जय जवान! 

विभावरी देशपांडे
सोमवार, 4 मार्च 2019

साराची डायरी
 

मी  आज MATHS क्‍लासमधून घरी आले तेव्हा पापाराझी सोडून (कारण तो घरी नव्हता) सगळे टीव्हीकडे बघत होते. खूप गंभीर होऊन.. आणि नाना... नाना चक्क रडत होते! याला काय अर्थ आहे? मी रडले की ते नेहमी मला म्हणतात, ‘ए! रडूबाई! माझा शूर शिपाई आहेस ना तू? रडतेस काय?’ नाना आर्मीत होते ना! त्यामुळं अजूनही ते तसंच बोलतात.! ‘जवान! खाना खाया?’ ‘जवान! होम वर्क किया?’ ‘जवान jogging किया?’... आजकाल तर रविवारी सकाळी घरी येतात. मी झोपलेली असते. माझ्या बेडपाशी येऊन जोरात ओरडतात, ’How’s the josh?’ मी दचकून जागी होते आणि म्हणते, ’High sir!’ तर हे लगेच मला jogging ला घेऊन जातात. आधी जाम बोर होतं. पण नंतर ते मला डोसा खायला नेतात ते मला आवडतं. 

... तर मी काय सांगत होते? असे माझे सोल्जर नाना रडत होते. मारमालेडनी त्यांचा हात धरून ठेवला होता. नानी डोळे मिटून बसली होती. पार्सल चक्क तिचा कुकरी शो न बघता न्यूज बघत होती.. आणि मेकूड फोन बाजूला ठेवून हेडफोन्स न लावता बसली होती. मला टेंशन आलं. टीव्हीवर खूप धूर.. गाड्या, पळणारे सैनिक दिसत होते. मी नीट ऐकलं तेव्हा कळलं, की काश्‍मीरमध्ये परत मोठा terrorist attack झाला. उरीपेक्षा मोठा. एका van मध्ये बसलेल्या ४८ का अशाच काहीतरी जवानांना एका बाँब भरलेल्या ट्रकनी मारून टाकलं. ते आत्ताच सुटी संपवून परत चालले होते. मला वाईट वाटलं. पण मला रडू नाही आलं. मी त्या कुणालाच ओळखत नव्हते ना, त्यामुळं नसेल आलं. नानांचं ठीक आहे, ते स्वतः सोल्जर होते. त्यामुळं त्यांना सगळे सोल्जर्स आवडतात. पण बाकीच्यांना इतकं काय झालं? मी काही बोलले नाही. मारामालेडचं I pad पडलं होतं डायनिंग टेबलवर. ते उचललं. एरवी ती मला तिचं फेसबुक बघू देत नाही. पण आत्ता तिचं लक्षच नव्हतं म्हणून मी फेसबुक बघायला लागले. दीपिकाचा रेड कार्पेट लुक पहिला, दोन - तीन ट्रेलर पहिले. इतक्‍यात मला एक video दिसला. एका अमेरिकन घराच्या दारात एक मोठं gift pack होतं. एक अगदी छोटी मुलगी खूप कष्ट करून ते wrap काढत होती. खूप वेळानी ते उघडलं. आत एक box होता. तिनी तो उघडला आणि त्यातून तिचा बाबा बाहेर आला! ती मुलगी आनंदानी जोरात ओरडली. तिच्या बाबानी तिला उचलून घेतलं. तिच्या खूप पप्प्या घेतल्या. मग मी खाली काय लिहिलं आहे ते वाचलं. तिचा बाबा आर्मीत होता. तिच्या वाढदिवसाला तो सुटी घेऊन तिला सरप्राईज द्यायला आला होता... मला कळलंच नाही मला काय झालं. पण तो व्हिडिओ बघून माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणीच वाहायला लागलं. कसं वाटत असेल त्या मुलीला? माझा बाबा ऑफिसला जातो तेव्हा मला माहीत असतं, की तो संध्याकाळी येणार आहे. एखाद्या दिवशी त्याला मीटिंगमुळे उशीर झाला आणि मला झोप लागली तर मी रुसते. मग हिला कसं वाटत असेल? तिचा बाबा नेहमी बाहेरच असणार... आणि गेला की परत येईल याची guarantee च नाही ना! 

आणि आत्ता काश्‍मीरमध्ये गेले ते सोल्जर्स? त्यांना मुलं असतीलच ना? ते सुटी संपवून आले होते म्हणे. त्यांना बाय बाय करताना त्यांच्या मुलांना वाटलं पण नसेल, की आता आपला बाबा परत कधीच भेटणार नाहीये! मला खूप रडू यायला लागलं. इतक्‍यात बेल वाजली. बाबा आला.. मी धावत जाऊन त्याला मिठी मारली.. आणि नानांना म्हणाले, ‘नाना. मी मोठेपणी सोल्जर होणार..’ त्यांच्या डोळ्यातलं पाणी विसरून ते हसले. 

ज्यांची काहीच चूक नाही, जे देशासाठी लढतात, ते असे मरून जातात.. आणि जे असे बॉम्ब बनवतात, गन्स बनवतात किंवा असा बॉम्ब उडवला पाहिजे असं ठरवतात, ते कुठं मरतात? त्यांना शिक्षा कोण करणार? कोण याचं उत्तर देईल मला? ओके बाय गुडनाईट...

संबंधित बातम्या