समुद्राचा खारटपणा 

डॉ. श्रीकांत कार्लेकर 
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

समुद्रशोध  एंटरटेनमेंट
समुद्र आणि समुद्रकिनाऱ्यांचं सौंदर्य आणि विविधता कशी जपायची?... 

समुद्राच्या पाण्यात अनेक प्रकारचे क्षार विरघळलेले असतात. यामुळेच समुद्राच्या पाण्याला खारटपणा प्राप्त होतो. यातील बरेचसे क्षार समुद्रांच्या निर्मितीपासून त्यांच्या पाण्यात विरघळलेले असावेत. नद्यांच्या पाण्यातून जे क्षार समुद्रात येऊन पडतात, त्यांचे प्रमाण त्या मानाने फारच कमी असते. सोडियमचे क्षार सागरजलात जास्त असतात. याउलट कॅल्शिअम क्षार नदीच्या पाण्यात जास्त असतात. निरनिराळ्या समुद्रातील सागरजलाची क्षारता निरनिराळी असल्याचे आढळते. शिवाय खोलीनुसार क्षारतेचे प्रमाण कमी-अधिक होते. सागरजलात विरघळलेल्या क्षारांच्या दरहजारी प्रमाणास क्षारता असे म्हणतात. १००० ग्रॅम पाण्यात किंवा एक लिटर पाण्यात ३५ ग्रॅम क्षार विरघळलेले असल्यास त्या पाण्याची क्षारता ३५ ०/०० (दर हजारी ३५) आहे असे म्हटले जाते.

क्षारतेमुळे सागरजलाच्या गोठणबिंदू तापमानात (Freezing Point Temperature) फरक पडतो. क्षारता जितकी जास्त तितका सागरजलाचा गोठणबिंदू कमी असतो. उत्तर समुद्र (North Sea) हा उच्च अक्षांशात असूनही त्याच्या अधिक क्षारतेमुळे हिवाळ्यात गोठत नाही. सागर रचना, सागरजलाच्या हालचाली, सागरजलातील मासे, जलशैव व इतर सागरी जीवांचे वितरण यांवरही क्षारतेचा कमी-जास्त प्रमाणात परिणाम होत असल्याचे दिसते. 

सोडिअम क्लोराईड, मॅग्नेशिअम क्लोराईड, मॅग्नेशिअम सल्फेट, कॅल्शिअम सल्फेट, पोटॅशिअम सल्फेट, कॅल्शिअम कार्बोनेट आणि मॅग्नेशिअम ब्रोमाईड या क्षारांव्यतिरिक्त सागरजलात इतर काही क्षारही अत्यल्प प्रमाणात आढळतात, उदाहरणार्थ आयोडीन, फ्लोरीन, निकेल, कोबाल्ट, झिंक इत्यादी. 

सागरजलाची क्षारता सगळीकडे सारखी नसून तिच्या वितरणात पुढील कारणामुळे बदल होताना दिसतात. 

  1. बाष्पीभवन : जास्त तापमानाच्या, जोरदार वाऱ्यांच्या आणि कमी पावसाच्या प्रदेशात बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो. बाष्पीभवनाचा वेग वाढल्यास सागरजलाची क्षारता वाढते.
  2. वृष्टी : जास्त पावसाच्या प्रदेशात, सागरजलाची क्षारता कमी होते. विषुववृत्तीय प्रदेशात उष्णता जास्त असूनही, वर्षभर पडणाऱ्या पावसामुळे हा परिणाम दिसतो. ध्रुवीय प्रदेशात मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी होते, त्यामुळे ध्रुवीय प्रदेशातील सागरजलाची क्षारता कमी होते.
  3. नद्यांनी वाहून आणलेले शुद्ध पाणी : नद्या जितक्या जास्त प्रमाणात शुद्ध पाणी समुद्रात आणून ओततात, तितकी सागरजलाची क्षारता कमी होते. ॲमेझॉन, कांगो, नायगर आणि सेंट लॉरेन्स नद्यांच्या मुखाजवळील समुद्रात क्षारता कमी आहे. बाल्टिक समुद्रासारख्या भूवेष्टित समुद्रात अनेक नद्या येऊन मिळत असल्यामुळे क्षारता कमी होते. हिमनग वितळून शुद्ध पाण्याचा पुरवठा होतो व क्षारता कमी होते.
  4. समुद्रप्रवाह व सागरजलाच्या हालचाली : समुद्रप्रवाहामुळे होणाऱ्या सागरजलाच्या हालचालींमुळे क्षारतेत बदल होतो. लॅब्राडोरच्या शीत प्रवाहामुळे अमेरिकेच्या ईशान्य किनाऱ्याजवळ सागरजलाची क्षारता कमी झाली आहे, तर गल्फ प्रवाहामुळे ब्रिटिश बेटांजवळ ती वाढली आहे.

सागरजलाच्या क्षारतेत ऋतुमानाप्रमाणे बदल होताना आढळतो. सागराची क्षारता वर्षभर सारखी राहत नाही.  साधारणतः जूनच्या अखेरीस सागरजलाची क्षारता, जास्त बाष्पीभवनामुळे वाढते, तर डिसेंबरच्या अखेरीस क्षारता सर्वांत कमी होते.

खुल्या समुद्राशी, अरुंद भागाने जोडल्या गेलेल्या अर्धभूवेष्टित (Semi enclosed) किंवा पूर्णपणे जमिनीने वेढलेल्या भूवेष्टित (Landlocked ) समुद्राच्या पाण्याची क्षारता उष्णतेच्या प्रमाणातील बदल व समुद्रात येऊन  पडणाऱ्या शुद्ध पाण्याच्या प्रमाणातील बदल यामुळे बदलते. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे भूमध्य सागरातील पाणी अटलांटिक महासागरातील पाण्याबरोबर सहज मिसळू शकत नाही. जिब्राल्टरच्या अरुंद सामुद्रधुनीने भूमध्य समुद्र  अटलांटिकशी जोडलेला आहे. या सामुद्रधुनीत सुमारे ३०० मीटर खोलीवर एक उंचवटा आहे; त्यामुळे या दोन समुद्रातील पाण्याचे सहज मिश्रण होत नाही. जवळच्या लहान नद्यांतून शुद्ध पाण्याचा थोडाफार पुरवठा हा भूमध्य समुद्रात होतो. उन्हाळ्यात, भूमध्य सागरातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होते. पाऊस अगदीच कमी असतो. त्यामुळे त्या सागरजलाची क्षारता वाढते. 

खंडान्तर्गत समुद्र किंवा सरोवरे यांना येऊन मिळणाऱ्या नद्यांच्या  पाण्यातून जे क्षार येतात ते त्यात साठवले जातात. अशा जलाशयातील पाणी खुल्या समुद्रात जात नसल्यामुळे त्यातील पाण्याची क्षारता वाढत राहते. सर्वसाधारणपणे सागरजलाची क्षारता विषुववृत्तापासून ध्रुवाकडे कमी कमी होत जाते. मात्र विषुववृत्तापाशी वर्षभर पडणाऱ्या  पावसामुळे क्षारता थोडी कमी होते. 

संबंधित बातम्या