..मग आपण सेफ कसे? 

विभावरी देशपांडे
गुरुवार, 17 जानेवारी 2019

साराची डायरी
 

’Absolutely ridiculous! काय dictatorship आहे! अरे याला म्हणतात का democracy. जीव गुदमरून जाईल आता! मला हक्क नाही का मला काय हवंय ते ठरवायचा? छे छे! मोनिका, हे असंच चालू राहिलं तर तालिबान व्हायला वेळ लागायचा नाही या देशात!’ 

एक मिनीट! हे सगळं मी म्हणत नाहीये, inverted commas आहेत. म्हणजे हा डायलॉग आहे. परवा मराठीच्या लेक्‍चरला ‘केळ्याच्या सालीचे मनोगत’ लिहायला सांगितले होते. तर मिस म्हणाल्या डायलॉग लिहिताना असे inverted commas करायचे. ते मी केलेत. 

तर हे सगळं पापाराझ्झी म्हणत होता आज संध्याकाळी. म्हणत नाही... ओरडत होता. Normally पापाराझ्झी कधीच इतक्‍या जोरात बोलत नाही. मारमालेडच बोलते. (म्हणजे तिचा नॉर्मल आवाजच एवढा आहे) पण पापाराझ्झी असं ओरडतच घरी आला. मी तेव्हा मिस्टर सबनिसांना कोथिंबीर देत होते. अरे हो! मिस्टर सबनीस म्हणजे आमचा hamster! त्याचं नाव मिस्टर बीन ठेवलं आहे. पण तो सेम आमच्या शेजारच्या सबनीसकाकांसारखा दिसतो, त्यामुळं मी त्याला मिस्टर सबनीस म्हणते. तर माझ्या हातातून कोथिंबीर पडली आणि मेकूड सेल्फीस्टॅंडवर फोन ठेवून कसलातरी video record करत होती! त्याचं जे काय झालंय ते तर अपलोड केलंच पाहिजे. America’s funniest videos मध्ये. 

Anyway, point असा आहे, की पापाराझ्झी इतका ओरडला म्हणजे काहीतरी खूप सिरीयसच असणार. मला वाटलं की आपल्याकडं खरंच तालिबान किंवा आयसिस येतं आहे. मी खूप घाबरले. (आयसिसच्या बातम्या ऐकू देत नाही, पेपरमध्ये वाचू देत नाही. पण मला सगळं माहीत आहे. तिला वाटतं मी अजूनही I-pad वर Shin chan बघते पण मी ईयरफोन्स लावून हे सगळे videos बघत असते. Ann Frank, युसुफ्जाई, हिटलर, तालिबान, आयसिस, नॉर्थ कोरिया, मला सगळं माहीत आहे).. वाटलं आता आपल्याकडं तसंच होणार आहे. Actually एकदा मी मार्मालेडला विचारलं होतं, की आपल्याकडं आयसिस आलं तर काय होईल. तर ती म्हणाली ‘शक्‍यच नाही गं.. आपण सेफ आहोत. ते सगळं तिकडं होतं.. लांब.. आपल्याला काहीही होणार नाही’ पण मग पापाराझ्झी असं का म्हणाला मला कळलंच नाही. मला वाटलं आता मलापण एका bag मध्ये सामान भरून बोटीतून युरोपला जावं लागेल. मग त्या रेड शर्टवाल्या मुलासारखी मी मधेच बुडाले तर? किंवा मला तालिबाननी kidnap केलं तर? मला रडूच आलं. मी बाहेर धावत गेले. तर मारमालेड chill मध्ये तिचा Keto bread बनवत होती आणि पार्सल सर आणि ईशाच्या लग्नाची तयारी पाहत होती. मग म्हटलं ‘इतकं काही सिरीयस नाहीये,’ पण मग झालंय काय? मी त्याला विचारलं. तर तो म्हणाला ‘हेल्मेट कम्पल्सरी?? पण का? आमचं डोकं आहे! आम्ही ठरवू आम्हाला जपायचं आहे का नाही? मला फोडायचं असेल माझं डोकं तर? हे कोण आम्हाला सांगणारे? माझा choice आहे ना? उद्या म्हणतील, धोतर नेसा, टक्कल करून शेंड्या ठेवा.. अरे! हे कोण dictate करणारे?’ 

हात्तिच्या! एवढंच होय! मी परत मिस्टर सबनिसांना कोथिंबीर द्यायला आले. पण मला एक कळलं नाही. आयसिस आलं, तालिबान आलं तर आपण मरू शकतो. ते लांब आहेत म्हणून आपण सेफ आहोत. पण रस्त्यावरच्या traffic मध्ये डोकं आपटून आपण मरणार नाही का? मग आपण सेफ कसे? 

हे मी त्याला उद्या विचारीन. ओके.. गुड नाईट...

संबंधित बातम्या