समुद्रकडे (भाग २)

डॉ. श्रीकांत कार्लेकर
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

समुद्रशोध 
समुद्र आणि समुद्रकिनाऱ्यांचं सौंदर्य आणि विविधता कशी जपायची?... 
डॉ. श्रीकांत कार्लेकर

असिताष्म (Besalt), जांभा (Laterite), कणाश्म  (Granite) यासारख्या विविध खडकांत समुद्राने खोदलेले उंचच उंच कडे पाहिले, की सागरी लाटांच्या शक्तीची पुरेशी कल्पना येते. रत्नागिरीजवळ कार्ली टेकडीच्या समुद्राकडील बाजूवर असे कडे आहेत. वेंगुर्ला बंदरातील डाक बंगला अशाच एका कड्यावर आहे.

काही वेळा कड्याच्या समुद्राभिमुख पृष्ठावर मधमाशांच्या पोळ्यांसारखी छिद्रांची जाळीच तयार झाल्याचे दिसते. कोकण किनाऱ्यावर हरिहरेश्वर येथे हा प्रकार दिसून येतो. किनाऱ्यावरील प्रस्तर समुद्राच्या विरुद्ध दिशेने कललेले असले, तर लाटांच्या माऱ्याला खूपच प्रतिबंध होतो. इंग्लंडमध्ये डोवर बंदरानजीक असे भव्य कडे दृष्टीस पडतात. किनाऱ्यावरील कमकुवत व जोड असलेल्या खडकांच्या भागात सागरी लाटांचा सतत मारा होऊन एक भगदाड किंवा छिद्र पडते आणि लाट आपटणे व मागे जाणे यामुळे हवेचे आकुंचन व प्रसरण होऊन ती छिद्रे रुंदावतात. कालांतराने तेथे गुहा तयार होते. रत्नागिरीच्या वायव्येस असलेल्या भूशिरात अशा प्रकारच्या सागरी गुहा आढळतात. भूशिराच्या दोन्ही बाजूंनी अशा रीतीने गुहा निर्माण झाल्यास झीज वाढत जाऊन कालांतराने त्या गुहा एकमेकींना मिळतात व आरपार असे भगदाड तयार होते. यास सागरी कमान (Sea Arch) असे म्हणतात. स्कॉटलंडमध्ये स्टोनसे येथे नील बेट आणि अंदमान येथे अशा सागर कमानी तयार झाल्या आहेत. आपल्या कोकण किनाऱ्यावर सागरी कमानी नाहीतच असे म्हटले तरी चालेल. 

सागरी लाटांच्या माऱ्यामुळे सागरी कमानीचे छत कोसळून पडते व भूशिराचा समुद्राकडील भाग भूशिरापासून तुटून स्तंभासारखा शिल्लक राहतो. यास सागरी स्तंभ (Sea Stack) असे म्हणतात. सागरी स्तंभ सागरी पृष्ठभागावर डोकावताना दिसतो. कालांतराने लाटांच्या माऱ्याने अशा स्तंभाची झीज होते व त्यांची उंची कमी होते. कमी उंचीचे हे भाग पाण्यावर सहसा दिसत नाहीत, त्यामुळे नौकानयनास धोका निर्माण होतो. पाण्याखाली असलेल्या स्तंभांना अवशिष्ट स्तंभ (Stumps) असे म्हणतात. मुंबईत गेटवे ऑफ इंडियाजवळ संकन रॉक (Sunkan rock) हे अवशिष्ट स्तंभाचे उदाहरण आहे. स्तंभ आणि  अवशिष्ट स्तभांच्या वर दीपगृहे बांधलेली दिसून येतात.  मुंबईतील कुलाब्याचे दांडी दीपगृह अशाच एका स्तंभावर आहे.

भूशिरातील खडकात गुहा तयार झाल्यानंतर गुहेच्या छपरावर लाटांचा मारा होतो. त्यामुळे कोंडलेल्या हवेचे आकुंचन प्रसरण होते. छताच्या पृष्ठभागाकडील बाजूवर खडक मृदू असल्यास कालांतराने एक अरुंद चिंचोळा मार्ग तयार होतो. याला आघात नलिका (Geo) असे म्हणतात. आघात नलिकेतून भरतीच्या वेळी पाण्याचा व रेतीच्या सूक्ष्म कणांचा मारा सुरू राहिल्यास तिचे टोक पृष्ठभागावर येऊन पोहोचते व   पृष्ठभागावर दिसू लागते. यास आघात छिद्र (Blowhole) असे म्हणतात. जोड असलेल्या भूशिरात आघात छिद्रे आणि नलिका लवकर तयार होतात. आघात छिद्र व आघात नलिका यांच्या दरम्यानचे छप्पर लाटांच्या माऱ्यामुळे नाहीसे होते व जो अरुंद मार्ग तयार होतो, त्याला आंतरमार्ग (Geo) असे म्हणतात. अशा आंतरमार्गाचे दोन्ही काठ तीव्र कड्यासारखे असतात. गुहागरजवळ हेदवी येथे हे सागरी भूरूप म्हणून सर्वप्रथम प्रस्तुत लेखकाने १९८९ मध्ये शोधले. गेल्या तीन ते चार हजार वर्षांत कठीण अशा बेसॉल्ट या अग्निजन्य खडकांत हे भूरूप तयार झालेले आहे. भरतीच्या वेळी त्याचे रौद्र स्वरूप जिवाचा थरकाप उडवेल असे असते. 

हजारो वर्षांच्या मेहनतीनंतर निसर्गाने तयार केलेल्या सागरी कडे, आघात छिद्र, कमानी या सागर शिल्पांचा  ऱ्हास माणसाने मात्र कमीत कमी वेळातच करण्याचा जणू विडाच उचललाय! आज अनेक ठिकाणी समुद्रकड्यांच्या माथ्यावर पर्यटकांसाठी मोठमोठी हॉटेल्स, लॉजेस आणि आरामगृहे उभी आहेत. समुद्रकड्यांच्या माथ्यावर रस्ते तयार केल्यामुळे वाहनांचा उपद्रव वाढतोय. भूशिरे ठिसूळ होताहेत. त्यांचे विदारण (Weathering) वाढतेय, जगातल्या ८0 टक्के किनाऱ्यांची हीच स्थिती आहे. 

संबंधित बातम्या