समुद्रबूड जमीन 

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

समुद्रशोध
समुद्र आणि समुद्रकिनाऱ्यांचं सौंदर्य आणि विविधता कशी जपायची?... 

सा गरतळाच्या समुद्रबूड जमीन किंवा भूखंड विस्तार (Continental shelf) या किनाऱ्यालगतच्या पहिल्या विभागाला ‘भूखंड मंच’ असंही म्हटलं जातं. सागरतळाचा हा विभाग जमिनीला लागूनच व उथळ असल्यामुळं या विभागाविषयी सर्वांत अधिक माहिती उपलब्ध आहे. पृथ्वीवरील भूतबकांच्या (Tectonic plates) एकमेकांच्या संदर्भात घडलेल्या हालचालींमुळं हा विभाग निर्माण झालेला आहे. समुद्रकिनाऱ्यावरील लघुत्तम अशा ओहोटी (Low tide) मर्यादेपासून या विभागाची सुरुवात होते आणि समुद्रतळावर जिथं तीव्र उताराचा ‘सागरी उतार’ विभाग सुरू होतो तिथपर्यंत तो पसरलेला असतो. 

समुद्रबूड जमीन हा विभाग खुपसा सपाट असून क्षितिजसमांतर रेषेशी तो अतिशय कमी कोनात खोल समुद्राच्या दिशेनं कललेला आहे. हा कल दोन अंशांपेक्षा साधारणपणे जास्त नसतो. समुद्रबूड जमिनीचा सागरतळाच्या दिशेनं असलेला उतार दर किलोमीटरला २ मीटर इतका असतो. जमिनीच्या दिशेनं हा उतार कमी असतो, कारण जमिनीकडच्या बाजूवर गाळाचं बरंच संचयन झालेलं असतं. भूखंड मंच या विभागाचा विस्तारही सगळीकडं सारखा नसतो. काही ठिकाणी याचा विस्तार जवळ जवळ नसतोच, तर काही ठिकाणी तो १३० किलोमीटर इतका आढळतो. आर्क्टिक महासागरांत सैबेरियाच्या ईशान्य किनाऱ्याजवळ समुद्रबुडाचा विस्तार सर्वाधिक म्हणजे ४०० किलोमीटर असून त्याची लांबी १५०० किलोमीटर आहे. पर्वतमय किंवा डोंगराळ किनारपट्टीच्या प्रदेशापाशी याचा विस्तार कमी व मोठ्या नद्यांच्या मुखाशी विस्तार जास्त असल्याचं आढळून आलं आहे. भारताच्या भूखंड मंचाचा विस्तार पूर्व किनाऱ्याजवळ तमिळनाडूच्या पूर्वेस ३५ किलोमीटर, तर आंध्र प्रदेशाच्या पूर्वेला ६० किलोमीटर आणि पश्चिम बंगालच्या दिघाजवळ १२० किलोमीटर आहे. पश्चिम किनाऱ्यावर दमणच्या किनाऱ्याजवळ तो ३४५ किलोमीटर, तर गोव्याजवळ १२० किलोमीटर आणि कोचीजवळ ६० किलोमीटर आहे. 

हा विभाग म्हणजे भूखंडाचाच विस्तार असून, भूखंड व खोल समुद्र यांच्या सीमारेषेवर याचं स्थान आहे. यानं एकूण सागरतळाच्या केवळ ८ टक्के क्षेत्रफळ व्यापलं आहे. याची खोली सगळीकडं सारखी नसून ती १०० ते २०० मीटरपर्यंत कमी-जास्त अशी आढळते. समुद्रबूड जमिनीवरील पाण्याचा उथळपणा अनेक गोष्टीवर अवलंबून असतो. हिमनदीच्या कार्यानं बदलल्या गेलेल्या किनारपट्टीजवळ या प्रदेशाची खोली जास्त असल्याचं दिसून येतं. नदीमुखाशी जर गाळाचं मोठ्या प्रमाणावर संचयन झालं असेल किंवा नदीमुखाशी जर प्रवाळ खडक तयार झाले असतील, तर तिथं याची खोली कमी आढळते. जगभर आढळणाऱ्या समुद्रबूड जमिनीची सरासरी खोली १२८ मीटर आहे. ग्रीनलंडमध्ये किनाऱ्याला समांतर अशा खोल दऱ्या समुद्रबूड जमिनीवर आढळून आल्या आहेत. समुद्रपातळी उंचावल्यानं या दऱ्या पाण्याखाली गेल्या असाव्यात. 

अनेक ठिकाणी या सपाट प्रदेशावर कमी उंचीच्या टेकड्या किंवा नद्यांच्या दऱ्याही आढळतात. वाळू, शंखशिंपले, चिखल यांचा जाड थर समुद्रबूड जमिनीवर नेहमीच असतो. अनेक लहान मोठे उंचवटे, खड्डे हेही आढळून येतात. इथं पुरेसा सूर्यप्रकाश पोचतो, जो प्रवाळांसारख्या अनेक सागरी जीवांसाठी पोषक असतो. समुद्रतळाचा हा विभाग नैसर्गिक संपदेच्या दृष्टीनंही संपन्न आहे. नायट्रोजन, फॉस्फरस, सिलिका, कॅल्शिअम अशी अनेक पोषक द्रव्यं, खनिजं, अनेक सागरी जीव यांनी हा विभाग अधिक उपयुक्त बनला आहे. 

वर-खाली होणाऱ्या समुद्रपातळीचा या विभागावर मोठाच परिणाम होत असतो. समुद्रपातळी उंचावली, की पूर्वीच्या किनाऱ्याजवळचा सपाट प्रदेश पाण्याखाली जाऊन तिथं नवीन समुद्रबूड जमीन तयार होते. पूर्वी समुद्राला जाऊन ज्या नद्या मिळत होत्या, त्यांच्या मुखात वाढलेलं पाणी घुसून नदीमुखांच्या खोल खाड्या (Estuaries) होतात. आपल्याकडं कोकण किनाऱ्यावर अशा तऱ्हेनं खाड्या तयार झाल्या आहेत. समुद्रपातळी खाली गेली, की पूर्वीच्या समुद्रबूड जमिनींचे किनाऱ्याच्या दिशेकडील विस्तृत भाग उघडे पडतात.  समुद्रपातळी खाली गेल्यावर किनाऱ्यावर समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्यांची पात्रंही उघड्या पडलेल्या मंचाची झीज करत पुढं सरकतात आणि वाहून आणलेला गाळ समुद्रबूड जमिनीवर पसरतो. 

वर्ष १९७० नंतर झालेल्या भूभौतिक (Geophysical) संशोधनातून असं लक्षात आलं, की समुद्रबूड जमिनीवर साठून राहिलेला गाळाचा थर मॉन्सूनमध्ये आणि हरिकेन, टायफून, आवर्त अशा वादळांच्या वेळी समुद्रात निर्माण झालेल्या वादळी लाटांमुळं ढवळला जातो आणि त्याची मोठी झीज होते.

संबंधित बातम्या