किनाऱ्यावरील पुळणी (भाग २)

डॉ. श्रीकांत कार्लेकर  
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

समुद्रशोध  : एंटरटेनमेंट
समुद्र आणि समुद्रकिनाऱ्यांचं सौंदर्य आणि विविधता कशी जपायची?... 

पावसाळ्यात सर्वच पुळणींची अतोनात क्षती होते आणि त्या अरुंद होतात. पुळणींच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोंगराळ किनारपट्टीच्या प्रदेशातल्या पुळणी नेहमीच आकाराने लहान व संख्येने जास्त असतात. याउलट जिथे किनारपट्ट्या सपाट मैदानी आहेत, तिथे पुळणीही रुंद, लांब आणि संख्येने कमी असतात. कोकणातल्या सर्व पुळणी पहिल्या प्रकारात, तर चेन्नई, जगन्नाथपुरी, कोणार्क इथल्या पुळणी दुसऱ्या प्रकारात मोडतात.

बऱ्याचशा पुळणी या वाळूच्या असल्या, तरी रेवसच्या उत्तरेला बोर्डीपर्यंत वाळूबरोबर पुळणीवर चिखलाचे प्रमाणही वाढताना दिसते. बोर्डी इथे ओहोटीच्या वेळी उघड्या पडणाऱ्या लांबलचक व रुंद पुळणीवरून चालताना, आपण चिकट, निसरड्या, चिखलयुक्त प्रदेशातून चालत असल्याचे स्पष्टपणे जाणवते. पावसाळ्यात ते अधिकच निसरडे होतात. काही ठिकाणी तर वाळू खचत असल्यामुळे फिरताना खूप काळजी घ्यावी लागते. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथल्या पुळणीवर वेगवेगळ्या खडक आणि खनिजांपासून तयार झालेली काळ्या, लालसर व पांढऱ्या रंगाची पण लाटांबरोबर वेगाने समुद्राच्या दिशेने सरकत जाणारी वाळू आढळते. 

पुळणी जेव्हा एखाद्या उपसागराच्या किंवा आखाताच्या (Bay) शीर्षभागी तयार होतात, तेव्हा त्यांना शीर्ष उपसागरी पुळणी (Bay head beaches) म्हणतात. बहुतांश पुळणी किनाऱ्यावरच्या लहान मोठ्या आखातात व कोनाड्यासारख्या अंतर्वक्र भागात (Concavities) तयार होतात. यांना लघुपुळण (Pocket beach) असे म्हटले जाते. या पुळणी दोन्ही बाजूच्या भूशिरामुळे (Headlands) बंदिस्त होतात. काही वेळा एखाद्या भूशिराच्या टोकापासून वाळूचे संचयन किनाऱ्याला समांतर असे होते व त्याचे दुसरे टोक खाडीच्या मुखापाशी जाऊन संपते. याला वाळूचा दांडा (Sand bar) म्हणतात. रेवदांडा (अलिबाग), उभादांडा (वेंगुर्ले), आचरेदांडा (मालवण) येथे हा प्रकार दिसतो. पुळणीच्या समुद्राकडील बाजूला अध:पुळण (Lower beach) व जमिनीकडच्या बाजूला उच्चपुळण (Upper beach) असे म्हटले जाते. या दोघांच्या मधे थोडासा उंचवट्यासारखा भाग असतो. उच्च पुळणीची मर्यादा वाळूच्या टेकड्यांनी (Sand dunes) निश्चित केलेली असते. या टेकड्या, पुळणीवरचीच वाळू उडत आल्यामुळे तयार झालेल्या असतात. 

जगातल्या समुद्र किनाऱ्यावरील पर्यटन स्थळांपैकी ऐंशी टक्के पर्यटनस्थळे ‘पुळणी’ आहेत. आपल्या कोकणाच्या किनाऱ्यावर तर दर दोन, तीन किमीच्या अंतरावर एखादी तरी पुळण असतेच. लहान आकाराच्या अशा असंख्य  पुळणींमुळे किनाऱ्यांचे पर्यटन महत्त्व खूपच वाढते. 

पुळण पर्यटन (Beach tourism) ही कल्पना आपल्याकडे फार चांगल्या पद्धतीने राबवता येण्यासारखी आहे. मात्र त्याकरिता पुळणींच्या संवर्धनाची, स्वच्छतेची आणि रक्षणाची विचारपूर्वक केलेली योजना हवी. नाहीतर निसर्गाने परिश्रमपूर्वक तयार केलेल्या पुळणी, बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या यांसारख्या गोष्टींनी भरून जायला अजिबात वेळ लागणार नाही! गणपतीपुळे या अतिशय सुंदर पुळणीची आजची अवस्था ही अनियोजित, बेजबाबदार आणि बेशिस्त पर्यटन विकासाचे एक बोलके उदाहरण आहे. हीच अवस्था, कमी अधिक प्रमाणात भाट्ये (रत्नागिरी), किहीम (अलिबाग) आणि तारकर्ली (मालवण) इथल्या पुळणींचीही झाली आहे. कोकण किनाऱ्यावर अजूनही अनेक पुळणी, केवळ माणूस इथे फारसा न पोचल्यामुळे आजही अतिशय सुंदर आणि आकर्षक राहिल्या आहेत. काशिद, नांदगाव, दिवेआगर, केळशी, आगरगुळे, गावखडी, वाडा वेत्ये, वायंगणी, कुणकेश्वर, कोचरे, मोचेमाड अशी असंख्य नावे सांगता येतील, की जिथल्या पुळणींचे सौंदर्य शब्दात वर्णन करणेही शक्य नाही! आज महाराष्ट्रातल्या अनेक पुळणींवर सुरूच्या झाडांची लागवड करून त्यांचे सौंदर्य वाढविण्याचे व धूप कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुरूच्या वनामुळे पुळणींच्या मागच्या भागात, विशेष करून, वाळूच्या टेकड्यांच्या भागात भरपूर सावली मिळते व तिथे बसूनही पुळणींचे सौंदर्य नजरेत सामावून घेता येते. समुद्रकिनाऱ्याच्या प्रदेशाचे मुख्य सौंदर्य लक्षण म्हणूनच पुळणींकडे पाहिले जाते. खनिजांची साठवण करणारे प्रदेश म्हणूनही त्यांचे महत्त्व आहेच. पुळणीवरची वाळू ही फार मोठी साधन संपत्ती (Resource) आहे. या वाळूत, आजूबाजूच्या प्रदेशातून येऊन साठलेली विविध प्रकारची खनिजेही आढळतात.

पुळणीच्या पलीकडे किनाऱ्याला लागून असलेली मच्छीमारांची घरे,  

लांबच लांब पसरलेली नारळीची झाडे आणि पुळणीवर थोड्या उंचवट्यावर ओढून ठेवलेल्या मासेमारीच्या होड्या या सर्वांमुळे या सागरशिल्पाचे सौंदर्य द्विगुणित झालेले असते. आपली नजर त्याकडे जात नाही. आपल्याला दिसते ती फक्त लखलखणारी वाळू आणि पुळणीवर येऊन फुटणाऱ्या फेसाळणाऱ्या उंच उंच लाटा!

संबंधित बातम्या