रायरेश्वर पठार
गुगलवारी
शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा २७ एप्रिल १६४५ या दिवशी जिथे घेतली तो किल्ला म्हणजे रायरेश्वर किल्ला. लोकार्थाने हा किल्ला नसून हे सुमारे साडेनऊ किमी लांब पसरलेले आणि दीड किमी रुंद असे ६ चौ.किमी परिसरात पसरलेले पठार आहे. याची उंची समुद्रसपाटीपासून १,३९३ मीटर आहे.
पठाराच्या चारही बाजूंनी असलेले उंच कडे आणि त्यांचा तीव्र उतार यामुळे काही वर्षांपूर्वीपर्यंत या ठिकाणी जाणे अतिशय दुर्गम होते. मात्र, आता केलेला रस्ता रायरेश्वरच्या कड्याच्या पायथ्यापर्यंत जातो आणि तिथून बेसाल्ट खडकांत असलेले उंच कडे लोखंडी शिडीने चढत वर जाता येते. वर गेल्यावर साधारणपणे एक किमी अंतर चालून गेल्यावर रायरेश्वराचे प्राचीन मंदिर दिसते. वाटेत एक पावसाळी तलाव आणि त्यानंतर एक पाण्याचे टाके लागते. गावातील लोक याच पाण्याच्या टाक्यातील पाणी पिण्यासाठी वापरतात. रायरीचे पठार भोरपासून ८ किलोमीटर अंतरावर आहे. दाट झाडी, खोल दऱ्या, उंचच्या उंच सुळके, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे आणि उंच डोंगर, त्यांच्या लांबच लांब सोंडा आणि आडवळणी घाट रस्ते यामुळे हा परिसर खूपच दुर्गम आहे.
पठारावरचा निसर्ग अजूनही बऱ्यापैकी अस्पर्शीतच आहे. त्या उंचीवरून वातावरण स्वच्छ असेल तर फार मोठा परिसर नजरेस पडतो. थेट उत्तरेला राजगड, तोरणा, ईशान्येला पुरंदर, रोहिडा दिसतात. वायव्येला मनमोहनगड दिसतो. त्याच्या मागे वरंधा घाटातील कावळ्या किल्ला दिसतो. पूर्वी एखाद्या ओढ्यासारखी वाहणारी नीरा नदी आता नीरा-देवधर धरण बांधल्यामुळे प्रचंड जलसागरासारखी दिसते. इथून थेट दक्षिणेला दिसतो उंच आणि बेलाग केंजळगड. पठारावर रायरेश्वराचे मंदिर असून ते तीन खणांचे पूर्वाभिमुख मंदिर आहे. याच देवळातील शिवलिंगावर कदाचित महाराजांनी रुद्राभिषेक केला असावा.
या पठाराचे क्षेत्रफळ काढण्यासाठी गुगल अर्थ संहिता download झाल्यावर संगणकाच्या पडद्यावर (Screen) डाव्या बाजूला वरती दिसणाऱ्या Search म्हणजे शोधा या चौकटीत (Window) रायरेश्वर फोर्ट असे नाव टाइप करा आणि search या अक्षरांवर मूषक दर्शकावरील (Mouse) सरकचक्राच्या (Scroll Wheel) डाव्या बाजूला असलेली कळ (Button) दाबून त्याची नोंद करा (Enter).
रायगड फोर्ट असे नाव दिसल्यावर आता डाव्या बाजूला वरती दिसणाऱ्या Add या संदेशावर क्लिक करा. आता जो तक्ता दिसेल त्यातील Polygon या शब्दावर क्लिक करा. आता तुम्हाला पुन्हा एक तक्ता दिसेल. त्यातील Name या चौकटीत रायरेश्वर असे लिहा. मूषक दर्शकावरील (Mouse) सरकचक्राच्या (Scroll Wheel) मध्यभागी असलेले चक्र तुमच्या दिशेने गोलाकार फिरवून रायरेश्वर पठाराची प्रतिमा पूर्ण दिसेल अशी मिळवा. यानंतर मूषक दर्शकाने style, color येथे क्लिक करा, मिळणाऱ्या पर्यायांपैकी Area या पर्यायात opacity म्हणजे अपारदर्शकता २५ टक्के एवढी करा आणि पडद्यावर दिसणाऱ्या लहान चौकोनाच्या साहाय्याने पठाराच्या सीमेवरून मूषक दर्शक कळ (Button) हव्या त्या ठिकाणी दाबून त्याची नोंद करा (Enter). तुम्हाला पठाराचा तुम्ही निवडलेला आकार दिसेल. आता तक्त्यातील Measurements या ठिकाणी क्लिक केल्यावर त्या प्रदेशाच्या परिघाची लांबी आणि क्षेत्रफळ मिळेल.
(महत्त्वाचे संदर्भ : रायरेश्वर मंदिर, उंची १३३९ मी. १८.०४६/७३.७२०; शिडी स्थान, उंची १२२६ मी. १८.०४०/७३.७२६; दक्षिण कडा, उंची १२६९ मी. १८.०४१/७३.७२६३; केंजळगड, उंची १३३९ मी. १२७२ १८.०२५/७३.७४५; रायरेश्वर पठार, उंची १३९३ मी. १८.०४९/७३.७०६).