‘आपल्यातली’ मी 

विभावरी देशपांडे
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

साराची डायरी
 

मला पार्सलचं काही कळायचंच नाही. म्हणजे तिला मी आवडते का नाही आवडत, तेच समजायचं नाही. म्हणजे कसंय ना, मी माझ्या सगळ्या भावंडांमध्ये सगळ्यात लहान आहे. तिच्या सगळ्यात छोट्या मुलाची छोटी मुलगी. ती मला कसलंतरी ‘फळ’ म्हणते. शेंडी का काहीतरी. पण त्यावरून मला कळत नाही, की मी तिला आवडते का नाही. म्हणजे मोठ्या काकाच्या मुलांना ती ‘परीराणी आणि राजपुत्र’ म्हणते. आत्याच्या मुलांना पण ‘सगुणा, सुंदरा, अप्सरा, राजस, प्रेयस’ अशी काही काही नावं ठेवली आहेत तिनं. म्हणजे क्‍लियर आहे की ते तिला आवडतात. ते तसेच आहेतपण. गोरेपान, सुंदर, फाडफाड इंग्लिश बोलणारे. ते abroad च असतात ना! तिकडं हवा एकदम स्वच्छ असते त्यामुळं सगळे सुंदर दिसतात. मेकूडला पण ती विदुषी म्हणते. नानी म्हणाली विदुषी म्हणजे ‘हुशार.’ म्हणजे या सगळ्यांची नावं वेगळीच आहेत. पण हिनं तिची पर्सनल नावं ठेवली आहेत. (पण सेम तेच केलंय तरी मला मारमालेड सगळ्यांसमोर ही नावं वापरायला allow करत नाही. ‘तुझ्या डायरीत काय लिहायचं ते लिही’ असं म्हणते. ठीक आहे.. जाऊदे.) 

हां... तर मी काय म्हणत होते? या नावांवरून हे सगळे तिला आवडतात हे कळतं. पण ‘शेंडीफळ’वरून काहीच कळत नाही, की मी तिला आवडते का नाही? कारण ती जनरली मला काय करू नकोस तेच सांगत असते. For example, ‘सोफ्यावर असे वर पाय घेऊन बसू नकोस, लोक काय म्हणतील’ म्हणजे actually तेव्हा घरात कुणीच नसतं. मग कुठले लोक ते मला कळत नाही. शेजारच्या सबनीसकाकांकडं कझाकिस्तानहून आणलेलं एक भिंग आहे. ते म्हणतात, त्यातून मंगळावरचंपण सगळं दिसतं. कदाचित त्या भिंगातून त्यांना भिंतीच्या पलीकडचंपण दिसत असेल. म्हणून ती म्हणत असेल. दुसरं example, एकदा एका लग्नातल्या बुफेत मी भाजी आणि रोटी आणि भात आणि कोशिंबीर असं सगळं प्लेटमध्ये भरून आणलं. कारण खूप मोठा क्‍यू होता. तर ती म्हणाली, ‘सरस्वती, असं काय सगळं भरून आणलं आहेस? आपल्यात असं करत नाहीत.’ ‘आपल्यात?’ म्हणजे कुणात? काय माहीत! पण ती नेहमी म्हणते, ‘आपल्यात हा रंग नाहीये ना फारसा? (म्हणजे माझा रंग) आपल्यात असे दात नाहीयेत ना कुणाचे. (म्हणजे माझे दात.. कारण ते पुढे आहेत.) ‘आपल्यात सगळे हुशारच आहेत.’ पण मग मला कळत नाही की मी ‘आपल्यात’ आहे का नाही? कारण ‘आपल्यात’ असतं तसं काहीच माझ्यात नाहीये! मी मारमालेडला विचारलं ती असं का म्हणते ते. मी ‘तुमच्यात’ नाहीये का? आजी असं का म्हणते? तर मारमालेड एक सेकंद गप्प झाली आणि म्हणाली ‘नाही गं. तुला माहितेय ना, आजी असं काहीही बोलते. पण तिला तसं म्हणायचं नसतं.’ म्हटलं एनीवे, ठीक आहे! नसीन मी आवडत तिला. 

पण आज मजाच झाली. पार्सलची भिशी होती. तिच्या फ्रेंड्‌स आल्या होत्या. बोलता बोलता चष्मेबद्दूर ‘ढेराडून’ला म्हणाली..(बाय द वे, सानेआजींना चष्मा आहे म्हणून चष्मेबद्दूर आणि फाटक आज्जीची ढेरी आहे म्हणून ढेराडून) ‘वेगळीच दिसते नाही का सरस्वती? ह्यांचं काहीच घेतलं नाहीये तिनं..’ नेमकं पार्सलनं हे ऐकलं आणि एकदम म्हणाली, ‘बघायचंच नाही म्हटलं की नाही दिसत! बुद्धी आहे तिच्या आजोबांची, विनोदबुद्धी आहे तिच्या बाबाची, स्पष्टवक्तेपणा घेतलाय तिच्या आजीचा. (म्हणजे frankness असं मारमालेडनं नंतर सांगितलं) आणि तिच्या आईकडून पण खूप काही घेतलंय तिनं. मामीचं लिखाण, मोनिकाची संवेदनशीलता, नानांचं धैर्य!’ मला फार भारी वाटलं. माझ्यात इतकं काय काय आहे मला माहीतच नव्हतं! आणि हे सगळं पार्सलला दिसलं आणि ती सगळ्यांसमोर म्हणालीसुद्धा! मी धावत तिच्या कुशीत गेले.. आणि मला कळलंच नाही तिचे डोळे ओले का झाले! ओके बाय, गुड नाईट.

संबंधित बातम्या