‘मी happy होनाल!’ 

विभावरी देशपांडे
सोमवार, 18 मार्च 2019

साराची डायरी
 

आज मला फायनली कळलं आहे, की माझा जन्म कशासाठी झाला आहे. मेकूडला खूप लहानपणीच कळलं होतं म्हणे. कारण ती Maths Olympiad ला चौथी आली होती. त्यामुळं तिचं ठरलं की ती इंजिनिअर होणार. म्हणजे सरळच आहे ना, ज्याला maths आणि सायन्स चांगलं येतं तो किंवा ती important काहीतरी बनतात. म्हणजे डॉक्‍टर, इंजिनिअर किंवा सीए किंवा एमबीए. (डॉक्‍टर, इंजिनिअरचं मला माहीत आहे. पण सीए नक्की काय करतो मला माहीत नाहीये.) मेकूडला मेकूडला सगळंच येत असल्यामुळं ती काहीही बनू शकते. पण माझं तसं नाहीये. मला सायन्स येत नाही आणि maths आणि मी म्हणजे इंडिया आणि पाकिस्तान आहोत. (मी मी इंडिया आणि maths पाकिस्तान. क्‍लियर करते आहे.) एनीवे मला important काही व्हायचंच नाहीये. त्यामुळं चालेल मला maths नाही आलं तरी. पण मग कोण व्हायचं आहे, ते आज मला कळलं, जेव्हा मी Harry potter जिनं लिहिलं आहे, त्या जे. के. रोलिंग्जची गोष्ट वाचली. तिला जेव्हा Harry Potter ची गोष्ट सुचली, तेव्हा तिच्याकडं काहीच नव्हतं. तिच्या नवऱ्याचं आणि तिचं भांडण झालं होतं. तिला एक छोटं बाळ होतं. तिच्याकडं पैसे नव्हते, घर नव्हतं. ती एका बाकावर तिचं सामान पायाशी ठेवून, बाळाला मांडीवर घेऊन बसली होती. अचानक तिला एक आयडिया सुचली. ती लिहायला लागली आणि लिहीत गेली... आणि Harry Potter तयार झाला. काय भारी ना? Harry आणि त्याचे मित्र हॉगवर्डसमध्ये जाऊन जादू शिकतात. पण हिनं जादू न शिकतापण जादूच केली की! एका छोट्याशा आयडियेतून तिनं काय काय तयार केलं! Magic wand किंवा magic spell शिवाय! त्यातून तिला सगळं मिळालं. तिच्याकडं इतके पैसे आले, की ती इंग्लंडच्या क्‍वीनपेक्षाही श्रीमंत झाली. पण तिनं तिचे अर्धे पैसे अशा लोकांना दिले, ज्यांच्याकडं काहीच नव्हतं. म्हणजे त्यांच्यासाठी पण तिनं जादूच केली! मला असं जादूगार व्हायचं आहे. अशी जादू करायची आहे, ज्यामुळं मलाच नाही पण लोकांनापण खूप आनंद मिळेल. 

मी खूप लहान होते ना, म्हणजे बोबडकांदा लहान; तेव्हा आमच्या घरी एक काका आले होते. ते मेकूडचं खूप कौतुक करत होते, की तिला कसं सगळं येतं. अभ्यास, डान्स, चित्र, कराटे, स्केटिंग, ओरिगामी, Maggi, ऑम्लेट, चहा वगैरे वगैरे... (मी आत्ता आहे तेवढी तेव्हा मेकूड होती. तेव्हा already तिला हे सगळं यायचं.) हां... तर ते म्हणत होते ही खूप मोठी इंजिनिअर किंवा सायंटिस्ट होईल, NASA मध्ये जाईल वगैरे. मग त्यांनी मला विचारलं, ‘सरूबाई.. (शी... किती बोर नाव! पण मी सगळ्यांना नावं देते त्यामुळं मला कुणी दिलं तर मला accept करायला पाहिजे)... हं... सरूबाई.. तू कोण होणार मोठेपणी?’ तर मी म्हणाले, ‘मी happy होनाल!’ यावर सगळे हसले. मग मी कशी अजून लहान आहे. मला अजून कसं कळत नाही, असं बोलणं सुरू झालं. नानी सगळं शांतपणं ऐकत होती. सगळ्यांचं बोलून झालं तेव्हा ती म्हणाली, ‘तुम्हाला कळतंय का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सरस्वतीलाच कळली आहे. तुम्ही आयुष्यात कोण व्हायचं, किती पैसे मिळवायचे, कुठं घर घ्यायचं, हे सगळं ठरवता. पण आनंदी राहायचं ठरवता का? आणि हे सगळं करून तुम्ही आनंदी होता का? तिनं आनंदी व्हायचं ठरवलं आहे. आपण सगळ्यांनी हाच प्रयत्न केला तर?’ 

तेव्हा मला काहीच कळलं नाही ती काय म्हणत होती ते. पण आज मला कळलं. जे. के. रोलिंगला maths यायचं की नाही मला माहीत नाही. पण ती इंजिनिअर, डॉक्‍टर असं important काही नव्हती. तिला खूप प्रॉब्लेम्स होते. पण तिनं ठरवलं आपण happy व्हायचं आणि मग तिला येत होती ती जादू तिनं केली. तशी काहीतरी जादू मला येतच असेल की! मी ती करणार आहे. 

हं... पण मला नक्की कुठली जादू येते, तेच मला अजून कळलेलं नाहीये. पण कळेल. मी जादू करणार आणि आनंदी होणार हे मला माहीत आहे. ओके बाय गुड नाईट...

संबंधित बातम्या