समुद्रातील प्रवाह

डॉ. श्रीकांत कार्लेकर 
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

समुद्रशोध
समुद्र आणि समुद्रकिनाऱ्यांचं सौंदर्य आणि विविधता कशी जपायची?... 

समुद्रातील प्रवाह (Ocean Currents) या समुद्र लाटांपेक्षा अधिक महत्त्वाच्या अशा हालचाली असून, या हालचाली समुद्रांत आडव्या आणि उभ्या दोन्ही दिशेने घडताना दिसून येतात. हे प्रवाह निरनिराळ्या खोलीवर आढळतात. हे प्रवाह बराच मोठा प्रदेश व्यापतात. या दृष्टीने पाहता प्रत्येक समुद्रप्रवाह विस्तृत आकाराचा असतो. 

सर्व समुद्रप्रवाहांच्या निर्मितीस पुढील घटक कारणीभूत होतात : (१) गुरुत्वाकर्षण शक्ती, (२) पृथ्वीच्या परिवलनामुळे तयार होणारी केंद्रोत्सारी प्रेरणा, (३) वायुभारातील बदल, (४) प्रचलित वारे आणि त्यांची घर्षणशक्ती, (५) सागरजलाचे तापमान, (६) सागरजलाची क्षारता व घनता आणि (७) बर्फाचे विलयन.

गुरुत्वाकर्षणशक्ती : पृथ्वीचा विषुववृत्तीय भाग फुगीर व ध्रुवीय भाग चपटा असल्यामुळे, ध्रुवाजवळ गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त असते. त्यामुळे ध्रुवीय प्रदेशातील सागरप्रवाहावर विषुववृत्तीय सागरप्रवाहापेक्षा अधिक गुरुत्वशक्ती कार्य करते.

केंद्रोत्सारी प्रेरणा : पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. त्यामुळे सागर प्रवाहांच्या मूळ दिशेत एका विशिष्ट पद्धतीने बदल होतो. सर्वसामान्यपणे विषुववृत्तापाशी निघालेला सागरप्रवाह सरळ रेषेमध्ये ध्रुवाकडे जाईल, परंतु पृथ्वीच्या या गतीमुळे उत्तर गोलार्धात तो त्याच्या मूळ दिशेच्या उजवीकडे वळतो व दक्षिण गोलार्धात तो मूळ दिशेच्या डावीकडे वळतो. या परिणामास ‘कोरीआलिस’ (Coriolis) परिणाम किंवा फेरेलचा नियम असे म्हणतात.

वायुभारातील बदल : समुद्राच्या पृष्ठभागावर जास्त वायुभाराचा पट्टा निर्माण झाल्यास त्याचा परिणाम समुद्रप्रवाहावर झाल्याचे आढळून येते. अशा ठिकाणी पाण्याच्या पृष्ठभागावर दाब पडून तेथील समुद्रप्रवाह कमी वायुभार असलेल्या पृष्ठभागाकडे जातो.

प्रचलित वारे व त्यांची घर्षणशक्ती : वाऱ्यांच्या दिशेचा समुद्रप्रवाहावर फार मोठा परिणाम झाल्याचे आढळून येते. प्रचलित वाऱ्यांचे सागरपृष्ठाशी जे घर्षण होते, त्यामुळे प्रामुख्याने समुद्रप्रवाह निर्माण होतात हे आता सर्वमान्य झाले आहे. समुद्रप्रवाहाची केवळ दिशाच या वाऱ्यांमुळे ठरते असे नव्हे, तर त्यांच्या वेगावरही वाऱ्याचा परिणाम होतो.  उत्तर आणि दक्षिण गोलार्धात सर्वसामान्यपणे व्यापारी व प्रतिव्यापारी वाऱ्यांच्या दिशेने समुद्रप्रवाहांची हालचाल होते. हिंदी महासागरात ऋतुमानाप्रमाणे मोसमी वाऱ्यांची दिशा बदलत असल्यामुळे प्रवाहांची दिशाही बदलते.

सागरजलाचे तापमान : वातावरणाप्रमाणेच समुद्रही काही ठिकाणी उष्णतेचे शोषण करतात, तर काही ठिकाणी उष्णतेचे उत्सर्जन करतात. त्यामुळे सागरजलाच्या तापमानात फरक पडतो. निरनिराळ्या अक्षवृत्तांवर सागरजलात शोषल्या जाणाऱ्या उष्णतेत फरक पडल्यामुळे प्रवाह निर्माण होतात. साधारणतः विषुववृत्तीय प्रदेशातील पाण्याचे तापमान ध्रुवीय प्रदेशातील पाण्यापेक्षा जास्त असते. जास्त तापमानामुळे विषुववृत्तीय प्रदेशातील पाण्याचे प्रसरण होते व ते ध्रुवीय प्रदेशाकडे वाहू लागते. विषुववृत्तापाशी निर्माण झालेली ही पाण्याची पोकळी भरून काढण्यासाठी ध्रुवाजवळील थंड, जड पाणी खाली जाते व पाण्याच्या पृष्ठाखालून विषुववृत्तीय प्रदेशाकडे वाहू लागते. या प्रमुख दोन आडव्या प्रवाहांच्यामुळे आणखी दोन उभे प्रवाह निर्माण होतात. विषुववृत्तापाशी पाण्याखालून पृष्ठाकडे व ध्रुवावर पृष्ठापासून पाण्याखाली असे हे प्रवाह जातात. अशा रीतीने प्रवाहाचे एक पूर्ण चक्र तयार होते. या सर्वसामान्य प्रवाहचक्रामध्ये काही वेळा स्थानिक तापमानामुळे फरक पडतो. ध्रुवीय प्रदेशाकडून पाण्याखालून विषुववृत्तीय प्रदेशाकडे येणाऱ्या प्रवाहास थंड प्रवाह (Cold Current) व विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे पृष्ठभागावरून जाणाऱ्या प्रवाहाला उष्ण प्रवाह (Warm Current) असे म्हणतात. 

सागरजलाची क्षारता व घनता : क्षारता जास्त असलेल्या पाण्याची घनता जास्त असल्यामुळे असे पाणी खाली जाते. याउलट कमी क्षारतेचे, कमी घनतेचे, हलके पाणी वर येते. जास्त क्षारतेच्या पाण्याचा प्रवाह सागरपृष्ठाखालून व कमी क्षारतेच्या पाण्याचा प्रवाह सागरपृष्ठावरून वाहतो.

बर्फांचे विलयन : बर्फाच्या वितळण्यामुळे थंड प्रदेशातील समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते. त्यामुळे अर्थातच पाण्याची क्षारताही कमी होते.

याशिवाय, किनारपट्टीचा आकार व स्वरूप आणि ऋतूप्रमाणे होणारे  

वाऱ्यातील स्थानिक बदल यांचाही समुद्रप्रवाहावर परिणाम होतो. किनारपट्टीच्या अडथळ्यांमुळे मुख्य समुद्रप्रवाहापासून अनेक उपप्रवाहसुद्धा निर्माण होतात. प्रशांत, अटलांटिक आणि हिंदी महासागरात समुद्रप्रवाहांची विशिष्ट चक्रे तयार झाली असून त्यावरही आजूबाजूच्या किनारपट्टीच्या रचनेचा परिणाम झाल्याचे दिसून येते. 

संबंधित बातम्या