हिंदी महासागर

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 9 मार्च 2020

समुद्रशोध
समुद्र आणि समुद्रकिनाऱ्यांचं सौंदर्य आणि विविधता कशी जपायची?... 

आफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलिया या तीन खंडांनी वेढलेला हिंदी महासागर जास्त विस्तृत नाही. जगातील सर्व महासागरांनी व्यापलेल्या एकूण पाण्यापैकी केवळ वीस टक्के पाणीच हिंदी महासागरात आहे. तिन्ही भूखंडांनी मर्यादित केलेली याची किनारपट्टी बरीचशी नियमित आहे. आफ्रिका, अरेबिया, पश्चिम ऑस्ट्रेलिया व पश्चिम भारतातील दख्खनच्या गोंडवन कालखंडातील अवशिष्ट पर्वतांनी याची किनारपट्टी बनलेली आहे. 

हिंदी महासागर, दक्षिणेकडं अंटार्क्टिक खंडापर्यंत पसरला असून येथे तो अटलांटिक आणि प्रशांत महासागरात विलीन होतो. या महासागराचं मुख्य वैशिष्टय म्हणजे त्याचा फार मोठा भाग दक्षिण गोलार्धात पसरलेला आहे. उत्तरेला तो जमिनीनं सीमित केला गेल्यामुळं त्याला विशिष्ट आकार प्राप्त झाला आहे. 

हिंदी महासागराच्या तळभागाची रचना अगदी अलीकडेच बरीचशी स्पष्ट झाली आहे. हिंदी महासागराची सरासरी खोली ४००० मीटर असून ‘सागरी मैदान’ (Deep Sea plain) या विभागानं या महासागराचं ६० टक्के इतकं मोठं क्षेत्र व्यापलं आहे. हे मैदान २००० ते ३००० फॅदम (३६०० ते ५४०० मीटर) खोलीवर आहे. समुद्रबूड जमिनीची (Continental Shelf) सरासरी खोली २०० मीटर आहे. रुंदी मात्र सर्व ठिकाणी सारखी नाही. अंदमान समुद्र, बंगालचा उपसागर व अरबी समुद्रांत साधारणपणे १९० ते २१० किलोमीटर रुंदीची समुद्रबूड जमीन आहे. जावा, सुमात्रा बेटांभोवती व ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण किनाऱ्यापाशी फक्त १६० किलोमीटर रुंदीचीच समुद्रबूड जमीन आढळते. पूर्व व मादागास्कर बेटाभोवती ही रुंदी इतकी कमी नाही. या महासागरातील समुद्रबूड जमिनीवर अनुतट प्रवाळ खडक (Fringing coral reef), रोधक प्रवाळ खडक (Barrier  coral reef) आणि कंकणाकृती प्रवाळ खडक (Atoll) मोठ्या प्रमाणावर आढळतात. भूखंड उतार (Continental slope) हा विभाग अतिशय तीव्र उताराचा असून तो अनेक ठिकाणी १० ते ३० अंश इतका दिसून येतो. 

हिंदी महासागरांत ४००० मीटर खोलीवर आढळणारी मध्यवर्ती पर्वतरांग अटलांटिक महासागरातील ‘अटलांटिक रीज’प्रमाणेच पसरली आहेत. अटलांटिक रीजपेक्षा ही पर्वतरांग अधिक रुंद आहे. मात्र, या पर्वतरांगेची शिखरं फार मोठ्या प्रमाणावर सागरपृष्ठावर उघडी पडलेली नाहीत. उत्तरेस लक्षद्वीप बेटांपासून या रांगेची सुरुवात होते. येथे पर्वतरांगेची रुंदी जवळजवळ ३२० किलोमीटर आहे. यास ‘लक्षद्वीप छागोस रीज’ असं म्हटलं जातं. 

विषुववृत्तापासून ३०अंश दक्षिण अक्षवृत्तापर्यंतच्या भागाला ‘छागोस-सेंट-पॉल रिज’ म्हणतात. २० अंश दक्षिणेच्या पुढं ही पर्वतरांग थोडी आग्नेय दिशेला वळते. ६५ ते ११० अंश पूर्व रेखावृत्तांच्या दरम्यान असलेल्या या पर्वतरांगेचा भाग बराच विस्तृत असून ५० अंश दक्षिण अक्षवृत्तापर्यंतच्या या प्रदेशास ‘ॲमस्टरडॅम-सेंट पॉल’ पठार असं म्हटलं  जातं. यापुढं या पर्वतरांगेला दोन फाटे फुटतात. पश्चिमेकडील फाट्याला ‘गॉँसबर्ग रीज’ व पूर्वेकडील फाट्याला ‘इंडियन-अंटार्क्टिक रीज’ म्हणून ओळखण्यात येतं. 

या मुख्य पर्वतरांगेपासून दोन्ही किनाऱ्यांकडं काही फाटे गेले आहेत. आफ्रिकेच्या किनाऱ्याकडं ‘सोकोमा-छागोस रीज’ व ‘सियेलीज रीज’ हे फाटे गेले असून ते एकमेकांस बरेचसे समांतर आहेत. मादागास्करच्या दक्षिणेस असलेली ‘मादागास्कर रीज’ व बंगालच्या उपसागरात ‘अंदमान निकोबार रीज’ हे महत्त्वाचे फाटे आहेत. लक्षद्वीप, न्यू ॲमस्टरडॅम, छागोस, सेंट पॉल, सेशेल्स, प्रिन्स एडवर्ड ही बेटंही या पर्वतरांगेचे वर आलेले शिखराचे भाग आहेत. 

प्रशांत आणि अटलांटिक महासागरांत जशा खोल गर्ता आढळतात; त्या या महासागरांत अभावानंच आढळतात. जावा बेटाजवळील ‘सुंदा’ ही ७४५० मीटर खोलीची गर्ता हा एकमेव अपवाद! इथल्या सामुद्रिक बेटांची संख्याही मर्यादित आहे. मादागास्कर, श्रीलंका, सेशेल्स अशी काही बेटं ही तर मुख्य भूमिखंडाचे समुद्रांत गेलेले भागच आहेत. अंदमान आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरातील बेटं म्यानमारमधील आराकान योमा पर्वताचा समुद्रांत घुसलेला भागच आहे. 

अरबी समुद्रातील लक्षद्वीप आणि मालदीवची बेटं ही प्रवाळ बेटं आहेत. मॉरिशस आणि रियुनिअन ही ज्वालामुखीय शंकू बेटं आहेत. 

तांबडा समुद्र आणि पर्शिअन गल्फ वगळता या समुद्रांत पार्श्ववर्ती समुद्रही फारसे नाहीत. सर्वच दृष्टींनी हा महासागर वेगळा आहे यात शंका नाही! 

संबंधित बातम्या