प्रशांत महासागर
समुद्रशोध
समुद्र आणि समुद्रकिनाऱ्यांचं सौंदर्य आणि विविधता कशी जपायची?...
अनेक दृष्टींनी प्रशांत महासागर हा इतर महासागरांपेक्षा वेगळा आहे. आशियाच्या पूर्व किनारपट्टीपासून अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीपर्यंत याचा विस्तार आहे. या सागराची उत्तर मर्यादा बेरिंगची सामुद्रधुनी असून दक्षिणेस अंटार्क्टिक खंड आहे. प्रशांत महासागर ४२८२ मीटर खोल असून त्याचा आकार बराचसा त्रिकोणाकृती आहे. या सागराच्या जवळ जवळ सगळ्याच किनारपट्टीवर समांतर असे वलीपर्वत आहेत.
प्रशांत महासागरात एकूण २० हजार बेटं आहेत. आकारानं मोठी असलेली बेटं उपखंड बेटं (Sub continental) या प्रकारात मोडतात. अल्युशिअन बेटं, ब्रिटिश कोलंबिया व चिली यांची बेटं यांचा समावेश या प्रकारात होतो. इतर महत्त्वाची बेटं म्हणजे फिलिपाईन्स, इंडोनेशिया, क्युरील व जपानच्या व्दीपसमूहातील बेटं, फिजीची प्रवाळ बेटं असून हवाईच्या ज्वालामुखीय बेटांचाही त्यात समावेश केला जातो.
सर्वसामान्यपणे प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील भागात बेटांची संख्या पूर्वेकडील भागापेक्षा अधिक आहे असं दिसून येतं. या सागराच्या समुद्रबूड जमिनीवर, किनाऱ्यालगत अनेक छोटे-मोठे समुद्र आहेत.
प्रशांत महासागराचे खालीलप्रमाणे चार विभाग केले जातात -
१) उत्तर प्रशांत : ५000 ते ६००० मीटर खोलीचा हा विभाग प्रशांत महासागराचा सर्वांत खोल भाग आहे. अनेक सागरी गर्ता या विभागात आढळून येतात.
२) मध्य प्रशांत : या विभागात सागरी गर्ता जवळजवळ नाहीतच. याची सरासरी खोली १८०० मीटर आहे. सामुद्रिक बेटांची अत्याधिक संख्या हे या विभागाचं वैशिष्ट्य आहे. यातील बरीचशी बेटं, प्रवाळ बेटं किंवा ज्वालामुखीय बेटं आहेत. हवाईपासून मरीयानापर्यंतच्या विभागात एकूण १६० सपाट माथ्याची बेटं आहेत. न्यू गिआनापासून निघालेल्या बेटांच्या अनेक समांतर रांगा ईशान्येस हवाईपर्यंत गेल्या आहेत.
३) नैऋत्य प्रशांत : याची सरासरी खोली ४०० मीटर असून बेटं, पार्श्ववर्ती समुद्र, सागरी दऱ्या आणि समुद्रवूड जमीन हे सर्व भू-प्रकार या प्रदेशात आढळतात.
४) आग्नेय प्रशांत : अनेक सागरी पर्वतरांगा व पठारं हे या विभागाचं वैशिष्ट्य असून पार्श्ववर्ती सागर मात्र या विभागात आढळत नाहीत.
प्रशांत महासागरातील समुद्रबूड जमिनीची खोली १००० मीटरपासून २००० मीटरपर्यंत आढळते. याची रुंदी १५० ते १६०० किलोमीटर इतकी आहे. अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीलगत समुद्रबूड जमीन ८० किलोमीटर रुंद आहे. ऑस्ट्रेलिया, ईस्ट इंडीज बेटं आणि आशिया यांच्या पूर्व किनारपट्टीलगत मात्र समुद्रबूड जमीन बरीच विस्तृत आहे. याच प्रदेशावर आशियातील प्रमुख बेटं (उदा. क्युरील, जपानची बेटं, फिलिपाईन्स, इंडोनेशिया व न्यूझीलंड) आहेत. अनेक लहान समुद्रही याच विभागावर आहेत. उदा. चीनचा समुद्र, जावा समुद्र, ओखोत्स समुद्र.
प्रशांत महासागराच्या किनारपट्टीच्या स्वरूपावर समुद्रबूड जमिनीचा विस्तार अवलंबून आहे. मध्यवर्ती भागातून जाणारी पर्वतरांग या सागरतळावर आढळत नाही. ज्या काही थोड्याफार पर्वतरांगा आहेत, त्या पूर्व भागात आहेत.
या महासागरांत २२०० फेंदम (३९६० मीटर) खोलीवर आढळणारं ‘अलबेट्रॉस’ हे एकमेव पठार महत्त्वाचं असून, मध्य अमेरिकेच्या किनाऱ्यापासून नैऋत्येकडे या पठाराची रुंदी १६०० किलोमीटर इतकी वाढते. आढळणाऱ्या इतर पर्वतरांगांत न्यू केलेडोनियाच्या पश्चिमेस २० अंश दक्षिण अक्षवृत्ताजवळ असलेली न्यूझीलंडची पर्वतरांग व ९६० किलोमीटर रुंद आणि ३०४० किलोमीटर लांब अशा हवाई उंचवट्याचा समावेश होतो.
प्रशांत महासागरात अनेक उथळ आणि लांब-रुंद खळगे आढळतात. फिलिपाईन्स, फिजी, पूर्व ऑस्ट्रेलिया, दक्षिण चिली व दक्षिण ऑस्ट्रेलिया हे काही महत्त्वाचे खळगे आहेत. या महासागरात एकूण ३२ गर्ता असून त्यांतील बऱ्याचशा गर्ता सागराच्या पश्चिम भागात आहेत.
काही महत्त्वाच्या गर्ता पुढीलप्रमाणं आहेत -
१) अल्युशियन गर्ता - सरासरी खोली ६000 मीटर.
२) टस्कारोरा व जपान गर्ता - सरासरी खोली ८000 मीटर.
३) नीरो गर्ता - सरासरी खोली ९००० मीटर.
४) टोंगा गर्ता - सरासरी खोली ८000 मीटर.
५) मरीयाना गर्ता - सरासरी खोली ११000 मीटर.
रोडिनिया या ९० ते ७५ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर असलेल्या महाखंडाचे (Super continent) ७५ कोटी वर्षांनी तुकडे होऊ लागल्यावर प्रशांत महासागराची निर्मिती सुरू झाली. २० कोटी वर्षांपूर्वी ती पूर्ण झाली. या महासागराच्या तळभागावर १८ कोटी वर्षं जुने खडक सापडले आहेत. प्रशांत महासागराच्या सगळ्या किनारपट्टीजवळ पृथ्वीवरील ज्वालामुखींचा आणि सागरी गर्तांचा प्रदेश आहे. याला प्रशांत महासागराचं अग्निकंकण असं म्हटलं जातं. जगातले ७५ टक्के जागृत आणि निद्रिस्त ज्वालामुखी याच पट्ट्यात आहेत. या पट्ट्यात एकूण ४५२ ज्वालामुखी असून पृथ्वीवर होणारे ९० टक्के भूकंपही याच अग्निकंकण पट्ट्यात होताना दिसून येतात.