फुग्याचा धडा

विभावरी देशपांडे
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

साराची डायरी
 

आज माझं आणि मारमालेडचं जबरदस्त म्हणजे जबरदस्त भांडण झालं. मला इतका राग आला ना की माझ्या डोक्‍यावर अंडं फोडून टाकलं असतं, तर त्याचं लगेच ऑम्लेट झालं असतं. आजकाल असं खूप वेळा होतं. का ते कळत नाही यार मला! म्हणजे सगळे म्हणतात, मी मेकूडसारखी चिडकी अज्जिबातच नाहीये. पण सहावीत गेल्यापासून जरा गंडलंय माझं सगळं. मला पटकन राग येतो. कान असे गरम गरम होतात, छातीत धडधडायला लागतं. डोकं तापतं. मग कोण काय बोलतंय मला समजतच नाही. मी काय बोलतेय ते पण कळत नाही.. आणि मग एकदम डोळ्यातून पाणीच यायला लागतं. Actually, मी मेकूडसारखी रडकी पण नाहीये. असं होतंय पण... आणि गंमत म्हणजे, दरवेळी इतकं सिरीयस काही असतं असंपण नाही. 

पण आज कारण तसं सिरीयसच होतं. मी सायकलनं क्‍लासला जाते म्हणून तिनं मला मेकूडचा जुना फोन दिला आहे. तो खाली पडला आणि त्याचा स्क्रीन खराब झाला. मी मारमालेडला म्हणाले, "नाहीतरी तो तुटला आहे तर मला नवीन दे स्मार्टफोन.' तर ती म्हणाली, "नाही! तुला काहीही गरज नाहीये नवीन फोनची. फक्त मेसेज करायला लागतो फोन तुला. तो होईल याच्यात. लक्षूला आठवीत नवीन मिळाला होता, तुला पण आठवीत मिळेल!' "याला काय अर्थ आहे? सगळं तिला मिळालं तेव्हा... तिला मिळालं तसं मला का मिळणार? माझी काही independent identity आहे की नाही?' असं म्हणाले तर ती म्हणाली, "थांबा! वेळ आहे अजून त्याला! आपापलं सगळं नीट करायला शिका! Independent व्हा आधी, मग identity चं पाहू..' इतका राग आला मला! मी सोफ्यावरची कुशन फेकून दिली आणि ताडताड माझ्या खोलीत निघून आले. नानी समोरच होती. ती मला म्हणाली, "असं फेकायचं नाही सरू... सोडून द्यायचं.. आपल्या फुग्यासारखं...' 

मी आत आले. टेबलवर डोकं ठेवून रडले. आणि मग एकदम मला तो फुगा आठवला. पाच वर्षांची असताना मी एका रविवारी नानीबरोबर बागेत गेले होते. तिकडे एक फुगेवाला होता. त्याच्याकडे एक खूप भारी रंगीत फुगा होता. असा फुगा मी कधीच पहिला नव्हता. मी नानीकडे फुगा मागितला. ती म्हणाली,' जा ! कितीला दिला विचार' मी विचारलं तर त्यानी काहीतरी किंमत सांगितली. नानी म्हणाली 'छे! भलतीच किंमत सांगतोय हा! नको आपल्याला'. पण मला हवा होता तो. मी हट्ट करायला लागले. तर ती म्हणाली. 'ठीक आहे, पण तुला हा असा सहज नाही मिळणार. तुला तो कमवावा लागेल. पुढचा एक आठवडा रोज घडी केलेले कपडे आवरायचे आणि बिछाना आवरायचा'. मी म्हटलं ओके! आणि एक आठवडा मी सगळी कामं केली. पुढच्या रविवारी नानी मला आपणहून घेऊन गेली आणि फुगा घेऊन दिला. मी इतकी खूष झाले ना! मला फुगा नुसता मिळाला नव्हता, मी तो कमावला होता. मी मस्त एका हातानी नानीचा हात धरून आणि दुसऱ्या हातात फुगा धरून घरी येत होते. तेवढ्यात मला नेहा दिसली. मी एकदम तिला जोरात हाय केलं. पण मला कळलंच नाही, माझ्या हातातला फुगा सुटला! Gas चा फुगा होता त्यामुळे तो एकदम वर गेला! मी पकडायच्या आत! मी ओरडले, आम्ही रस्त्याच्या मधे होतो, त्यामुळे नानी काहीच करू शकली नाही. कडेला आल्यावर आम्ही दोघी नुसत्या त्या फुग्याकडे बघत बसलो. मी तर डायरेक्‍ट भोकाड पसरलं. नानीनी मला रडू दिलं. माझं रडून झाल्यावर मला म्हणाली, 'तू खूप मेहनत करून मिळवला होतास तो फुगा, तुझ्याच हातून तो गेला. तुला वाईट वाटणार! पण हे बघ....तू परत मिळवू शकतेस तो! एकदा आपल्या हातातून सुटला की त्याच्यासाठी किती रडायचं ते आपण ठरवायचं. मिळवता आलं पाहिजे तसं सोडूनही देता आलं पाहिजे ना?' तिला नक्की काय म्हणायचं होतं मला तेव्हा कळलं नाही. पण आता कळलं. Thank you नानी...ओके....गुड नाईट.

संबंधित बातम्या