सागरतळाची रचना 

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 27 जानेवारी 2020

समुद्रशोध
समुद्र आणि समुद्रकिनाऱ्यांचं सौंदर्य आणि विविधता कशी जपायची?... 

समुद्र आणि महासागर यांच्या तळभागाची नेमकी रचना त्यांच्या खोलीमुळं आपल्याला कळायला अनेक वर्षं लागली. वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नांनंतर आज प्रत्येक महासागराच्या तळरचनेचे अचूक नकाशे तयार करता आलेत. त्यातून हे लक्षात येतं, की जगातल्या सगळ्या समुद्रांच्या तळरचनेत खोली, गाळ आणि त्यावरील उंचसखलपणा याबाबतीत खूपच विविधता आहे. जमिनीवर जशी पर्वत, डोंगर, मैदानं, पठारं अशी भूस्वरूपं आहेत. तशाच प्रकारची भूरूपं सागरतळावर असल्याचं लक्षात आलं आहे. 

समुद्रतळाच्या खोलीचं मोजमाप करण्याचा सर्वप्रथम प्रयत्न इ. स. पूर्व ८५ मध्ये, भूमध्य समुद्रांत, पॉसिडॉनस या ग्रीक शास्त्रज्ञानं केल्याचे उल्लेख आढळतात. त्यानं आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं, ज्याच्या एका टोकाला एक मोठा दगड बांधला आहे अशी दोन किलोमीटर लांबीची दोरी तळ लागेपर्यंत समुद्रात सोडली आणि त्यावरून खोलीचं मापन केलं. त्यानंतर इ. स. १८१८ मध्ये सर जेम्स क्लार्क रॉस या शास्त्रज्ञानं ४८९३ मीटरपर्यंतच्या खोलीचं ध्वनिग्राही यंत्र (Sounder) वापरून दक्षिण अटलांटिक महासागरांत मोजमाप केलं. इ. स. १८७० मध्ये चॅलेंजर या समुद्रतळ मोजणाऱ्या जहाजावरील गटानं अटलांटिक महासागरांत ४९२ ठिकाणी ध्वनिग्रहण यंत्राच्या साहाय्यानं समुद्राची खोली मोजली व या महासागरातील अटलांटिक मध्य पर्वत रांगेचा (Mid Atlantic ridge) शोध लावला. 

जून १९२२ मध्ये स्टुअर्ट या अमेरिकन नेव्ही जहाजानं अटलांटिकच्या एका किनाऱ्याकडून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंतच्या समुद्रतळाच्या खोलीची प्रतिध्वनी ध्वनिग्रहण यंत्राचा (Eco sounder) वापर करून मोजणी केली. अशीच मोजणी मिटिओर या जर्मन संशोधक जहाजानं १९२५ ते १९२७ या काळात अटलांटिकमधेच केली. त्यातून अटलांटिक मध्य पर्वत रांग सरळ नसून इंग्रजी S आकाराची आहे याचा शोध लागला. 

समुद्राच्या पाण्याचं तापमान, दाब व क्षारता यामुळं प्रतिध्वनी ध्वनिग्रहण यंत्राचा वापर करून मिळविलेल्या खोलीविषयीच्या माहितीत थोडी चूक राहिली होती. असं असलं तरीही १९५९ पर्यंत जगातल्या सगळ्या महासागरांच्या खोलीचे नकाशे सतत प्रयोग करून संशोधकांनी तयार केले. त्यानंतर मात्र अत्युच्च प्रतीची प्रतिध्वनी ध्वनिग्रहण यंत्रं व उपग्रह उंचीमापन शास्त्र (Satellite Altimetry) यांचा वापर करून आता शास्त्रज्ञांना सागरतळाचे अतिशय अचूक नकाशे तयार करण्यात यश आलं आहे. मानवनिर्मित उपग्रह समुद्रतळाची खोली थेट मोजू शकत नाहीत, मात्र समुद्रपृष्ठाच्या उंचीत, तळभागावरील उंचीत पडणारे ३ सेंटीमीटरपर्यंतचे फरक ते सहज मोजू शकतात. या गोष्टीचा उत्तम वापर आधुनिक समुद्रतळ मोजमापीत केला गेला. याचमुळं पूर्वी कळू न शकलेल्या समुद्रतळावरील अनेक लहानमोठ्या, उंचवट्यांचा, खड्डयांचा आणि घळ्यांचा शोध लागू शकला. 

जमिनीवरील सर्वेक्षण आणि सागरतळावरील खोलीचा शोध यातून हे समजलं, की जमिनीवरील निरनिराळ्या उंचीवरील प्रदेशांचं क्षेत्रफळ व सागरतळावरील निरनिराळ्या खोलीवर असलेल्या प्रदेशांचं क्षेत्रफळ वेगवेगळं आहे. हे दाखविणाऱ्या क्षेत्रोन्नत्ती आलेखावरून (Hypsometic curve) असं लक्षांत आलं, की जमिनीची सरासरी उंची ८४० मीटर असून त्या मानानं समुद्राची खोली बरीच जास्त म्हणजे ३८०० मीटर आहे. 

या आलेखावरून सागरतळाच्या खोलीचं आणि जमिनीवरच्या उंच भागांचं सर्वसाधारण स्वरूप समजतं. जमिनीवर २०० ते १००० मीटर उंच असलेल्या भागांचं प्रमाण सर्वाधिक म्हणजे १३ टक्के आहे. याउलट समुद्रांत ४००० ते ६००० मीटर खोलीवर सर्वाधिक म्हणजे ४१ टक्के प्रदेश आहे. २००० ते ४००० मीटर खोलीवर १५ टक्के क्षेत्र आहे. जमिनीवर ४००० मीटरपेक्षा जास्त उंचीवर केवळ एक टक्का प्रदेश आहे. 

जमिनीवर अत्युच्च पर्वत एव्हरेस्ट असून त्याची उंची ८८५० मीटर आहे. मरियाना ही प्रशांत महासागरांत सर्वाधिक खोलीची, म्हणजे १०९८४ मीटर खोल गर्ता आहे. अशा गर्तेत एव्हरेस्ट पर्वत आहे अशी कल्पना केली, तर त्याच्याहीवर २००० मीटर पेक्षा जास्त खोलीचा समुद्र शिल्लक राहील! 

समुद्रतळाची जी रचना आज आपल्याला माहित आहे, त्यानुसार किनारपट्टीच्यापुढं समुद्रात, समुद्रबूड जमीन किंवा भूखंड विस्तार (Continental shelf), खंडांत उतार (Continental slope), सागरी मैदान (Deep sea plain) आणि सागरी गर्ता (Trench) असे मुख्य विभाग आढळून येतात.

संबंधित बातम्या