सागरी बेटं 

डॉ. श्रीकांत कार्लेकर
गुरुवार, 23 जानेवारी 2020

समुद्रशोध
समुद्र आणि समुद्रकिनाऱ्यांचं सौंदर्य आणि विविधता कशी जपायची?... 

पृथ्वीवरच्या सगळ्याच महासागरांत व लहान समुद्रांत अनेक बेटं आहेत. ही बेटं भूपृष्ठाच्या विविध प्रकारच्या हालचालींमुळं तयार झालेली आहेत. भूकवचाचं उंचावणं, भूखंडांची हालचाल, ज्वालामुखीचे उद्रेक अशा अनेक घटनांमुळं ती समुद्रांत तयार होतात. ती निर्माण होण्याची प्रक्रिया सदैव चालू असते. त्यामुळं रोज नवनवीन बेटं समुद्रांत जन्माला येत असतात. प्रशांत महासागरात बोरा बोरा, ताहिती, कुरे यासारखी तीस हजारपेक्षा जास्त बेटं मायक्रोनेशिया आणि पॉलिनेशियाच्या द्वीप समूहात आहेत. हिंदी महासागरात अंदमान, क्रोकाटू, क्रिसमस, मनार, पंबन, पेनांग, कार्गाडोल आणि अंटार्क्टिकभोवती आर्चर रॉक, रॉस आयलंड, डेविस आयलंड अशी असंख्य बेटं आढळून येतात. 

फिलिपिन्स व जपानची बेटं ही भूकंपप्रवण, तर सेलेबसची विवर्तनि (Tectonic) बेटं आहेत. जावा, बोर्निओ, हवाई ही मोठी बेटं ज्वालामुखीय आहेत. लक्षद्वीप, ऑस्ट्रेलियातील ग्रेट रीफ, पूर्व इंडोनेशियातील टिमोर ही प्रवाळ बेटं आहेत. भरपूर जैवविविधता असलेली ही प्रवाळ बेटं सागरी पर्यावरणातील बदलांना खूपच संवेदनशील आहेत. सागर पातळीतील थोड्याशा बदलांनीही ती नष्ट होऊ शकतात. आइसलंडसारखी बेटं ज्वालामुखीय व हिमाच्छादित आहेत. मायक्रोनेशियातील पलाउ, गुआम बेटं ज्वालामुखीय असली, तरी ती घनदाट जंगलांनी आच्छादलेली आहेत. 

सागरी बेटात आढळून येणारी ही विविधता केवळ अचंबित करणारी आहे. प्रत्येक बेट हे त्यावरील वनस्पती, अवसाद किंवा गाळ, प्रवाळ, मत्स्यजीवन, लगुन्स या सर्वच बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण आहे. जगभरातील लक्षद्वीप, हवाई, टोंगा, पलाउ, किरिबाटी अशी असंख्य सागरी बेटं ही त्यांच्या विशिष्ट भूरुपिकीमुळं (Geomorphology), भूशास्त्रीय रचनेमुळं, जैवविविधतेमुळं आणि त्यांच्या विवक्षित भौगोलिक स्थानामुळे अद्वितीय अशी निसर्ग लेणी झाली आहेत. प्रत्येक बेट हे देवदुर्लभ अशा सौंदर्यानं परिपूर्ण आहे. प्रत्येक बेटाचं निसर्गसौंदर्य हे शब्दात वर्णनही करता येणार नाही इतकं विलक्षण. काही बेटं पूर्णपणे खडकाळ, काही ज्वालामुखीय क्रियेनं तयार झालेली सदैव अस्थिर आणि अस्वस्थ. काही प्रवाळ  आणि केवळ प्रवाळ यांनीच तयार झालेली तर काही समुद्रातून वर आल्यामुळं गाळाच्या संचयनानं तयार झालेली! काही पूर्णपणे ओसाड, काही बर्फाच्छादित तर काही लक्षद्वीप समूहातील कल्पेनी बेटासारखी वीस वीस मीटर उंचीच्या माडांनी झाकून गेलेली! 

निसर्गाचं हे सौंदर्यलेणं कुणालाही भुरळ पडावी असं, पण मानवी वस्तीसाठी तितकंच खडतर! जगातल्या, भर समुद्रात असलेल्या, किरिबाटीसारख्या बऱ्याचशा सागरी बेटांवर वस्ती असली किंवा अगदी अत्यल्प असली, तरी ती तिथंही आहे हे फारच आश्चर्यकारक आहे. इतर जगाशी केवळ हवाई मार्गानंच संपर्क असणारी प्रशांत, अटलांटिक आणि हिंदी महासागरातील सागरी बेटं आज वाढत्या समुद्र पातळीच्या सावटाखाली आपलं अस्तित्व जपण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

अरबी समुद्रात, भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून ४०० किमी दूर असलेल्या लक्षद्वीप द्वीपसमूहात ११ बेटांवर माणसांची वस्ती आहे. १५ बेटांवर ती नाही. या बेटांच्या आजूबाजूचा समुद्रतळाचा अभ्यास असं दाखवतो, की इथं पाण्यात बुडालेल्या पाच प्रवाळ भित्ती (Coral reefs) आहेत. एका उथळ लगूनच्या आजूबाजूला असलेली सखल (Low) बेटांची ही एक साखळीच आहे. ही बेटं ३२ चौरस किलोमीटरच्या परिसरात विखुरलेली आहेत. इथली सगळी बेटं कमी उंचीची, समुद्र सपाटीपासून केवळ १ ते २ मीटर उंच असून त्यावर डोंगर, पर्वत अशी भूरूपं नाहीत. काही बेटांवर वाळूच्या उंच टेकड्या आणि थोड्या उंचीवर पुळणी आहेत. या पुळणींवर तुटलेल्या प्रवाळांच्या भरड पदार्थांचं संचयन आढळून येतं. पूर्वेकडून येणारी वादळं आणि मॉन्सूनमध्ये नैऋत्येकडून येणाऱ्या लाटा यामुळं या बेटांची मोठी नासधूस व झीज होते. त्यामुळं प्रवाळांचे लहान लहान तुकडे लगून्समधे पडून काही लगून्स गाळानं भरूनही जाऊ लागली आहेत. मिनीकॉय, कल्पेनी, कदमत, किस्तन व चेटलत ही इथली कंकणाकृती प्रवाळ बेटं आहेत. बंगाराम बेटांचा समूह लगूनच्या मधे तयार झालाय. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील दीवसारखी बेटं किनाऱ्याच्या अगदी जवळ असल्यामुळं तिथलं पर्यावरण झपाट्यानं ऱ्हास पावतं आहे. मालदीव द्वीप समूहात एकूण १३०० प्रवाळ बेटं आहेत, मात्र त्यातील केवळ २०० बेटांवर वस्ती आहे.

संबंधित बातम्या