जगातला बेस्ट बाबा 

विभावरी देशपांडे
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

साराची डायरी
 

‘रा हुल प्लीज! मी रेडी नाहीये’ - मारमालेड. 
‘अगं मला असेच हवेत फोटो... candid’ - पापाराझी. 
(बाय द वे, मला परवा कळलं ते candid आहे candy नाही. मी candy च म्हणायचे. पण candid म्हणजे त्या माणसाला न सांगता काढलेले.) 
‘पण मला नको आहेत माझे फोटो असे’ - मारमालेड. 
‘पण candid विचारून काढतच नाहीत..’ - पापाराझी. 

आमच्या घरात दर दोन दिवसांनी हे असं होतं. पापाराझी अचानक झटका आल्यासारखा कॅमेरा हातात घेऊन फोटो काढत बसतो. ऑफिसला उशीर होत असतो तरीही. मारमालेड वैतागते. आम्ही तर लपून बसतो. कारण तो नॉर्मल फोटो काढतच नाही. कधी एक डोळा, कधी नुसतेच तळपाय. मी काय म्हणते, त्यानं जर सांगितलं नीट, तर छान केस विंचरून, तोंड धुऊन येईन मी. मस्त पाउट करीन (पाउट केल्यावर तर मी सेमच दीपिकासारखी दिसते.) पण हा सांगतच नाही. म्हणूनच मी त्याला पापाराझी नाव ठेवलं आहे. ते पण असे - कॅमेरा घेऊन मागे लागतात. आपल्याला choice च नसतो आपला फोटो काढायला हवाय का नाही याचा. मी बघितलं आहे खूप वेळा. नानी सांगत होती लेडी डायनाचा पण accident पापाराझीमुळं झाला. (म्हणजे माझ्या बाबामुळं नाही, तेव्हा तो खूप छोटा होता आणि तो असा नाहीये. तो खूप क्‍यूट आहे. तो फक्त घरातल्यांना त्रास देतो.. आणि तेवढं प्रत्येकाला allowed असतं. सो इट्‌स ओके.) 

हां... तर आज पण असंच झालं. ऑफिसला जायचं तर तो अचानक असे फोटो काढायला लागला. मग मारमालेड चिडली तर तो थांबला आणि हातात कॅमेरा घेऊन सोफ्यावर बसला. छपराकडं बघत. मारमालेड आवरून मीटिंगला निघाली तरी हा असाच बसलेला. मी जाऊन बोलणार होते त्याच्याशी, पण ती आली म्हणून मी थांबले. कधीकधी दोघं पिक्‍चरमधल्यासारखे एकमेकांचे हात हातात घेऊन बसतात.. आणि हळूहळू बोलतात... आय थिंक इट्‌स व्हेरी स्वीट. लहानपणी मला खूप राग यायचा पण आता मी मोठी आणि mature झाले आहे. (असं नानी म्हणाली परवा.) त्यामुळं आता तसं वागायला हवं. म्हणून मी गेले नाही. पण मला ऐकू येत होतं.. आणि मी ऐकलं. तेवढं चालतं. 

मारमालेड - ‘राहुल... sorry ना... तुला माहितीये ना माझे फोटो छान येत नाहीत.’ 
पापाराझी गप्प. 
मारमालेड - ‘इतका चिडलास?’ 
पापाराझी गप्प. 
मारमालेड - ‘आता काढ ना... मी तयार होऊन आलेय.’ 
पापाराझी गप्प. 
मारमालेड - ‘come on! इतकं काय?’ 
पापाराझी - तुला माहितीये मोनू... ‘फोटो नको काढूस’ हे शब्द ऐकले की काय होतं माझं ते.’ 
मारमालेड - I know I know... I am so sorry. 

पुढचं ऐकलंच नाही. मला रडूच आलं. पूर्वी एकदा मी पापाराझी आणि पार्सलचं भांडण ऐकलं होतं. चोरून नाही, कारण ते इतक्‍या जोरात बोलत होते, की आत पण ऐकू येत होतं. पापाराझी म्हणत होता, ‘मी सगळं दादासारखं करावं असा हट्ट का केलात तुम्ही? तुमच्यामुळं रोज मन मारून जगतोय मी.’ पार्सलच्या डोळ्यात पाणी होतं. ती म्हणाली, ‘काळजी होती राजा तुझी. फोटो काढून बायकापोरांचं पोट कसं भरणार?’ तेव्हा मला काही कळलं नाही. पण एकदा Three Idiots बघताना आम्ही सगळे हसत होतो पण पापाराझी रडायला लागला. तेव्हा मला कळलं. त्याला फोटोग्राफर व्हायचं होतं. पण पार्सलनं त्याला कम्पल्सरी इंजिनियर केलं. म्हणून मला आणि मेकूडला तो नेहमी म्हणतो, ‘तुम्ही तुम्हाला हवं ते करा... follow your heart.’ 

माझं ठरलं आहे. मी कधीच त्याला ‘फोटो काढू नकोस’ असं म्हणणार नाही. तो जगातला बेस्ट फोटोग्राफर नसेल, पण तो जगातला बेस्ट बाबा आहे. कारण त्यानं आमच्यासाठी फोटोग्राफी सोडली. 

I love you पापाराझी. ओके बाय गुडनाईट...

संबंधित बातम्या