सागरी गुहा (भाग २)

डॉ. श्रीकांत कार्लेकर 
सोमवार, 7 डिसेंबर 2020

समुद्रशोध  
समुद्र आणि समुद्रकिनाऱ्यांचं सौंदर्य आणि विविधता कशी जपायची?... 
डॉ. श्रीकांत कार्लेकर

भूशिराच्या समुद्रवर्ती (Facing Sea) बाजूवर खूप उंचावर, मधे आणि पायथ्यालगत तयार झालेल्या गुहा सागरपातळीत एकापेक्षा जास्त वेळा झालेले बदल सुचवितात. अशा तऱ्हेच्या गुहा नेहमीच, पूर्णपणे विकसित होऊ न शकल्यामुळे समुद्र लाटांनी अर्धवट अवस्थेत सोडून दिल्यासारख्या (Abandoned)  दिसतात. 

अनेक वेळा या गुहा आजच्या समुद्रपातळीच्या थोड्याशाच वर पण किनाऱ्यापासून खूपच दूर आढळतात. त्यांच्या समोर झीज झालेले खडक, सागरी मंच (Shore platforms) आणि अपवादात्मक परिस्थितीत वाळूच्या पुळणीही आढळतात. या गुहांना मृत गुहा (Dead caves) असे म्हटले जाते. यांच्या छतातून वरून मुरलेले पाणी, झिरपत, ठिबकत असते. गुहेच्या भिंतीवर ठिकठिकाणी झाडे उगवून त्यांची मुळे अस्ताव्यस्त पसरलेली दिसतात. रत्नागिरी शहरात, थिबा पॉइंट या ठिकाणी जांभा भूशिराच्या खाली, अशी एक गुहा आहे. केळशी इथे खाडीच्या उत्तरेला आणि हेदवीच्या किनाऱ्यावर आणि गुहागरजवळ बोऱ्या बंदरच्या परिसरात अशा मृत गुहा आढळतात.

काही गुहांची मुखे इतकी लांबट आणि अरुंद असतात, की रांगत रांगतच गुहेत प्रवेश करता येतो. गुहांच्या आत एक वेगळेच विश्व असते. कोंदट हवा, ठिबकणाऱ्या पाण्याचा आवाज, काही ठिकाणी छताला चिकटलेल्या वाघळांची फडफड आणि नजरेला जाणवेल इतका काळोख निश्चितच असतो. समुद्र जवळपास असेल तर प्रत्येक भरतीच्या वेळी आत घुसणाऱ्या पाण्याची ताकद तर इतकी असते, की आत उभे राहणे अशक्य होऊन जाते. 

ज्या मृत गुहांच्या छतावर आणि भिंतीवर शंख, शिंपले चिकटलेले असतात, त्या गुहा संशोधकांच्या दृष्टीने  अतिशय महत्त्वाच्या असतात. कारण त्या शिंपल्यांवरून त्या गुहा केव्हा निर्माण झाल्या असतील याबद्दलची काही अनुमाने काढता येतात.

सागरी गुहा ही समुद्र कड्यांच्या निर्मितीतील एक महत्त्वाची क्रमबद्ध घटना (Sequential phase) आहे. भूशिरावर सुरुवातीलाच तयार होणारे छिद्र (Notch), त्यावर आपटणाऱ्या लाटेतील हवेच्या आकुंचन प्रसरणाचा परिणाम आणि छिद्राचा विकास यातून गुहा निर्माण होते. गुहेच्या सततच्या विकासानंतर म्हणजे तिची खोली आणि विस्तार वाढल्यानंतर गुहेचे छतच खाली कोसळते आणि शिल्लक राहिलेला भूशिराचा तीव्र उताराचा भाग समुद्रकड्यासारखा दिसू लागतो. 

गुहेचे अस्तित्व हे समुद्रकड्यांच्या अपूर्ण विकासाचे निर्देशक आहे. ‘समुद्र कडे’ निर्माण होण्याची क्रमबद्ध प्रक्रिया मधेच थांबली, तर त्यावेळी गुहा ज्या अवस्थेपर्यंत तयार झालेल्या असतात त्याच अवस्थेत पुढेही आढळून येतात. ज्या गुहांचा विकास होत असतो, त्यांच्या पायथ्याशी दगडधोंड्यांचा खचही पडलेला आढळतो. याच दगडधोंड्यांचा, मोठ्या लाटा हत्यार म्हणून वापर करतात आणि गुहेच्या विकासाला हातभार लावतात.

महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर अलिबाग पासून मुरुडपर्यंतच्या पट्ट्यात अनेक सागरी गुहा वेगवेगळ्या उंचीवर व अंतरावर दिसून येतात. आकाराने त्या फार मोठ्या नाहीत, मात्र केळशीपासून विजयदूर्गपर्यंतच्या पट्ट्यात  आकाराने मोठ्या व आकर्षक अशा गुहा दिसतात. हरिहरेश्वर, आंजर्ले, हर्णे आणि कोळथरे येथील सागरी गुहा तर निश्चितच पाहण्यासारख्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनाऱ्यावर मात्र सागरी गुहांची संख्या खूपच मर्यादित. इथे असलेल्या ग्रॅनाईट या खडकामुळे यांच्या निर्मितीत सहजता नसल्यामुळे त्या इथे  अभावानेच आढळतात.

जगात सगळ्यात जास्त लांबीच्या सागरी गुहा नॉर्वेच्या किनाऱ्यावर आढळतात. त्या आत्ताच्या समुद्र पातळीपासून ३० मीटर उंचावर आहेत. थायलंडच्या फांग बेमध्ये चुनखडक (Limestone) विरघळून तयार झालेल्या अनेक गुहा आढळतात. आज वाढणाऱ्या समुद्रपातळीमुळे त्याच्यावरही परिणाम होऊ लागला आहे. न्यूझीलंडच्या साऊथ आयलंडवर मॅटाइनका इथे दीड किमी लांबीची गुहा आढळली आहे. तीन वर्षांपूर्वी, २०१७ मध्ये गोव्यातील आगोंदा आणि पालोलेमच्या जवळच लोलीम येथे ९० मीटर लांबीची बेसॉल्ट खडकात तयार झालेली सागरी गुहा आढळली!                  

ऐतिहासिक काळात सागरी गुहा हेच अनेक किनारी प्रदेशात मानवाचे आश्रयाचे ठिकाण होते. साहसी शोधकांसाठी या सागरी गुहा हे एक मोठे आव्हान असते. सागर किनाऱ्यांच्या संशोधकांना प्राचीन सागरपातळीच्या अभ्यासात या गुहांची खूप मदत होते.  

संबंधित बातम्या