किनाऱ्यावरील पुळणी (भाग १)

डॉ. श्रीकांत कार्लेकर 
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

समुद्रशोध  : एंटरटेनमेंट
समुद्र आणि समुद्रकिनाऱ्यांचं सौंदर्य आणि विविधता कशी जपायची?... 
डॉ. श्रीकांत कार्लेकर

भरती ओहोटीच्या मर्यादित भागांत, समुद्रकिनाऱ्यावरच्या लहान, मोठ्या, सर्व प्रकारच्या अंतर्वक्र भागात होणाऱ्या  शंख, शिंपले व वाळूच्या संचयनाला पुळण (Beach) असे म्हटले जाते. उसळणाऱ्या समुद्रलाटांच्या समोर, किनाऱ्यावर पुळणी ज्या भागात तयार होतात, तेथे त्या तयार होणे हे खरोखरच एक आश्चर्य आहे. वाळूच्या संचयनासाठी केवळ अशक्य वाटाव्या अशा ठिकाणी या पुळणी आढळतात. पण तरीही जगातल्या, वाळूच्या  अतिशय सुंदर, लांब, रुंद व विस्तृत पुळणी प्रचंड वेगाने किनाऱ्यावर येऊन आपटणाऱ्या लाटांच्या समोरच तयार झालेल्या आहेत. इतक्या धोकादायक ठिकाणच्या पुळणीच्या अस्तित्वाचे रहस्य हे वाळूच्या लहान मोठ्या आणि  सुट्या सुट्या कणांत लपलेले आहे. पुळणीवरचा प्रत्येक कण, लाटांच्या बदलणाऱ्या शक्तीशी, वेगाशी आणि दिशेशी लिलया जुळवून घेऊ शकतो. त्यामुळेच अशा सर्व पुळणी अस्तित्वासाठी आवश्यक असे संतुलन साधून किनाऱ्यावर वर्षानुवर्षे आपल्या जागेवर स्थिर असतात. समोरच्या समुद्राशी सहजपणे जुळवून घेण्याच्या पुळणींच्या वृत्तीमुळे, वेगवेगळ्या सागरी हवामानात (Marine Climates) पुळणी वेगवेगळ्या रूपात आपल्या समोर येतात आणि त्यामुळेच पुळण हे समुद्राचे एक विलक्षण आकर्षक आणि मनोवेधक असे शिल्प असल्याचे सतत जाणवते.

प्रत्येक पुळण भरतीच्या वाढणाऱ्या पाण्याबरोबर अरुंद होत जाते आणि उडणारे पाणी वाळूत झिरपल्यामुळे तिचा रंगही बदलतो. ओहोटीच्या वेळी पुळणीवरची वाळू हळूहळू पाण्याबाहेर येते व लगेचच कोरडी होऊन लखलखू लागते. ओहोटीच्या पाण्याचे लहान लहान प्रवाह पुळणीवर समुद्राच्या दिशेने तयार होतात. वाळूत अतिशय सूक्ष्म आकाराचे त्रिभुज सदृश आकार दिसू लागतात. भरतीच्या पाण्याबरोबर वाहत आलेल्या जलशैवाची (Sea weeds) एक लांबच लांब अशी रेषा पुळणीवर दिसू लागते. थोड्याच वेळात पुळणीवरच्या वाळूतून लहान  लहान सागरी जीव (Burrowing organisms) हवा घेण्यासाठी पृष्ठभागावर येतात आणि आपापल्या परीने वाळूवर निरनिराळे आकार तयार करतात. पुळणीच्या जमिनीकडच्या बाजूवर, किनाऱ्याला समांतर असा एक भरती प्रवाह तयार झालेला असतो. त्यातले पाणी झपाट्याने ओसरू लागते. ओहोटीच्या वेळी पुळणीला पुन्हा एकदा जणू नवजीवन मिळते! अव्याहत बदल हा इथला स्थायिभावच आहे! लागोपाठच्या दोन दिवसातली पुळण कधीही सारखी नसते. प्रत्येक भरती ओहोटी दरम्यान आणि ऋतूनुसार इथे बदल होत असतात. जागतिक पातळीवर घडणाऱ्या हवामान बदल आणि तापमानवाढ यांसारख्या घटनांचा इथे लगेच परिणाम दिसतो.

भरती ओहोटीच्या तफावतीशी (Tidal Range) पुळणीने इतके नेमके संतुलन साधलेले असते, की कुठेही संघर्षाची शक्यता उरत नाही. ओहोटी पूर्ण होऊन सगळी पुळण पुन्हा एकदा स्वच्छ पांढऱ्या वाळूसह तापू लागली, की हळूहळू भरतीचे वेध लागतात आणि पुढच्या सहा तासांत पुळणीचे रूप पुनश्च बदलू लागते. समुद्र किनाऱ्यावरील पुळण हे इतके सुंदर शिल्प दर सहा तासांनी अशा प्रकारे सदैव कायापालट करीत असते! त्याला नेहमीच असलेली उसळत्या लाटांची झालर आणि लखलखत्या चंदेरी वाळूचे आच्छादन यामुळे जगातल्या सगळ्याच किनारी पुळणी पर्यटकांचे आकर्षण ठरल्या आहेत. 

पावसाळ्याच्या दिवसांत या पुळणींच्या अस्तित्वाला आव्हान असते ते रौद्र रूप धारण केलेल्या समुद्राचे. कोकण  किनाऱ्यावर पावसाळ्याच्या चार महिन्यांत सगळीकडे पुळणी अरुंद होतात. त्यांच्या समुद्रवर्ती (Seaward) बाजूच्या बऱ्याच भागाची, तो भाग समुद्राने गिळंकृत केल्यामुळे क्षती होते. पुळणीच्या जमिनीकडच्या बाजूवर, उडत आलेल्या वाळूचे ढीग तयार होतात. सगळी वाळू ओली, चिकट झालेली असते. शेतजमिनी व वस्त्यांच्या बाजूने वाहत येणाऱ्या पाण्याबरोबर लहान मोठी झुडुपे, काड्याकुड्या आणि इतर तरंगणाऱ्या पदार्थांचे संचयन पुळणीवर होत राहते. पावसाळ्यांत पुळणी झिजतात, तर वर्षाच्या उरलेल्या कोरड्या ऋतूंत पुळणी रुंदावतात, वाढतात. पुळणी कोरड्या ऋतूंत जितक्या आकर्षक दिसतात, तितक्याच किंबहुना थोड्या अधिकच मनोवेधक पावसाळ्यात दिसतात. 

सामान्यपणे बऱ्याचशा पुळणी या वाळूच्या असल्या, तरी काही पुळणीवर चिखलाचे प्रमाणही वाढताना दिसते. कोकण किनाऱ्यावर आढळणाऱ्या पुळणी खूपच वैविध्यपूर्ण आहेत. कोकणच्या किनाऱ्यावर तर दर दोन, तीन किमीच्या अंतरावर एखादी तरी पुळण असतेच. रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथल्या पुळणीवर वेगवेगळ्या खडक आणि खनिजांपासून तयार झालेली काळ्या, लालसर व पांढऱ्या रंगाची वाळू आढळते. 

संबंधित बातम्या