विविध समुद्र किनारे 

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 13 जुलै 2020

समुद्रशोध
समुद्र आणि समुद्रकिनाऱ्यांचं सौंदर्य आणि विविधता कशी जपायची?... 

 

समुद्रशोध - डॉ. श्रीकांत कार्लेकरजगातल्या सगळ्या समुद्रांच्या किनारी भागांत विविध प्रकारच्या किनारपट्ट्या तयार झाल्याचे दिसून येते. भूपृष्ठावर होणाऱ्या ऊर्ध्वगामी (Verticle) हालचालींचा किंवा समुद्रतळ खचण्याचा  (Subsidence) परिणाम होऊन किनारपट्ट्यांचे स्वरूप बदलत असते. सागर पातळीत जागतिक (Global) आणि स्थानिक (Local) बदल झाल्यामुळेही किनाऱ्यांचे स्वरूप बदलते आणि अनेक प्रकारचे समुद्र किनारे तयार होतात. बऱ्याच  किनाऱ्यांवर  उंच किंवा डोंगराळ अगर टेकड्यांचे प्रदेश असतात. भूपृष्ठाच्या अधोगामी हालचालींनी किनारा खचल्यामुळे ते बुडतात. त्यामुळे भूशिरे (Headlands) व उपसागर (Bays) यांनी युक्त अशी दंतुर किनारपट्टी (Indented) तयार होते. अशा किनाऱ्यांवर लघु पुळणी (Pocket Beaches) व द्वीपे आढळून येतात. काही ठिकाणी नद्यांची  व काही ठिकाणी हिमनद्यांची बुडालेली खोरी या  प्रकारच्या किनाऱ्याच्यावर  दृष्टीस पडतात. अशा बुडालेल्या डोंगराळ  किनाऱ्यांचे तीन उपप्रकार आढळतात : अ) रिया,  ब) फिओर्ड, क) डालमेशियन.

अ) रिया (Ria) : किनाऱ्यावर असलेली नद्यांची खोरी पाण्याखाली बुडून रिया  किनारा तयार होतो. वायव्य स्पेनच्या किनारपट्टीवरून रिया हे नाव पडलेले आहे. रिया किनाऱ्याचा आकार नरसाळ्यासारखा  म्हणजे समुद्राकडे रुंद व जमिनीकडे निमुळता  असून किनाऱ्यावरील डोंगर रांगा किनाऱ्याला काटकोनात किंवा थोड्या तिरकस  असतात. रिया  किनाऱ्यावर  भूशिरे, उपसागर व खाड्या  असून दोन भूशिरांमधील उपसागर सुरक्षित व खोल असतात. त्यामुळे अशा किनाऱ्यांवर चांगली बंदरे निर्माण होऊ शकतात. अंदमान व कोकणच्या किनारपट्टीचा काही भाग या प्रकारात मोडतो.  

 ब) फिओर्ड (Fjords) : हिमनद्यांची खोरी अधोगामी हालचालींमुळे समुद्रात बुडून फिओर्ड्‌स तयार होतात. रियांच्या तुलनेने फिओर्ड्‌स खूपच खोल असतात. फिओर्ड्‌सचे काठ उंच व उभ्या भिंतीप्रमाणे असतात. बुडालेली खोरी इंग्रजी 'U' आकाराची व उभ्या भिंतीप्रमाणे असल्यामुळे ही फिओर्ड्‌सना प्राप्त होतात. बहुतेक फिओर्ड्‌स एकमेकांना काटकोनात असतात. फिओर्ड्‌सच्या मुखाशी उंबरठे (Thresholds) तयार झालेले आढळतात. त्यामुळे फिओर्ड्‌सची समुद्राकडील बाजू उथळ व जमिनीकडील बाजू खोल असते. रियाप्रमाणेच फिओर्ड्‌सवरील डोंगररांगा काटकोनात किंवा तिरकस असतात. उंबरठ्यामुळे काही ठिकाणी जलवाहतुकीत अडथळे निर्माण होतात. मध्यकटिबंधातील हिमक्षयित प्रदेशात प्रामुख्याने फिओर्ड किनारपट्टी आढळते. नॉर्वेतील  फिओर्डस स्कँडेनेव्हियातील पठारात घुसलेली आढळतात.

क) डालमेशियन किनारे (Dalmeshian) : किनाऱ्याला समांतर असलेल्या पर्वतरांगा बुडून वरील प्रकारची किनारपट्टी तयार होते. बुडालेल्या पर्वतरांगांचे शिखराजवळील भाग पाण्याच्यावर दिसून येतात. ही किनारपट्टी सरळ व नियमित असते. म्हणजे किनारपट्टी खोल व दंतुर नसल्याने खोल व सुरक्षित पाणी उपलब्ध होऊ शकत नाही व डालमेशियन किनाऱ्यावर चांगली बंदरे आढळत नाहीत. युगोस्लाव्हियाच्या आड्रियाटिक समुद्रावरील डालमेशियन स्पीटवरील प्रकारात मोडते. त्यावरूनच हे नाव आले आहे.  

 काही वेळा डोंगराळ भागांऐवजी सखल प्रदेश समुद्रात बुडूनही किनारे तयार होतात. 

हाफ नेहरूंग किनारा (Half Nehrung coast ) : जर्मनीची बाल्टिक किनारपट्टी बुडालेली व सखल प्रकारची आहे. 'नॉर्थ सी'च्या भागात किनाऱ्यावरील वाळूचे दांडे समुद्रात बुडून व काहींचे माथे सागरपातळीवर राहिल्‍याने वाळूची बेटे तयार झालेली आहेत. वाळूचे दांडे, बेटे व किनारा यांच्या दरम्यान 'लगून्स' तयार झालेली आहेत. अशा प्रकारच्या दांडे व लगून्स यांनी युक्त असलेल्या किनाऱ्यांना हाफ नेहरूंग किनारा असे म्हणतात (हाफ म्हणजे सरोवर आणि नेहरूंग म्हणजे वाळूचा दांडा). 

प्रस्तरभंगामुळे (Faulting) किंवा ऊर्ध्वगामी हालचालींमुळे  किनाऱ्यावरील भूमीप्रदेश उंचावला जातो व उंचावलेले किनारे तयार होतात. उत्थापित पुळणी (Raised beaches ) हे अशा प्रकारच्या किनाऱ्यांचे वैशिष्ट्य असते. साधारणपणे ही किनारपट्टी नियमित व सरळ असते. किनाऱ्यावर सागरी कडे (Sea Cliffs) असतात व समुद्राच्या पाण्याची खोली जास्त असते. 

संबंधित बातम्या