त्सुनामी लाटा 

डॉ. श्रीकांत कार्लेकर 
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

समुद्रशोध
समुद्र आणि समुद्रकिनाऱ्यांचं सौंदर्य आणि विविधता कशी जपायची?... 

समुद्रतळावर किंवा तळाखाली होणारा भूकंप हे त्सुनामी लाटांच्या निर्मितीतले पहिले व महत्त्वाचे कारण मानण्यात येते. मात्र याचबरोबर सागरतळावर होणारे ज्वालामुखीचे उद्रेक किंवा सागरतळावरील उंचसखल प्रदेशात दरड कोसळण्यासारख्या घटनाही त्सुनामीच्या निर्मितीस कारण ठरतात.

एकदा या लाटा भूकंप प्रदेशाजवळच्या समुद्रावर तयार झाल्या, की त्या वेगाने आजूबाजूच्या प्रदेशात पसरतात. वाऱ्याचा वेग आणि भूकंप स्थानाचे किनाऱ्यापासून असलेले अंतर यावर त्सुनामीच्या लाटांची तीव्रता ठरते. ताशी ८०० किमीच्या वेगाने या लाटा किनाऱ्याकडे सरकू शकतात. किनाऱ्याकडे येताना समृद्रतळाची खोली कमी होत जात असल्यामुळे लाटांचा वेग कमी होतो, पण त्यांची उंची सतत वाढत राहते. त्यामुळे किनाऱ्यावर वीस मीटर किंवा त्याहीपेक्षा जास्त उंचीच्या लाटा येऊन आपटतात. ही सगळी घटना इतकी वेगवान असते, की त्यापासून बचाव करायला किंवा त्याची सूचना मिळायलाही खूपच कमी अवधी मिळतो. 

जगात अशाही घटना घडलेल्या आहेत, की ज्यात त्सुनामी लाटा येऊन गेल्यावर तासाभराने पुन्हा तितक्याच उंचीच्या लाटा त्याच दिवशी त्याच ठिकाणी येऊन किनाऱ्यावर आपटल्या. बऱ्याच त्सुनामी लाटा प्रशांत  महासागरात तयार होतात; कारण त्याच्या सीमावर्ती प्रदेशात ज्वालामुखीय बेटे व ज्वालामुखीय चाप, पर्वतरांगा आणि विध्वंसक तबक सीमा आहेत. यास सामान्यपणे प्रशांत महासागराचे अग्निकंकण म्हटले जाते.

त्सुनामी या भरतीच्या लाटा नाहीत. हवामानातील बदलामुळेही त्या तयार होत नाहीत. त्या खऱ्या अर्थाने भूकंपामुळे तयार झालेल्या सागरी लाटा आहेत. खोल समुद्रात किनाऱ्यापासून दूर या लाटांची तरंग लांबी (Wave length) २०० किमी इतकी विस्तृत आणि तरंग खोली केवळ काही मीटर इतकी असते. त्यामुळे किनाऱ्यापासून दूर असलेल्या गलबताला किंवा जहाजाला या लाटा जाणवत नाहीत. समुद्रावरून जाणाऱ्या हेलिकॉप्टर्सनाही त्या दिसत नाहीत. मात्र या लाटा जसजशा किनाऱ्यावर येतात तसतशा त्या अधिकाधिक उंच व विध्वंसक होतात.

त्सुनामी हा शब्द जपानी असून त्याचा अर्थ आहे ‘हार्बर वेव्हज’ किंवा ‘बंदरातील लाटा’. निर्मितीच्या ठिकाणापासून हजारो मैलांचा प्रवास करणाऱ्या या लाटा प्रचंड ऊर्जेची साठवण करीत किनाऱ्यापर्यंत पोचतात आणि किनाऱ्याजवळ मोठी हानी करतात. 

एका खगोलशास्त्रीय सिद्धांतानुसार, अतिप्राचीन भूशास्त्रीय कालखंडात उल्कापात, धूमकेतू यांच्यामुळेही महासंहारक अशा त्सुनामी लाटा निर्माण झाल्या असाव्यात. आजच्या भूपट्ट सिद्धांतानुसार (Plate Tectonics), जिथे दोन भूपट्ट एकमेकांजवळ येतात, तिथे अधिक जाड व घन भूपट्ट हलक्या भूखंडाखाली जातात व त्यामुळे भूकंप होऊन या लाटा निर्माण होतात. चिली, निकाराग्वा, मेक्सिको, इंडोनेशिया इथे भूपट्टातील अशा क्रिया-प्रक्रियांमुळे गेल्या दशकात अशा लाटा निर्माण झाल्याच्या नोंदी आहेत. एकट्या प्रशांत महासागरात १९२१ ते १९९६ या ७५ वर्षांत १७ त्सुनामी लाटांची निर्मिती झाली.

समुद्रतळावर एकदा भूकंप झाल्यानंतर पुन्हा काही तासांत आणखी भूकंप होऊन या संकटात भर पडत राहते. त्सुनामी लाटांवर वाऱ्यांचा पडणारा प्रभाव वरच्या केवळ काही मीटरमध्येच राहतो. खूप खोलीवर ही लाट खूपच विध्वंसक स्वरूपाची असते. या लाटा वेगवान असल्यामुळे त्यांची विध्वंसक ऊर्जा कमी होण्याचे प्रमाण खूपच कमी असते. 

त्सुनामींचा किनाऱ्यावर होणारा परिणाम ही एक विलक्षण घटना आहे. त्सुनामी येण्याच्या आधी काही ठिकाणी किनाऱ्यावरचे समुद्राचे पाणी आकस्मिकपणे ओहोटीसारखे झपाट्याने खाली किंवा मागे जाते आणि काही वेळातच जोराने परत त्याच्या पूर्वस्थानी येते. नेहमीच्या समुद्रलाटांसारख्या त्सुनामी लाटा अंतर्वक्र अशा वाकून फुटत नाहीत. त्सुनामीच्या तडाख्यातून वाचलेल्यांनी केलेल्या वर्णनानुसार या लाटा उभ्या भिंतीसारख्या उंचच उंच वाढत जातात. त्सुनामींचा परिणाम सर्वत्र एकसारखा दिसतो. प्रचंड वृक्ष एखाद्या लहान झाडासारखे तुटून पडतात, तटरक्षक भिंती अक्षरशः वाहून जातात, किनाऱ्यावरील दीपगृहे, बंदरे, धक्के, इमारती जमीनदोस्त होतात.

किनाऱ्याजवळच्या सागरतळाची रचना व किनाऱ्याची रचना (Configuration) यांचा त्सुनामी लाटांच्या उंचीवर मोठाच परिणाम होतो. कोकणासारख्या खडकाळ व भूशिरांनी (Headlands) युक्त किनाऱ्यावर  पूर्वेकडच्या सपाट किनाऱ्यापेक्षा या लाटांचा कमी प्रभाव पडतो. 

संबंधित बातम्या