‘बिच्चारा’ सोहम 

विभावरी देशपांडे
सोमवार, 1 एप्रिल 2019

साराची डायरी
 

मला माहीत आहे की magic wand, magic dust वगैरे काहीच खरं नसतं. सिनेमात दाखवतात की एक मुलगी अचानक तीस वर्षांची झाली वगैरे, पण तसं खऱ्या आयुष्यात होत नाही. पण होत असतं तर मला मुलगा व्हायला खूप म्हणजे खूप आवडलं असतं. कारण सिम्पल आहे. मुलाचं लाइफ एकदम ईझी असतं.. चिल असतं. ते वाट्टेल ते कपडे घालून फिरू शकतात. त्यांना सतत ‘असं बसू नकोस, असं करू नकोस, पाय वर ठेवू नकोस, मारामारी करू नकोस’ असं कुणीही सांगत नाही. उलट त्यांनी असं काही केलं तर ‘कसला बिनधास्त आहे हा! ह्याची काळजीच नाही’ असं म्हटलं जातं. 

काल मी shorts घालून खाली चालले होते खेळायला. हिवाळा एका दिवसात गायब झाला आहे आणि अचानक खूप गरम व्हायला लागलं आहे. मेकूड म्हणाली, ‘ग्लोबल वॉर्मिंग’चा इफेक्‍ट आहे. याहून खूप जास्त वाट लागणार आहे.’ ती लागेल तेव्हा लागेल पण आत्ता खूप उकडतं आहे हा प्रॉब्लेम आहे. म्हणून मी shorts घातल्या तर पार्सल एकदम ओरडलीच, ‘हे काय? हे कसले कपडे? तंगड्या दाखवत कशाला फिरायचं? आता तू लहान नाहीयेस. मोठी झाली आहेस. असे कपडे नाही घालायचे..’ पार्सल खूप confused आहे. तिला हवं तेव्हा मी मोठी असते आणि हवं तेव्हा लहान. मला सतत ‘हे करू नकोस’, ‘ते करू नकोस’ सांगत असते ती. परवा तर मला चहा शिकवला आणि म्हणाली, ‘या सुट्टीत सगळा स्वैपाक आला पाहिजे, पोळ्यांसकट.’ कशाला? मग आमच्या कमलमावशी काय करतील? आणि त्या नाही आल्या आणि मी स्वैपाक केला तर swiggy कसं वाटेल?.. पण ‘मी मुलगी आहे, म्हणून हे सगळं मला आलं पाहिजे’ असं तिचं म्हणणं आहे. म्हणून मला मुलगा व्हायचं आहे. 

आमच्या शेजारी सोहम राहतो. मला त्याचं लाइफ चोरायचं आहे. त्याला काही टेंशनच नाहीये. तो shorts आणि बनियन घालून दिवसभर उंडारत असतो. उन्हात फिरतो. Tan होण्याचं टेंशन नाही. घरात कुणीही त्याला काहीही काम सांगत नाही. तो मारामाऱ्या करतो. दादागिरी करतो. त्यानी खालीच एक बोका पाळला आहे. त्याचं नाव ‘समशेर’ आहे. तो त्याच्यासारखाच माज करतो. डोळे वटारून सगळ्यांकडे बघत असतो. सोहम आणि समशेर आमच्या बिल्डींगचे राजे असल्यासारखे फिरत असतात. त्यांना कुणीही काहीही म्हणत नाही. सोहम आर्मीत जाणार आहे. त्याचं सगळं सेट आहे. तो अभ्यासातपण हुशार आहे... आणि भारी क्रिकेट खेळतो. मला त्याच्यासारखं लाइफ मिळायला हवं होतं. 

आज संध्याकाळपर्यंत मला असंच वाटत होतं. पण आज संध्याकाळी मी जे पाहिलं त्यावरून माझं मत बदललं... आज दुपारपासून समशेर कुठेतरी गायब झाला. आम्ही सगळ्यांनी त्याला खूप शोधलं पण सापडलाच नाही. आधी सोहम एकदम cool होता. पण सात वाजायला आले तसा तोपण घाबरला. समशेर मिळेचना. बिल्डिंगमधली मोठी माणसंपण जमा झाली. सुतारकाका म्हणाले, ‘हौदात पडला असणार तो.’ सोहम म्हणाला, ‘पण त्याला पोहता येतं. बाहेर आला असता.’ तर ते म्हणाले, ‘केला असेल प्रयत्न, नसेल जमलं. बुडाला असेल. आगाऊच होता बोका..’ सुतारकाका डायरेक्‍टच बोलतात. सोहमनं हे ऐकलं आणि तो ढसाढसा रडायलाच लागला! मी काय कुणीच पाहिलं नव्हतं त्याला रडताना! बहुतेक जन्माला आला त्यानंतर पहिल्यांदाच रडला असणार. त्याच्या आईनं त्याला जवळ घेतलं तर तो आणखीच रडायला लागला. तेवढ्यात त्याचे बाबा आले ऑफिसमधून. त्यांना काय झालं ते समजलं. मला वाटलं ते पण त्याला जवळ घेतील. तर त्यांनी त्याला खांद्याला धरून ओढलं आणि म्हणाले, ‘रडतोस काय पोरीसारखा? You are a tough man! आवाज एकदम बंद... गप्प!’ सोहमनं try केलं पण त्याला रडू थांबवता आलंच नाही. ते आणखी चिडले आणि म्हणाले, ‘तू कसला आर्मीत जाणार! रडक्‍या! चल वर!’ आणि त्याला almost ओढत घेऊन गेले. 

मला नाही व्हायचं boy, वाईट वाटल्यावर साधं रडतापण येत नसेल तर कसं होईल? श्‍वास अडकून मरून जाईन ना मी. इतक्‍या वर्षात पहिल्यांदा मला सोहम ‘बिचारा’ वाटला. 

समशेर अजून सापडलाच नाहीये. बिचारा. ओके बाय गुड नाईट...

संबंधित बातम्या