फोन करत होते तेव्हा भल्या भल्या नामांकित लेखकाची तारांबळ उडाली होती. कोल्हापुरात शिकायला गेल्यावर प्रा. रणधीर शिंदे यांच्यासारखा विद्यार्थिप्रिय शिक्षकाच्या मायेत वाढत स्वतःची दुःख सरांना सांगत नवनाथ स्वतःच्या जगण्यातली वेदना कमी करत होता. मग शिंदे सरांनी प्रेरणा दिल्यावर त्यानं त्याच्या जगण्याची फेसाटी लिहून काढली. हेतू हाच, की आपलं दुःख कमी होणार नाही पण हलकं तरी होईल, जिवाला बरं वाटलं. पुरस्कार वैगेरे या गोष्टी बिलकूल डोक्‍यात नव्हत्या. जगलेलं आयुष्य मांडणं, अगदी एखाद्या दोस्ताच्या खांद्यावर मान टाकून रडावं. आयुष्याची परवड त्याला सांगावी अशीच ’फेसाटी’आकाराला आलीय. आणि नवनाथच्या फेसाटीची दखल साहित्य अकादमीन घेतलीय. या पुरस्कारामुळं नवनाथच्या खडतर आयुष्याचीही नोंद देशपातळीवर घेतली आहे.

नवनाथ गोरे यांचं मूळ गाव जत तालुक्‍यातील निगडी बुद्रुक. या गावात गरीब  कुटुंबात जन्म झालेला हा पोरगा. घरात गरिबी इतकी की चूल पेटेल तो दिवस म्हणजे सगळ्यात चांगला शुभ दिवस. नवनाथच्या पालाच्या छपरातील चूल ज्या दिवशी पेटली नसेल त्याच्या नुसत्या नोंदी जरी नवनाथने भिंतीवरच्या कॅलेंडरवर ठेवल्या असत्या तर त्या नोंदी पाहून आज त्याच कौतुक करणारी लोक हादरून गेली असती, आणि हा लेखक कसलं आयुष्य जगलाय हेसुद्धा त्यांच्या लक्षात आलं असतं; पण या नोंदी नवनाथ ठेवू शकत नव्हता. कारण घरात कधीही कॅलेंडर आलं नव्हतं आणि चुकून एखाद्या संस्थेचं आलं तरी ते बघायलाही वेळ नसायचा.

‘’गावाकडं हुतो तेव्हा तारखाच काय पण महिनासुद्धा लक्षात राहत नव्हता. एवढं कामाला जुंपलेलो असायचो. दसरा झाला, की ऊस तोडायला जायचं तेवढं लक्षात राहायचं.‘’

नवनाथ गोरे यांची फेसाटी ज्या भागातली आहे तो जत तालुका ज्या जिल्ह्याला सधन म्हणून ओळखले जाते त्या सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागातील एक दुष्काळी तालुका. गेली कित्येक शतकं हा भाग दुष्काळाने होरपळत आहे. विकासाचे सगळे पर्याय बंद झालेला हा भाग. अनेक कुटुंब हा भाग सोडून केवळ पोटासाठी वारणा, कृष्णा या नद्यांच्या काठावर शेतमजुरीच्या कामासाठी गेलेत आणि तिथलेच झालेत. या तालुक्‍यातील एका गरीब कुटुंबाच्या जगण्याची लढाई नाथा (फेसाटीचा) नायक सांगतो. ही कादंबरी जशी एका कुटुंबाची व्यथा सांगते तशी एका प्रदेशाच्या उपेक्षेची, तिथल्या माणसाच्या पडझडीची गोष्ट सांगते. चार एकर जमिनीच मालक असणार नवनाथचं कुटुंब. जमीन फक्त सातबाऱ्यावरच, काहीही उपयोग नाही. ज्या वर्षी पेरायची त्यावर्षी पाऊस यायचा नाही. ज्या वर्षी पेरली नाही त्यावर्षी पाऊस यायचा. पाऊसही फसवायचा म्हणून त्याचे वडील विहीरवाल्या बागायत शेतकऱ्याकडे शेतमजुरी करायचे; पण त्याना दरवर्षी उसाच्या पट्ट्यात उसतोडीच्या निमित्तानं जावं लागायचं. एक भाऊ अपंग. बहिणी मोठ्या होतील तशी त्याची लग्ने झालेली. भावाचं लग्न झालंच नाही. त्याच अपंगत्व आणि गरिबी या गोष्टी त्याच्या लग्नाला अडथळा ठरल्या. आज भावानं पन्नाशी पार केलीय. आता त्याच्या लग्नाच्या शक्‍यता मावळल्या आहेत. आई, वडील आणि नवनाथच्या कष्टावर हे कुटुंब चाललं आहे. नवनाथला सरळ विद्यार्थाच जीवन जगता आलेलं नाही. बापाच्या फाटक्‍या कुटुंबाला ठिगळ लावण्यासाठी जे काम करावं लागलं ते नवनाथनी केलंय. अगदी भांगलण करण्यापासून ते ऊस तोडणी ही काम त्यानं केलीच आहेत पण कोल्हापूरला शिकायला गेल्यावर हा पोरगा एटीएमवर रखवालदार म्हणून राहिला आहे. ’साहित्य अकादमी’ हा मानाचा पुरस्कार मिळालेल्या लेखकाचा हा भूतकाळ आहे. त्याच्या आयुष्याच्या शोकांतिकेला सन्मानित केलंय; पण या लेखकाचा वर्तमानाची गोष्ट सांगणं गरजेचं आहे. नवनाथ सध्या कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठात एका प्रकल्पावर काम करतोय. पण त्याच काम आता संपत आलं आहे.  हे काम संपल्यावर पुढं काय हा प्रश्न त्याच्यापुढं असणार आहेच. गावाकडं त्याच्या आईला जेव्हा पत्रकार भेटायला गेले तेव्हा शेजारच्या रानात मजुरीला गेली होती. त्याच रानात तिची मुलाखत घेतली तेव्हा ती म्हणाली, ‘पोराचा फोटो बघून ऊर भरून आला. माझ्या पोराचं लै हाल झालं. पोरगं कसलच काम करायला न्हाय म्हटलं न्हाय. चीज झालं कष्ठाच. आता त्याला नोकरी लागलं .समदं चांगलं हुईल.‘असा त्याच्या आईला आशावाद आहे.

नवनाथची शाळा नीट झालेली नाही. दहावीच्या वर्गात त्याला अवघी ३६ टक्के गुण मिळतात. हे गुण कमी असतात. पण पोरगा पास झाल्याचा आनंद आईला होतो, आणि हे गुण कमी पडण्याचं कारण म्हणजे नवनाथ शाळेत गेलेलाच नसतो. इतर पोर शाळेत असतात तेव्हा हा पोरगा बापाने फाटक्‍या संसाराला आणलेली उचल फेडायला उसाच्या फडात उसतोडी करत असतो. उसाच्या फडातून थेट परीक्षेला गेलेला नवनाथ दहावी पास होतो पण बारावीला मात्र त्याला पास होता येत नाही. बारावीला तो सलग चार वेळा नापास होतो. या नापास होण्याची कारणे म्हणजे शाळेत त्याच ॲडमिशन नावालाच असतंय. तो फक्त परीक्षेचा फॉर्म भरायचा. अभ्यास करायला वेळच मिळायचा नाही. दोन वेळची भाकरी मिळवण्यासाठी करावे लागणाऱ्या कष्ट मूळ पुस्तकाकडे वळताच येत नव्हतं. शेवटी पाचव्या वर्षी अभ्यास केला आणि पास झाला.

बारावीत यश मिळाल्यावर मात्र नवनाथने ठरवलं. आता शिकायचं. अभ्यास करायचा. मग त्यानं शाळेकड लक्ष दिलं . वडिलांचा फाटका संसार सावरण्यासाठी पडेल ती काम करायची. काम पाचवीला पूजलेलं होतं. पण अभ्यासही करू लागला. उसतोडीला जातानाच पुस्तक सोबत घेऊन जायचं. दिवसभर ऊसतोड करायची. रात्री पालावर राकेलच्या चिमणीवर अभ्यास करत राहिला. या काळात  गरिबीशी खूपच लढावं लागलं. लढत लढत पदवी पदरात पाडून घेतली. पदवी पास झाल्यावर लगेचच नोकरीची दार उघडणार नव्हती पण थोडा आत्मविश्वास निर्माण झालेला. त्या बळावर पदव्युत्तर शिक्षण घ्यायला कोल्हापूर गाठलं. तिथंही शिक्षणासाठी संघर्ष होताच. त्याच संघर्षाला सामोरे जात नवनाथ शिकत राहिला, एम ए झाला. याच काळात त्याला प्रा.रणधीर शिंदे सर भेटले. सरांचा त्याला आधार वाटायला लागला.

नवनाथ म्हणतो,‘मी शिंदे सरांच्या कुटुंबाचा एक भाग झालो. सरांना माझं सगळं जगणं सांगायचो, सर आधार द्यायचे. सरानीच मला लिहायला सांगितलं. मी लिहीत गेलो.‘ निगडी बुद्रुक ते साहित्य अकादमी हा उमदी-कोल्हापूर मार्गे झालेला प्रवास खूपच लांबचा आणि अवघड होता.तो पूर्ण झाला.

नवनाथच अभिनंदन करायला कोल्हापूरला गेलो होतो. तो म्हणाला, ‘चला आधी च्या घिवूया. मग बोलू.‘आम्ही चहाच्या गाड्यावर गेलो.तिथं उभा राहिल्यावर एकजण आला. नवनाथला म्हणाला, ‘तुम्ही,नवनाथ गोरे का? कालच पेपरात वाचलं. तुमचं अभिनंदन‘
‘मी तर काल दिवसभर वाट बघत होतो तुमची. आला न्हाईसा. अभिनंदन.‘चहावाला चाचा म्हणाला.
’देशप्रेमी चहा सेंटर‘वर गेली काही वर्षे रोज हाफ चहा प्यायला येणारा नवनाथ. चाचाला तो शिकणारा पोरगा म्हणून माहिती होता. पण कालच्या पेपरात त्या पोराच्या पुस्तकाला ’साहित्य अकादमी’पुरस्कार मिळाल्याची बातमी वाचून चाचाला आनंद झालेला. पण कालपासून नवनाथ आलेलाच नव्हता. तो त्या साध्या पोराची वाट पहात होता. कालपासून पहिल्यांदाच नवनाथ समोर आलेला. आम्ही चहा घेतला. नवनाथ पैसे द्यायला लागला. चाचानी सांगितलं,‘आज,मी पैसे घेणार न्हाई.‘आज माझ्यातर्फे चहा‘ बोलताना चाचाचा आवाज गहिवरला होता. नवनाथ काहीही बोलला नाही. तिथंच उभा राहिला. मग चाचा उभा असलेल्या गिऱ्हाईकाना सांगायला लागले. ‘या पोराच्या पुस्तकाला दिल्लीचं मोठं बक्षीस मिळालंय. काल पहिल्या पानाव फोटू आला होता.‘सगळी नवनाथकडे बघायला लागली.

मग आम्ही बाजूला गेलो.

‘सर, पुरस्कार मला मिळाला नसता तर कोणालातरी मिळाला असता पण अशी माणसं मिळणं महत्त्वाचं हाय बघा.’ नवनाथ सहजपणे म्हणाला. बराचवेळ तिथल्या बाकड्यावर बसून आम्ही दिलखुलास गप्पा मारल्या. आमचं बोलणं झाल्यावर आम्ही निरोप घेतला. नवनाथ त्याच्या भाडोत्री खोलीच्या दिशेनं निघाला. मी बराच वेळ तो निघालाय त्या दिशेने पहात उभा राहिलो. नवनाथला साहित्य अकादमी मिळाली म्हणून आज त्याच कौतुक होतंय. पण या कौतुकातून त्याच्या पालाच्या घराच्या जागी सिमेंटचे घर येईल काय? त्याच्या वयस्कर आईची शेतमजुरी बंद होईल का? तिला सुख लागेल का?  नवनाथच्या आयुष्याला स्थिरता येईल का? त्याला नोकरी मिळेल का? त्याच्या आयुष्याला जर स्थिरता आली तरच हा युवा साहित्य अकादमी पुरस्कार सार्थकी लागला असं म्हणता येईल.

फोटो फीचर

संबंधित बातम्या