सागरी मंच 

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 28 डिसेंबर 2020

समुद्रशोध  
समुद्र आणि समुद्रकिनाऱ्यांचं सौंदर्य आणि विविधता कशी जपायची?... 
डॉ. श्रीकांत कार्लेकर

समुद्रकडा तयार होत असतानाच त्याच्या पायथ्याशी एक विस्तृत असा सागरी मंच (Shore platform) निर्माण होत असतो. किनाऱ्यावर लाटांच्या माऱ्यामुळे तयार झालेल्या सपाट आणि  खडबडीत भागास किनारी मंच असे म्हणतात. किनाऱ्यावर भरती रेषा व ओहोटी रेषा यांच्या दरम्यानचा भाग सतत झिजत असतो. झीज चालू होण्यापूर्वी असलेल्या किनाऱ्यावरील भूशिरावर लाटांच्या माऱ्यामुळे प्रथम एक खोबण तयार होते. नंतर लाटांच्या सतत माऱ्यामुळे ती वाढत जाते. कालांतराने त्या खोबणीचे रूपांतर गुहेत व नंतर समुद्रकड्यात होते. समुद्रकड्यांचे अधःकर्तन होऊन तेथे थोडीशी सपाट जागा तयार होते. यालाच तरंग निर्मित मंच (Wave cut platform) असे म्हणतात. ओहोटीच्या वेळी हा मंच उघडा पडलेला स्पष्ट दिसतो, तर भरतीच्या वेळी तो पाण्यात बुडालेला असतो. श्रीहरिहरेश्वर (श्रीवर्धनजवळ) व रत्नागिरी शहराच्या जवळ असलेल्या एका भूशिराखाली तरंगकृत मंच ओहोटीच्या वेळी दृष्टीस पडतात. 

तरंग निर्मित मंचावरील झिजेमुळे तयार झालेले पदार्थ त्या मंचाच्या समुद्राकडील भागावर साठवले जातात. तेथे एक मंच तयार होतो. यास तरंग निर्मित मंच (Wave built platform) असे म्हणतात. यालाच अपतट वेदिका (Offshore terrace) असेही म्हणतात. अग्र तटावर (Foreshore) असलेल्या कड्यांची झीज होऊन तरंग निर्मित मंचावर निक्षेपण होत असते. भरड वाळू व दगड धोंडे यांचे संचयन प्रामुख्याने तरंग निर्मित मंचावर झालेले असते.

कोकण किनाऱ्यावर लांब रुंद असे सागरतट मंच असून त्यांच्या जमिनीकडच्या, डोंगर पायथ्याच्या बाजूंवर मोठमोठ्या शिळा आणि दगडांचा खच पडलेला दिसतो. लाटांच्या सदैव सुरू असलेल्या माऱ्यामुळे हे दगड फुटून, विदीर्ण होऊन सर्वत्र पसरलेले दिसतात. पावसाळ्यात भरतीच्या वेळी हा सगळा प्रदेश रौद्र रूप धारण करतो. दगडादगडातून व खडकातील भेगांतून प्रचंड वेगाने वर उसळणाऱ्या अशा लाटांत जाणे म्हणजे संकटाला निमंत्रणच असते! भरतीच्या वेळी वर आलेले पाणी या मंचावर ठिकठिकाणी साठून, मंचाचे खडक इतके निसरडे होतात की तिथून चालताना क्षणार्धात आपण घसरून खाली पडू शकतो. त्यामुळे ओहोटीच्या वेळीही मंचावर काळजी घेऊनच चालावे लागते. या मंचावर हजारो वर्षांच्या पाण्याच्या आघातामुळे अनेक खड्डे पडून डबकी तयार झालेली दिसून येतात. त्यांचीही चालताना नेहमी जाणीव ठेवावी लागते. बोर्डी, डहाणू, पालघर भागात विस्तीर्ण सागरी मंचावर साचलेल्या वाळू आणि चिखलयुक्त मातीत खारफुटीची झाडे वाढलेली दिसतात.

जगभरात अशा सागरी मंचांमध्ये भरपूर वैविध्य आढळते. ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स प्रांतात शोलहेवन भागातील ३५ अंश दक्षिण अक्षवृत्त आणि १५० अंश पूर्व रेखावृत्ताजवळच्या उल्लाडुल्ला   शहराजवळच्या सागरतट मंचावर एक गोंडवन फॉसिल वॉक म्हणजे गोंडवन या भूशास्त्रीय प्रदेशातील जीवावशेष प्रदेशात एक भ्रमण मार्ग तयार केलेला आहे. भूशास्त्रीय काळातील काही विशिष्ट सागरी जीवांचे व वनस्पतींचे अश्मिभूत जीवावशेष या सागरतट मंचावर आढळतात. भरपूर भूशास्त्रीय व शैक्षणिक क्षमता असलेला हा वॉक अनेक दृष्टींनी आगळा वेगळा आहे. इथे आढळणाऱ्या जीवावशेषांची टिकाऊपणाची (Preservation) प्रत आणि विपुलता आश्चर्यकारक अशीच आहे. 

पर्मियन या २६ कोटी ते ३० कोटी वर्षांपूर्वीच्या भूशास्त्रीय कालखंडात पूर्व ऑस्ट्रेलियाचा भाग अंटार्क्टिक वृत्ताच्या जवळ होता. त्यावेळचे म्हणजे साधारणपणे २७ कोटी वर्षांपूर्वीचे सागरी अपृष्ठवंशीय जीवांचे अवशेष इथल्या सागरी मंचावर अश्मीभूत अवस्थेत आढळतात. हे सगळे जीवावशेष प्राचीन सिल्टस्टोन म्हणजे बारीक वाळूच्या खडकात अश्मीभूत झाले आहेत.  

सिडनीच्या दक्षिणेला ससेक्स इनलेटच्या पुढे बेरारा, कानजोला, मिल्टन आणि उल्लाडुल्ला किनाऱ्यापर्यंतच्या सगळ्याच सागरी मंचावर सर्वत्र प्राचीन गोंडवन भूखंडावर हे अवशेष दिसून येतात. या  सागरतट मंचावर खडकाच्या आडव्या थरात पर्मिअन काळातील पेक्टन शेल, स्पायरीफेर, प्रोडक्टीड  आणि सी लिली या प्राण्यांचे अश्मीभूत आढळतात.  

(समाप्त)

संबंधित बातम्या