मारमालेडचं डाएट 

विभावरी देशपांडे
गुरुवार, 10 जानेवारी 2019

साराची डायरी
 

Well! मला वाटतं या घरात माझी आणि पापाराझ्झीची काही पोझिशनच नाहीये. त्याची जरातरी असेल कारण त्याला दोन का तीन तारखेला salary मिळते आणि त्यामुळे मारमालेड ‘बिग बास्केट’ करू शकते. कधी कधी ती मंडईत पण जाते. जे तीन महिने ‘पार्सल’ आमच्याकडे असते तेव्हा. ‘पार्सल’ म्हणजे पापाराझ्झीची आई. माझी आजी. ती अमेरिकन दिसते. पण ती एक नंबरची इंडियन आहे. ती गोरी आहे फॉरेनरसारखी.. आणि तिचे डोळे निळे आहेत करिष्मा कपूर टाइप्स. पण ती एकदम जुन्या स्टाइलची आहे. म्हणजे साडी, अंबाडा आणि कुंकू. ती तीन महिने आनंदकाकाकडे लंडनला राहते, तीन महिने अप्पू आत्याकडे अमेरिकेला, तीन महिने मिनू आत्याकडे जर्मनीला आणि मग सगळीकडे थंडी पडली की कुठेच जाता येत नाही म्हणून तीन महिने आमच्याकडे. म्हणून मी तिला ‘पासिंग द पार्सल’मधलं ‘पार्सल’ म्हणते. ती abroad राहत असूनही खूप इंडियन आहे. त्यामुळं तिला बिग बास्केट and all आवडत नाही. मग तेव्हा मारमालेड मंडईत जाते. 

हां.. तर मी काय सांगत होते? माझी पोझिशनच नाहीये. कारण मला जेवायला काय हवं आहे हे मला कुणीच विचारत नाही. मारमालेड आणि मेकूडचं त्यावेळी जे डाएट चालू असतं ते मला आणि पापाराझ्झीला खावं लागतं. मागच्या महिन्यात आम्ही सारखी भाकरी खात होतो आणि त्याच्या आधी ओट्‌स. मारमालेडला वाटायचं रोज वेगवेगळ्या आवाजात ‘ओट्‌स’ असं म्हटलं की त्याची टेस्ट वेगळी लागते. 

‘आज काय आहे ब्रेकफास्टला?’ 
‘ओ ओ ओ ओ ओ टस नेपोतीना..’ (इटालियन स्टाइल) 
‘आज काय आहे लंचला?’ 
‘ओटचं कालवण’ (कोकणी स्टाइल) 
‘आज snack time ला काय आहे?’ 
‘ओट्‌स दे बृ टू सु...’ (फ्रेंच स्टाइल) 

तरीपण ते सेम लागतं! सेम! पण मारमालेड नेहमी डाएटवरच असते, खरंतर ती मस्त बारीक आणि फिट आहे पण तिला वाटतं ती जाड झालीये. बहुतेक बारीक व्हायचं ही तिची हॉबी आहे आणि मग तिला त्यावेळी जे खायला सांगितलेलं असतं ते ‘हेल्थसाठी परफेक्‍ट असतं’ मग मेकूडपण तेच खाते. (दीदी खूप सिन्सियर आणि हार्ड वर्किंग आहे आणि एखादी गोष्ट करायला घेतली की ती त्याला ‘चिकटून’ राहते असं सगळे दिवसातून १२० वेळा तरी म्हणतात. म्हणून तिला मी मेकूड म्हणते. मेकूडपण तसंच चिकटून राहतं हाताला किंवा नाकाला.. म्हणून) तर मग मेकूड पण या डाएटवरून त्या डाएटला चिकटते. पापाराझ्झीच्या रोज ‘डिनर मिटींग्स’ सुरू होतात. पण मला काही ऑप्शनच राहात नाही. मुळात मी सेम दीपिका आहे. मी एकदम बारीक आहे आणि माझे पाय लांब आहेत. दीपिका लहानपणी सेम माझ्यासारखी दिसायची. त्यामुळे मी मोठेपणी आपोआपच तिच्यासारखी दिसणार आहे. मग मी एका डाएट करू? आणि माझी घरात काही पोझिशन असायला नको का? मी ठरवलं होतं protest करायचं. पण आत्ताच मारमालेड मेकूडला एका नवीन डाएटबद्दल सांगत होती. फक्त दोन वेळा खायचं.. हवं ते खायचं आणि non stop ५५ मिनिट्‌स खातच राहायचं. उद्यापासून ते आहे. मला ते आवडणार आहे. म्हणून मी protest पोस्टपोन केलाय. 

ओके बाय.. दहा वाजले. गुड नाईट...

संबंधित बातम्या