केळशीची वाळूची टेकडी (भाग २)

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 21 डिसेंबर 2020

समुद्रशोध  
समुद्र आणि समुद्रकिनाऱ्यांचं सौंदर्य आणि विविधता कशी जपायची?... 
डॉ. श्रीकांत कार्लेकर

केळशी येथील आमच्या संशोधनानुसार, ६ आणि ७ सप्टेंबर १५२४ च्या दरम्यान अरबी समुद्रात त्सुनामी आली असावी व त्याच काळात ही टेकडी तयार झाली असावी. १६व्या शतकाच्या सुरुवातीला केळशी परिसरात माणसाचे वास्तव्य होतेच. त्याआधी निदान सात शतके तरी माणूस या किनाऱ्यावर होता, हे  तसेच ही टेकडी एकाच वेळी झालेल्या वादळ सदृश घटनेने (Single storm episode) आणि एकसंध वाळूच्या संचयनाने तयार झाली असल्याचे CWPRS च्या मदतीने, सेस्मिक रिफ्रॅक्शन आणि ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार वापरून सिद्ध केले. १६व्या शतकाच्या सुरुवातीला कोकण किनाऱ्यावर समुद्रपातळी आजच्यापेक्षा तीन ते चार मीटरने खाली होती. त्यामुळे त्यावेळच्या वस्तीजवळ सापडलेल्या विहिरीचा संदर्भ लावता येतो. त्यानंतर झालेल्या समुद्रपातळीतील वाढीमुळे आज ही विहीर भरतीच्या वेळी पाण्याखाली जाते.

वर्ष १५२४ मध्ये त्सुनामी काळात मोठे वादळ होऊन इथे १८ मीटर जाडीचा वाळूचा मोठा संचय झाला. आजूबाजूची खारफुटी नष्ट झाली आणि किनाऱ्यावरची वस्ती वाळूखाली गाडली गेली असावी. हजारो वर्षांपूवी जगात इतरत्र झालेल्या त्सुनामींचे उल्लेख आहेत. वास्को द गामा यांच्या चरित्रात लोगान (१८८७) आणि केर (१८२४) यांचा संदर्भ देऊन ११ सप्टेंबर १५२४ रोजी पहाटे दाभोळ किनाऱ्यावर त्सुनामी सदृश महाकाय लाटा उसळल्या असाव्यात अशा अर्थाचे वर्णन आढळते. त्यातून पश्चिम किनाऱ्यावर या काळात त्सुनामीसारखी घटना घडली असावी असे खात्रीने म्हणता येते. आपल्याकडे अगदी अलीकडे झालेल्या त्सुनामीचे उल्लेख आढळत नाहीत. म्हणूनच केळशीच्या या संशोधनाला इतके महत्त्व आहे. या वाळूच्या टेकडीचे संरक्षण करणे त्याकरिताही गरजेचे होते. 

काही वर्षांपूर्वी केळशी टेकडीच्या भागात किनारी महामार्गासाठी केळशी खाडीवर पूल बांधण्याचे काम सुरू झाले होते. त्या कामात टेकडीच्या १२० मीटर लांब पट्ट्यातील १० मीटर उंचीचा वाळूचा थर काढून टाकण्यात आला. त्यात या टेकडीवर आढळणारे महत्त्वाचे इलेमनाईट वाळूचे थर, शंख शिंपले, पॉटरी आणि इतर वस्ती दर्शक पुरावे नष्ट झाले. पुण्यातील प्रणवतीर्थ चॅरिटेबल ट्रस्टने हे काम थांबविल्यामुळे आज ही टेकडी थोडीफार शिल्लक आहे. पण त्सुनामी किंवा त्सुनामीसदृश घटनेचा एकमेव साक्षीदार असल्याचे या टेकडीचे महत्त्व आता संपुष्टात आले आहे! आज केळशी गावात ‘वाळूच्या टेकडीकडे’ असा एक फलक आहे, पण तिथे गेल्यावर या टेकडीचे महत्त्व आणि वेगळेपण दाखविणारा एकही पुरावा इथे शिल्लक नाही अशी अवस्था आहे! नाही म्हणायला ओहोटीच्या काळात टेकडीच्या पायथ्याशी दिसणारी विहीर आहे, जी तुम्हाला गोंधळात टाकू शकते आणि ती इथे इतक्या चुकीच्या ठिकाणी का असेल असा प्रश्न तुम्हाला पडला तरच त्याचे उत्तर मिळवताना तुम्हाला या टेकडीचे आणि परिसराचे महत्त्व आणि ती सांभाळून ठेवण्याची कळकळ लक्षात येईल. 

कोकण किनाऱ्यावर असलेल्या वाळूच्या टेकड्या, कोकणाचा भूशास्त्रीय इतिहास, गेल्या हजार बाराशे वर्षांत किनाऱ्यावर झालेले सागर पातळीतील बदल, सागरी लाटांचे व भरती ओहोटीचे बदलते स्वरूप याचबरोबर किनाऱ्याचा सांस्कृतिक व अतिप्राचीन भूरूपिक इतिहास या सर्व घटनांची सविस्तर नोंद ठेवणारे असे सक्षम भूरूप आहे. कोकणात सापडलेल्या वाळूच्या टेकड्या किनाऱ्याचे भू-आकारिक स्थैर्य, पर्यावरणीय व परिसरीय विविधता, जैव विविधता टिकवून ठेवण्याचे फार मोठे काम करतात. 

आज या सर्वच टेकड्यांची पर्यटन व्यवसायाच्या आणि विकास कामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर नासधूस सुरू आहे, त्यामुळे अनेक महत्त्वाचे पुरावे व भूशास्त्रीय नोंदी नष्ट होत आहेत.    

चिखले, नरपड, वाढवण, नागाव, तारकर्ली-देवबाग, पुरळ, कोळथरे, मोचेमाड, गुहागर, वेळणेश्वर, केळशी आणि वेळाघर इथल्या वाळूच्या टेकड्यांचा ऱ्हास लक्षणीय आहे. 

संबंधित बातम्या