सागरी गुहा (भाग १)

डॉ. श्रीकांत कार्लेकर 
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

समुद्रशोध 
समुद्र आणि समुद्रकिनाऱ्यांचं सौंदर्य आणि विविधता कशी जपायची?... 
डॉ. श्रीकांत कार्लेकर

समुद्रकड्याच्या समुद्राभिमुख (Seaward facing) बाजूवर लहान-मोठ्या, आडव्या-उभ्या, उथळ-खल अशा सर्व तऱ्हेच्या सागरी गुहा (Sea Caves) तयार होत असतात. भूशिराच्या समुद्राभिमुख बाजूवर सातत्याने आघात करून सुरुवातीला एक छिद्र (Notch) पाडण्यात लाटा यशस्वी होतात. कालांतराने हे छिद्र मोठे होते. हे इतके मोठे होते, की छिद्राच्या तोंडावर होणाऱ्या लाटांच्या आघातामुळे  छिद्रातील हवा दाबली जाऊ लागते. लाट मागे गेली की दबली गेलेली हवा प्रसरण पावून पुन्हा छिद्र व्यापून टाकते. यामुळे छिद्राच्या भिंती कमकुवत होतात. छिद्र रुंदावते व त्याचे रूपांतर कालांतराने गुहेत (Cave) होते.

हळूहळू या गुहादेखील विस्तारतात. गुहेच्या छताच्या दिशेने लाटांचा आघात होतच असतो. त्यातच, वरच्या बाजूने झिरपणाऱ्या पाण्यामुळे छत ठिसूळ होते व खाली कोसळते, यानंतर छत कोसळून तिथे भूशिराच्या बाजूवर सागरकडा दिसू लागतो. छताच्या कोसळलेल्या भागात कड्याखाली येऊन पडलेल्या भागातील दगडधोंड्यांचाच हत्यार (Tools) म्हणून लाटा वापर करतात व कड्याची झीज सातत्याने करत राहतात.

सागरी लाटांच्या जबरदस्त ताकदीचा अंदाज ‘सागरी गुहा’ या किनाऱ्यावरील भूरूपाकडे पाहिल्यावरच येऊ शकतो. हे भूरूप तसे सर्वत्र आढळणारे आणि सहजपणे दिसणारे नाही. समुद्रकडे, पुळणी, वाळू टेकड्या यांच्यासारख्या ‘गुहा’ सगळीकडे दिसत नसल्यामुळेच त्यांच्या दुर्मीळ दर्शनाने होणारा आनंद हा शब्दांत  मांडता न येण्यासारखा असतो. खडकाळ किनाऱ्यावर अर्थातच यांचे अस्तित्व नजर वेधून घेणारे असते. मात्र इथेही यांच्या जागा अनेक वेळा विवक्षित असतात. कोकणच्या खडकाळ किनाऱ्यावर (Rocky shore) सागरी गुहा या मुख्यतः नैऋत्य मोसमी वाऱ्यांना संमुख अशा दिशेत तयार झालेल्या दिसतात. सागरी गुहा अनेकविध आकारात आणि वेगवेगळ्या रूपात आपल्यासमोर, एकाएकी अवतीर्ण झाल्यासारख्या पुढ्यात उभ्या ठाकतात, कारण भूशिराच्या आणि खडकांच्या वेगवेगळ्या भागात त्या दडलेल्या असल्या तर दुरून दिसत नाहीत. काही वेळा त्यांच्या निव्वळ आकारानेच आपण भयभीत होऊन जातो.

गुहेत शिरलेले समुद्राचे पाणी परत फिरतानाही प्रचंड आवाज करीतच मागे फिरत असते. गुहेच्या तोंडाचा विस्तार बघून गुहा किती खोल असेल याचा अंदाज करता येत नाही. कारण गुहेच्या आतला खडक किती कठीण आहे, त्यावर भेगा, संधी, जोड यांचे प्रमाण किती आहे, तो किती विदारण झालेला (Weathered) आहे यावर गुहेची खोली अवलंबून असते. काही वेळा गुहांना फारशी खोली नसतेच, पण जेव्हा ती असते तेव्हा ती आतल्या बाजूस अनेक मीटरपर्यंत गेलेल्या एखाद्या बोगद्यासारखीही असू  शकते. काही ठिकाणी बोगद्याची जमिनीकडची बाजू इतकी खोदली जाते, की ती भूशिराच्या पृष्ठभागावर दिसू लागते. अशा तऱ्हेच्या भूरूपाला आघात छिद्र (Blow hole) असे म्हटले जाते. या छिद्रातून गुहेच्या मुखापाशी लाट आपटल्यानंतर जी हवा कोंडली, जाते ती वेगाने वर निघून जाते. त्यामुळे लाटेचे पाणी छिद्रातून एखाद्या कारंज्यासारखे उडते. ही घटना अनेक वर्षे घडत राहिल्यास या नळीच्या छताचा भाग खाली कोसळतो व नलिका एखाद्या लांबट, अरुंद, पन्हाळीसारखी दिसू लागते. याला आंतरमार्ग

(Geo) असे संबोधिले जाते. आंतरमार्ग हे भूरूप तयार होण्यासाठी समुद्रपातळी खूप मोठा काळ एकाच ठिकाणी स्थिर असणे आवश्यक असते. तसेच, आघात छिद्र तयार होण्यासारखा तुलनेने मृदू खडकही किनाऱ्यावर असणे गरजेचे असते. त्यामुळे आंतरमार्ग हे गुहेशी निगडित असलेले भूरूप खूपच दुर्मीळ असते. मला कोकण किनाऱ्यावर हेदवी, वेळणेश्वर आणि कोर्लई या ठिकाणी आंतरमार्गांचे अस्तित्व लक्षात आले. महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर इतर ठिकाणीही अशा गुहांचे अस्तित्व असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

सागरी गुहांची खोली आणि विस्तार जसा वैविध्यपूर्ण आहे, तशीच ज्या उंचीवर या गुहा सापडतात त्या उंचीतही भरपूर विविधता आढळते. खूप उंचावर आणि भूशिराच्या समुद्रवर्ती बाजूवर मधल्या भागांत आढळणाऱ्या गुहा अधांतरी असल्यासारख्या दिसतात. पूर्वीच्या उच्चतम समुद्रपातळीचा तो एक भक्कम पुरावाच असतो. 

संबंधित बातम्या