केळशीची वाळूची टेकडी (भाग १)

- डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 14 डिसेंबर 2020

समुद्रशोध
समुद्र आणि समुद्रकिनाऱ्यांचं सौंदर्य आणि विविधता कशी जपायची?... 
डॉ. श्रीकांत कार्लेकर

रत्नागिरी जिल्ह्यातील केळशीच्या किनाऱ्यावर १९९३ मध्ये मी माझ्या संशोधन करणाऱ्या काही विद्यार्थ्यांबरोबर काम करीत होतो. संशोधन करीत असताना भारजा नदीच्या केळशीजवळ असलेल्या खाडीमुखापाशी एका २५ मीटर उंचीच्या वाळूच्या टेकडीने आमचे सर्वप्रथम लक्ष वेधून घेतले. ही टेकडी  त्याच किनाऱ्यावर दिसत असलेल्या इतर वाळूच्या टेकड्यांपेक्षा अगदी वेगळी दिसत होती. तिचे स्थान, आकार आणि उंची याबाबतीत तिचे वेगळेपण सहज नजरेत भरत होते. समोरच्या खाडीतून किंवा किनाऱ्यावरून पाहतानाही त्या टेकडीच्या उतारावर असणारे काळसर पांढरे पट्टे स्पष्टपणे दिसत होते. 

कोकण किनाऱ्यावर दिसणाऱ्या वाळूच्या टेकड्यांपेक्षा ही टेकडी नक्कीच वेगळी होती. बोर्डी - डहाणू पासून वेंगुर्ले- रेडीपर्यंतच्या लांबच लांब किनाऱ्यावर अशी वाळूची टेकडी आमच्या इतक्या वर्षांच्या संशोधन भ्रमंतीत आम्हाला आढळली नव्हती. 

पुढच्या चार दिवसांत आम्ही त्या टेकडीचा सविस्तर अभ्यास केला. त्यातून असे लक्षात आले की टेकडीच्या उतारावर आणि माथ्यावर सगळीकडे बारीक वाळूचे आच्छादन आहे पण जिथे वरची वाळू निघून गेली आहे, तिथे उघड्या पडलेल्या भागात, वेगवेगळ्या उंचीवर, कठीण खडकाचे, घट्ट मातीचे आठ ते दहा सेंमी जाडीचे आडवे थर आहेत आणि ते बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत टिकून आहेत. या थरांच्या दरम्यान काही ठिकाणी राखेचे पट्टे (Ash beds), सागरी माशांचे अवशेष, मानवी हाडे आणि खापऱ्या, मडकी यांचे तुकडे आहेत. माथ्याच्या दोन ते चार मीटर जाडीच्या वाळूच्या थरात भरपूर शंख शिंपले आहेत.

या टेकडीच्या पायथ्याशी, जिथपर्यंत आज भरतीचे पाणी येते, तिथे १.२ मीटर व्यासाची एक पक्की बांधलेली विहीर आहे. विहिरीचे हे स्थान गोंधळ वाढवीत होते. आज जिथे भरतीचे पाणी येताना दिसते आहे, तिथे ही विहीर का खोदली असावी त्याचा उलगडा होत नव्हता. शिवाय टेकडीच्या माथ्याजवळचे शंख शिंपल्यांचे अस्तित्व समुद्र पातळीतील बदलाचे सयुक्तिक स्पष्टीकरण करत नव्हते. २५ ते २८ मीटर उंची हीसुद्धा थोडी अनाकलनीयच वाटत होती. कारण कोकणात कुठेही इतक्या उंच वाळूच्या टेकड्या आढळत नाहीत. अनेक गोष्टींचा नीटसा उलगडा न झाल्यामुळे आमचे समाधान झाले नव्हते. 

त्यानंतर आम्ही पुण्यातील डेक्कन कॉलेजमधल्या डॉ. अशोक मराठे यांच्याशी याबद्दल चर्चा केली. पुरातत्त्वशास्त्रानुसार केळशीची ती टेकडी म्हणजे मानव वसतिस्थान दर्शक उंचवटा (Habitation mound) असावा असे प्रथमदर्शनी अनुमान काढले गेले. त्यानुसार पुन्हा एकदा संशोधन हाती घेण्यात आले. त्यातून बरीच नवीन माहिती उजेडात आली. आम्हाला आढळलेले कठीण खडकासारखे दिसणारे भाग हे घरांचे चौथरे असल्याचे नक्की झाले. सापडलेल्या खापऱ्या, मडकी, मानवी हाडे व सांगाडे यामुळे तिथे मानवी वस्ती असावी हेही नक्की झाले. टेकडीच्या वरच्या भागातील वाळूत सापडलेले नाणे अहमदशहाच्या काळातले (बहामनी हिजरी सन ८३७, इ.स. १४३३) होते. म्हणजे तोपर्यंत तरी हे वसतिस्थान नक्कीच कार्यरत होते व त्यानंतर ते एकाएकी नष्ट झाले असावे.    

टेकडीवरच्या वाळूची नेमकी उत्पत्ती कळत नसल्यामुळे गोव्याच्या राष्ट्रीय सागरविज्ञान संस्थेतील (NIO) डॉ. अनुप गुजर, पुण्यातील डॉ. शरद राजगुरू यांच्याबरोबर पुन्हा एकदा केळशीच्या टेकडीचे व परिसराचे संशोधन हाती घेतले. त्यातून ही वाळू एकाच प्रकारची आणि समुद्रतळावरून एखाद्या वादळाबरोबर मोठ्या प्रमाणावर उडत आली असावी असे संकेत मिळाले. टेकडीच्या वरच्या भागात आढळलेल्या  इलेमनाइटयुक्त वाळूचा स्रोत किनाऱ्याजवळच्या समुद्रतळावर असावा आणि ती उडत इतक्या उंचीवर आली असावी असेही यावेळी लक्षात आले. डेक्कन कॉलेजमधील अभ्यासकांनीही उत्खनन करून ही  टेकडी पुरातत्त्वीय अवसादानी युक्त असल्याचे निरीक्षण मांडले.  (क्रमशः)

संबंधित बातम्या