खंडान्त उतार, सागरी मैदान व गर्ता  

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

समुद्रशोध
समुद्र आणि समुद्रकिनाऱ्यांचं सौंदर्य आणि विविधता कशी जपायची?... 

समुद्रबूड जमिनीच्या पुढच्या सागरतळाचा भाग एकदम कलता होत जातो. याला खंडान्त उतार (Continental Slope) असं म्हणतात. या विभागाचा सर्वसाधारण उतार चार अंश इतका असतो. सामान्यतः तीन ते चार हजार मीटर खोलीपर्यंत हा उतार पसरलेला दिसून येतो. याची सरासरी रुंदी ४० किमीच्या जवळपास असते. या उतारावर समुद्रबूड जमिनीप्रमाणंच अनेक दऱ्या आढळतात. पर्वतमय किनारपट्टी लाभलेल्या प्रदेशाच्या सागरतळावरील खंडान्त उतार हा मैदानी किनारपट्टीच्या प्रदेशाजवळील खंडान्त उतारापेक्षा जास्त कलता असतो. पहिल्या ठिकाणी तो साडेतीन अंश, तर दुसऱ्या ठिकाणी दोन अंश इतकाच असतो. खंडान्त उताराचं स्वरूप आणि किनाऱ्यापासूनचं त्याचं अंतर या गोष्टी जमिनीवरील उंचसखलपणावर अवलंबून असल्याचं दिसून आलं आहे. खंडान्त उतारावर सामुद्रिक निक्षेपांचं (Marine Deposits) प्रमाण, त्याच्या उतारामुळं फारच कमी असतं.

प्रशांत महासागराच्या तळावरील खंडान्त उतार प्रदेश अटलांटिक महासागराच्या तळभागावरील प्रदेशापेक्षा जास्त तीव्र उताराचा असतो. हिंदी महासागरांत हा विभाग खूपच कमी उताराचा असल्याचं आढळून आलं आहे. 

या विभागावर मुख्यतः चिखलाचं संचयन असतं. वाळू आणि भरड पदार्थ त्या मानानं कमी असतात. समुद्रतळाच्या इतर विभागांच्या तुलनेत या विभागावर गाळ साठून राहण्याचा कालावधी नेहमीच कमी असतो. सागर पृष्ठावरील भूप्रक्षोभक (Tectonic) हालचालींमुळं या विभागाची निर्मिती होते. 

सागरतळावर खंडान्त उतारानंतर सागरी मैदान (Deep Sea Plain) हा विभाग आढळतो. विस्तृतपणा आणि सपाटी ही याची वैशिष्ट्यं आहेत. सागरतळाचं तीन ते सहा हजार मीटर खोलीवरचं फार मोठं क्षेत्र या विभागानं व्यापलं आहे. अशा तऱ्हेची विस्तृत मैदानं जमिनीवर आढळत नाहीत.

या मैदानावर उंच-सखल भाग असला, तरी उंच भागांची उंची अगदीच कमी असल्याचं दिसून आलं आहे. खंडान्त उतारावर तयार झालेल्या दऱ्यांतून या प्रदेशावर मोठ्या प्रमाणावर गाळ इथं आणून टाकला जात असल्यामुळं या प्रदेशाला इतकी सपाटी आली असावी. प्राणिजन्य व वनस्पतिजन्य गाळासारख्या सामुद्रिक निक्षेपांचं प्रमाणही इथं अत्याधिक आढळतं.

सागरतळाच्या रचनेचा सागरी गर्ता (Oceanic Trench) हा शेवटचा विभाग असून सागरी मैदानं ज्या खोलीवर आढळतात त्याहीपेक्षा अधिक खोलीवर या गर्ता आढळतात. सागरतळाचा फक्त सात टक्के भागच त्यांनी व्यापला आहे. या गर्तांची संख्या पॅसिफिक महासागरात जास्त आहे. आत्तापर्यंत एकूण ५७ गर्तांचं अस्तित्व समजलं असून त्यातील ३२ गर्ता एकट्या पॅसिफिकमध्ये, १९ अटलांटिकमध्ये आणि ६ हिंदी महासागरात आहेत. 

जवळजवळ सगळ्याच ६,१०० मीटरपेक्षा जास्त खोलीच्या असून जगातील सर्वांत खोल सागरी गर्ता पश्चिम पॅसिफिक महासागरात आहे. फिलिपाईन्स बेटांच्या प्रदेशात असलेल्या या गर्तेला मरियाना गर्ता असं संबोधलं जातं. तिची खोली १०,९८४ मीटर (६०३५ फॅदम) आहे. या गर्तेत एव्हरेस्ट पर्वत आहे अशी कल्पना केली, तर त्याच्याही वर २ हजार मीटरपेक्षा जास्त खोलीचा समुद्र शिल्लक राहील! सागरी गर्तांची लांबी काही हजार किमी व रुंदी २०० किमीच्या जवळपास आढळते. अलीकडच्या संशोधनावरून असं स्पष्ट झालं आहे, की सागरी गर्तांचे प्रदेश हे जमिनीवरील अर्वाचीन वळ्या (Folds) असलेल्या प्रदेशाला समांतर आहेत.  

सागरी गर्तांमध्ये सूर्यप्रकाश प्रवेश करू शकत नाही, त्यामुळं इथं प्रकाश संश्‍लेषण क्रिया (Photosynthesis) होण्याची शक्यताच नसते. शार्क, व्हेल असे अजस्र सागरी जीव इतक्या खोलीमुळं आणि इथं असणाऱ्या पाण्याच्या प्रचंड दाबामुळं (दर चौ. इंचावर ८ टन) इथं जगूच शकत नाहीत. 

अजूनही समुद्र तळाच्या या विभागाची आपल्याला पूर्ण माहिती नाही. जगात सर्वांत जास्त सागरी गर्ता प्रशांत महासागरात आहेत. सर्वच गर्तांमध्ये त्यांच्या निर्मितीपासून गाळ संचयन होत असल्यामुळं अनेक गर्ता हळूहळू उथळ होत असल्याचं निरीक्षण नवीन संशोधनातून पुढं आलं आहे. 

संबंधित बातम्या