किनाऱ्यावरील वाळूचे दांडे 

डॉ. श्रीकांत कार्लेकर   
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020


समुद्रशोध  : एंटरटेनमेंट
समुद्र आणि समुद्रकिनाऱ्यांचं सौंदर्य आणि विविधता कशी जपायची?... 
डॉ. श्रीकांत कार्लेकर

खुल्या समुद्रात, पण किनाऱ्याला लागून किनाऱ्याला समांतर असे वाळू, शंख, शिंपले यांचे संचयन आढळते. यास वाळूचा दांडा (Sand Bar) असे म्हणतात. हा पुळणीचाच एक प्रकार आहे. किनाऱ्यापासून दूर, पण उथळ समुद्रात फुटलेल्या लाटांत म्हणजे भग्नोर्मीत (Breakers) बऱ्याच वेळा भरपूर वाळू असते. त्याचे संचयन भग्नोर्मीच्या प्रदेशात होते. प्रतिगामी लाटांबरोबर हे पदार्थ समुद्राच्या दिशेने आणून टाकले जातात व त्याच्या संचयनामुळे वाळूचा दांडा तयार होऊ लागतो. कालांतराने संचयन वाढत जाऊन तो सागरी पातळीवर डोकावू लागतो. अशा तऱ्हेच्या वाळूच्या दांड्याच्या निर्मितीस किनारा अनियमित असावा लागतो. तसेच दीर्घतट प्रवाहामधून (Long shore current) भरपूर वाळू वाहत येऊन ते दांड्यालगत साचणे आवश्यक असते. जेथे किनारपट्टीची सर्वसाधारण दिशा एकदम बदलते, तेथे वाळूच्या संचयनास योग्य परिस्थिती असल्याने वाळूचा दांडा सहजपणे तयार होतो. बऱ्याच वेळा खुल्या समुद्रात एखादा न झिजलेला खडक असतो. तेथे लाटा येऊन फुटल्यास संचयनाला सुरुवात होते आणि कालांतराने तेथेही वाळूचा दंड तयार होतो.  

रत्नागिरीत काळबादेवी गावाजवळ असा वाळूचा दांडा आढळतो. कोकण किनाऱ्यावर प्राचीन काळापासून तयार झालेल्या अशा वाळूच्या दांड्यांवर काही ठिकाणी वस्त्याही आहेत. रेवदंडा, उभादांडा, खारदांडा अशी नावे या गावांना असल्याचे दिसून येते. इंग्लंडमध्ये जॉर्डल बँक्स व चेसिल बीच येथे अशा प्रकारचे दांडे आढळून येतात. अनेक वेळा वाळूचा दांडा खूप अंतरापर्यंत किनाऱ्याला समांतर असतो. त्यामुळे जलवाहतुकीस अडथळा निर्माण होतो, म्हणून त्यास रोधक द्वीप (Barrier island) असे म्हटले जाते. त्यामुळे उथळ पाण्याचे लांबलचक भाग किनाऱ्याला समांतर पसरलेले आढळून येतात. त्यांना साउंड (Sound) असे म्हणतात. अंदमान द्वीपसमूहात व संयुक्त संस्थानातील उत्तर कॅरोलिनच्या किनाऱ्यावर केप हॅटरासजवळ अशी साउंड्स आहेत. सर्वसाधारणपणे जगातील किनाऱ्याच्या एक तृतीयांश भागात अशी साउंड्स व रोधक द्वीप आढळतात.

दांडा व किनारा यांच्या दरम्यान असलेल्या उथळ पाण्याला लगून (Lagoon) किंवा सिधू तगाड, कायल अशी नावे आहेत. काही काळानंतर ही लगून्स गाळाने भरून जातात. अशा तऱ्हेची अनेक लगून्स केरळच्या किनाऱ्यावर आहेत, त्यांना पश्चजल (Backwater) असे म्हटले जाते. तिरकस (Oblique) दीर्घतट प्रवाहाबरोबर आलेले वाळू, शंख, शिंपले इत्यादी भरड पदार्थ किनाऱ्यावरील  खाडीच्या मुखाशी साचविले जातात. त्यांच्या संचयनाचे प्रमाण हळूहळू वाढत जाऊन त्याचे एक टोक जमिनीच्या पुढे आलेल्या भागास जोडले जाते. यास संलग्न दंड (Spit) असे म्हणतात. हासुद्धा वाळूच्या दांड्याचाच प्रकार आहे. दंतुर किनाऱ्यावर हे भूरूप दिसून येते. कोकणातील मालवणनजीक देवबाग येथे सुमारे ५ किमी लांबीचा संलग्न दंड गडनदीच्या मुखाशी तयार झालेला दिसतो. मालवणच्या उत्तरेला आचार नदीमुखाशी जुवे हा असाच एक संलग्न दांडा तयार झाला आहे. इंग्लंडमधील हॅम्पशायरजवळ कॅलशॉट स्पिट व मलेशियातील केलांतन नदीच्या मुखाशी असे वक्राकार संलग्न दंड आहेत. तिरकस लाटांमुळे बऱ्याच काळानंतर संलग्न दंडाचे मोकळे  टोक उपसागराच्या दिशेने वाकते. अशा दांड्यास वक्रदंड (Hook) असे म्हणतात. काही वेळा संलग्न दंडास अनेक लहान-मोठे फाटे असलेले दिसतात. हे सगळे फाटे किनाऱ्याच्या दिशेने  असल्यास त्याला संयुक्त वक्रदंड (Compound hook) असे म्हणतात. उत्तर अमेरिकेच्या ईशान्य भागात केपकॉड द्वीपकल्पाजवळ अशा तऱ्हेचे संलग्न दांडे व वक्रदंड तयार झालेले आहेत. केपकॉड ही सखल प्रदेशानजीकची किनारपट्टी आहे. या ठिकाणी हिमप्लवराशीमुळे (Glacial drift) संलग्न दंड तयार झालेला आहे. येथे दीर्घ तटप्रवाहांच्या दिशा बदलतात. त्यामुळे उत्तरेकडील रेसपॉइंटजवळ वाळूचा दांडा वाकलेला आहे. संलग्न दंडाची लांबी सातत्याने होणाऱ्या संचयनामुळे वाढत जाऊन तो दंड जवळ जवळच्या दोन भूशिरांना जोडतो. त्यामुळे उपसागराचे मुख बंद होते. यास उपसागरी दंड (Bay bar) असे म्हणतात. अमेरिकेच्या दक्षिण कॉर्नवॉल किनाऱ्यावर व बाल्टिक किनाऱ्यावरील नेहरूंग ही उपसागरी दंडाची उदाहरणे आहेत.  

किनाऱ्यालगत असलेले बेट जेव्हा वाळूच्या दांड्यामुळे किनाऱ्याशी जोडले जाते, तेव्हा 

अशा प्रकारे जोडल्या गेलेल्या बेटास भूबद्ध 

द्वीप  (Tombolo) असे म्हणतात. किनाऱ्यालगतचे बेट व किनारा यांच्या दरम्यानच्या समुद्राचा भाग अरुंद असल्यामुळे त्यातून समुद्राच्या पाण्याचे वहन सुलभरीत्या होऊ शकत नाही. पाण्यास अडथळा होऊन परिणामी वाळूचे संचयन होते व बेट आणि किनारा यांना जोडणारा दंड तयार होतो. 

संबंधित बातम्या