गडकिल्ल्यांचे प्रभावी मूल्यमापन 

डॉ. श्रीकांत कार्लेकर
बुधवार, 1 जुलै 2020

गुगलवारी

सह्याद्रीला सर्वसामान्यपणे पश्‍चिम घाट असे म्हटले जाते. समुद्रसपाटीपासून १,५०० मीटर उंचीच्या आणि १,६०० किलोमीटर लांबीच्या दख्खनच्या पठाराची तीव्र उताराची बाजू म्हणजे सह्याद्रीचा कडा. कोकणाकडून पाहिले तर यांची उंची ६०० मीटर इतकी! या पर्वताची महाराष्ट्रातील उत्तर दक्षिण लांबी आहे ४४० किलोमीटर. दख्खन पठाराच्या पश्‍चिम सीमेवर असलेल्या या सह्याद्रीचे दक्षिण टोक मलबारच्या दक्षिणेस आहे. दोडाबेटा येथे त्यांची उंची २,६५२ मीटर आहे. पालघाटच्या पुढे अन्नामलाई पर्वतरांगांतून पश्‍चिम घाट भारतीय द्वीपकल्पाच्या टोकापर्यंत जातो.      
आज आपल्याला ‘गुगल अर्थ’ किंवा ‘गुगल अर्थ प्रो’ ही संहिता (Software) माहितीजाळीवर (Innernet) सहजगत्या उपलब्ध होते. याच्या साहाय्याने जसा जगातील कुठलाही भूप्रदेश आपण अगदी सहजपणे पाहू शकतो, तसाच सह्याद्रीचा हा दुर्गम प्रदेशही पाहता येतो. त्यावरून त्या प्रदेशाची दुर्गमता, सुगमता आणि तिथे असलेले गड, किल्ले, डोंगर, नद्या, दऱ्याखोरी अशा सर्व गोष्टी स्पष्टपणे दिसून येतात. या सगळ्या गोष्टींमुळे त्या प्रदेशाचे व्यवस्थापन, नियोजन, आपत्ती निवारण त्याचप्रमाणे भूसामरिक किंवा रणनीतीच्या संदर्भात नकाशे तयार करणे सहज शक्य होते.  

छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या कठीण, दुर्गम आणि खडतर अशा भौगोलिक परिस्थितीचा आपल्या युद्धतंत्रात नेहमीच अतिशय कौशल्याने वापर करून घेतल्याचे दिसून येते. ते ज्या ज्या ठिकाणी अशा लढाया लढले, ते सगळे प्रदेश आणि तिथे असलेली भूरचना व भूप्रदेश आज आपल्याला गुगल अर्थ (Google  Earth) उपग्रह प्रतिमांवरून पाहता येतात आणि शिवाजी राजांना आजूबाजूच्या भौगोलिक परिस्थितीची किती उत्तम जाण होती ते त्यावरून लक्षात येते. याविषयीची अनेक उदाहरणे आपण यापूर्वीच्या ‘गुगल’वारी या सदरातून पाहिलीच आहेत. ‘गुगल अर्थ’चा वापर करून आपण सगळा भूमिप्रदेश त्रिमिती स्वरूपात (Three Dimensional) कसा पाहू शकतो आणि महाराजांनी लढलेल्या लढायांची वर्णने वाचताना त्या किल्ल्याच्या आणि आजूबाजूच्या भूगोलाचे चित्र पाहून त्याचा अधिक आनंद कसा घेता येतो हेही आपण पाहिले. आजूबाजूचे तीव्र डोंगरकडे आणि प्रदेशाचा उंचसखलपणा, डोंगर दऱ्यांचे उतार अशा गोष्टी कळण्यासाठी प्रदेशाचा उंचीदर्शक छेद (Elevation Profile) मिळवणे, प्रदेशाचे क्षेत्रफळ काढणे, कोणत्याही ठिकाणचा अक्षवृत्त, रेखावृत्त, भूसंदर्भ मिळविणे या गोष्टीही आपण पाहिल्या. पुढे दिलेल्या आणखी काही उदाहरणांसाठीही या पद्धती वापरून पाहता येतील.  

सह्याद्रीच्या महाराष्ट्रातील अति उत्तरेकडील डोंगराळ भूप्रदेशांत अनेक गड किल्ले आहेत. नाशिक जिल्ह्यात तर सह्याद्रीने यामुळेच अनोखे रूप धारण केले आहे. अवाढव्य डोंगर, अवघड अन्‌ उंचच उंच डोंगर आणि सुळके, अनेक नदीनाले यांनी हा भूप्रदेश विलक्षण सुंदर केला आहे. साल्हेर हा महाराष्ट्रातील सर्वांत उंच किल्ला आणि दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर इथेच आहे. याची उंची आहे १,५४० मीटर. महाराष्ट्रातले सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई. तेही नाशिक जिल्ह्यातच आहे. या शिखराची उंची आहे १,६४६ मीटर. या उंच शिखरावरून नजर फिरविली, तर स्वच्छ वातावरणात आजूबाजूच्या अनेक किल्ल्यांची शिखरे अन्‌ डोंगररांगा दिसतात. सगळ्या सह्याद्री पर्वतात असे अनेक अवघड सुळके आहेत. किल्ले रायगडजवळ असाच एक सुळका आहे. याला लिंगाणा म्हणतात. याच्याही माथ्यावरून खूप मोठा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येत असल्याने आणि हा किल्ला रायगडाच्या अगदी नजीक असल्याने शिवकालात चौकी पहाऱ्यांचे हे महत्त्वाचे ठिकाण होते. 

लिंगाण्याप्रमाणेच इतरही गडकिल्ल्यांपर्यंत पोचण्याच्या सह्याद्रीतील वाटा अवघड, त्यावर चढ़ून जाणे अति अवघड. यामुळे सह्याद्रीतील युद्धात गतिमानता राखणे नेहमीच कठीण. नेमक्या याच गोष्टीचा शत्रू सैन्याला नामोहरम करण्यासाठी आणि त्याला गाफील ठेवण्यासाठी शिवाजी राजांनी परिणामकारकपणे कसा उपयोग करून घेतला असावा, याची गुगल अर्थच्या साहाय्याने नेमकी कल्पना आपल्याला येऊ शकते. सह्याद्रीतील सर्वच गड किल्ल्यांचे भौगोलिक आणि भूशास्त्रीय मूल्यमापन करण्यासाठी गुगल अर्थ हे अतिशय प्रभावी तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान केवळ गड किल्ल्यांसाठी नाही, तर कोणत्याही भौगोलिक प्रदेशाकरिता तितकेच फायदेशीर आहे यात शंका नाही.                                 (समाप्त)

संबंधित बातम्या