Adopted मी 

विभावरी देशपांडे
सोमवार, 25 मार्च 2019

साराची डायरी
 

अजिबात आवडत नाही. कारण माझं काहीच तिला आवडत नाही! ती मला सारख्या instructions देते. रोज तोच फ्रॉक घालू नकोस, हेयर band लाव. दात नीट घास, चष्मा साफ कर, अभ्यास कर, कुठलीतरी हॉबी जॉईन कर, निदान पुस्तकं तरी वाच, पेन असं पकड, लिहिताना मान खाली ठेवू नकोस, Maggi ही महिन्यातून एकदाच, अभ्यास कर.. हेच हेच हेच... तिला असं वाटतं की माझं सगळंच चुकतं. माझ्या शंभर कपड्यांमधून मला नेहमी हाच सापडतो फ्रॉक.. कारण तो नेहमी क्‍लासमधल्या स्कॉलर मुलांसारखा पुढे पुढे करतो. (आमच्या क्‍लासमधल्या तनयासारखा.) पण तिचं म्हणणं आहे की ती एवढी भारी डिझायनर आहे तर तिच्या मुलीनं तिनं सांगितलेले कपडे घालायला हवेत. पण माझी स्टाइल वेगळी असूच शकते ना? पण नाही. सारखी रागावते. मेकूड मला लहानपणी म्हणायची, ‘तुला आईबाबांनी adopt केलं आहे.’ तेव्हा मी रडायचे आणि मारमालेड मेकूडला रागवायची. पण आता मला वाटतंय मेकूड खरंच सांगत होती. मी नक्की adopted आहे. म्हणून मी तिला आवडत नाही. 

आज पिक्‍चरमधला सीन झाला आमच्या घरी. मी क्‍लासमधून घरी आले तेव्हा पार्सल देवळात गेली होती आणि मारमालेड बुटीकमधून लवकर आली होती. मी कालचाच ड्रेस घातला होता. तिनं माझ्याकडं बघितलं आणि म्हणाली, ‘का? का वागतेस असं? मी कालच तुझ्यासाठी...’ आणि मग पुढचं मी ऐकलंच नाही. (माझ्या डोक्‍यात एक स्विच आहे. मारमालेड बोलायला लागली की मी ते automatic बंद करते. मग मला काही ऐकूच येत नाही.) पण लास्ट लाइन नवीन होती. ती म्हणली, ‘कधीकधी वाटतं तू माझी मुलगी नाहीस, शत्रू आहेस.’ माझी एकदम हटलीच. मी पण म्हणाले, ‘मग नाहीच आहे मी तुझी मुलगी. तू मला adopt केलं आहेस, मला माहीत आहे.’ असं म्हणून मी तरातरा खोलीत गेले आणि दार लावून घेतलं. फार भारी वाटलं मला. जेवायची वेळ झाली तरीही मी बाहेर आले नाही. मी असं imagine केलं की बाहेर दारासमोर उभे असतील. सगळ्यांना रडू येत असेल. सगळे म्हणत असतील, ‘भगवान के लिये दरवाजा खोल दो।’ पण खूप वेळ तसं काहीच झालं नाही. मग मला खूप भूक लागली. मी हळूच दार उघडून बघितलं तर मारमालेड माझ्याच खोलीकडं येत होती. मी दार लावून घेणार तेवढ्यात तिनं ते धरलं. तिच्या हातात cheese macaroni होतं. तिनं ते माझ्या टेबलवर ठेवलं आणि जायला लागली. तर मला अचानक तिच्या डोळ्यात पाणी दिसलं. मारमालेड रडत होती! मी तिला म्हटलं, ‘आई... काय झालं?’ ती म्हणाली, ‘काही नाही गं... चिली फ्लेक्‍समुळं असेल..’ फुल फिल्मी मोमेंट. पण मला कळलं की ती रडतेय. मी तिला म्हणाले, ‘सॉरी.. मी असं बोलले तुला..’ तर ती एकदम खाली बसली आणि रडायला लागली. मला कळलंच नाही काय करायचं ते. मी असंच म्हणाले होते, I did not mean it! ती म्हणाली, ‘सरू, मला माहीत आहे गं... मी तुला सारखी रागावते. पण काय करू? मला सारखं वाटतं माझं काम वाढलं आहे, त्यामुळं माझं तुझ्याकडं नीट लक्ष नाहीये. तुझं सगळं परफेक्‍ट असावं. मी कामात बीजी असल्यामुळं तुझं सगळं नीट झालं नाही तर? सारखी हीच भीती वाटते मला. खूप टेंशन येतं आणि मग चिडचिड होते.’ मला shock च बसला! सारखी strict असलेली मारमालेड actually सारखी घाबरलेली असते! मला एकदम ती छोटी मुलगीच वाटली. मी तिच्या डोक्‍यावरून हात फिरवला. ती माझ्या maths पेपरच्या आधी फिरवते तसा. तर ती एकदम माझ्या कुशीत येऊन रडायलाच लागली. मी म्हणाले, ‘आई.. तू टेंशन नको घेऊस, मी आहे ना?’ ती नाही का म्हणत, ‘तू टेंशन नको घेऊस.. मी आहे ना?’ मग खूप वेळ ती मला मिठी मारून बसली होती. माझी आई एकदम माझी मुलगीच झाली. माझा सगळा राग निघूनच गेला. कारण मला कळलं, की ती चिडते कारण ती घाबरलेली असते. कारण तिचं सगळ्यात जास्त माझ्यावर प्रेम आहे, या जगात. आता मी adopted असले तरी काय फरक पडतो? ओके बाय गुड नाईट...
 

संबंधित बातम्या