मिस्टर पपी

विभावरी देशपांडे
सोमवार, 8 एप्रिल 2019

साराची डायरी
 

आमच्या बिल्डींगच्या मागच्या बाजूला एक टाकी आहे. त्याच्या मागं एक छोटासा square आहे. तो एकदम आतल्या साइडला आहे. त्यामुळं त्या square ं मधलं कुणालाच काही दिसत नाही आणि टाकीच्या साइडनी तिकडं जायचं ठरवलं तर तुम्हाला झीरो फिगर कम्पल्सरी आहे. त्यामुळं माझ्यासारखे काहीच लोक तिकडे जाऊ शकतात. परवा बी बिल्डींगमधल्या तेजसनी माझा हेयर band घेतला आणि टाकीकडं टाकून दिला. तो काढायला मी तिकडं गेले तर तिकडं मला या जगातली सगळ्यात गोड आणि भारी गोष्ट दिसली. कुत्र्याचं एक छोटंसं पिल्लू. एवढुस्से डोळे, छोटे छोटे कान, इत्कुशी शेपूट! मला हाय लेव्हलचं प्रेम वाटलं एकदम. ते पाण्यात भिजून आलं होतं कुठून तरी. शेजारच्या बंगल्यातल्या गिडवानी अंकलमुळं असेल. (ते सारखे झाडांना पाणी घालतात. एकदा त्या पाण्यात बुडून ती झाडं मरणार आहेत.) पिल्लू भिजून थरथर कापत होतं. मी त्याला ‘यु यु’ केलं तर ते माझ्याकडं आलं. त्याची आई कुठं असेल कोण जाणे. मी माझ्या ड्रेसनी त्याला पुसलं. घरी जाऊन त्याच्यासाठी दूध आणलं. त्यानी ते मुटूमुटू पिऊन टाकलं. मग आम्ही खूप वेळ खेळलो. अंधार पडायला लागला. आता मला घरी जावंच लागणार होतं. म्हणून मी त्याला जवळ घेऊन बाय बाय केलं आणि निघाले. तर ते जोरजोरात ओरडायला लागलं. मी पुन्हा त्याला जवळ घेऊन शांत केलं. पण मी निघाले तर परत तेच. कुई कुई कुई... मी लहान असताना मारमालेड बाहेर निघाली, की मी असंच करायचे म्हणे. आई शप्पथ! म्हणजे ते already मिस मला मिस करत होतं. मला भारी वाटलं. पण मला जावंच लागणार होतं. मी निघाले तर watchman काका म्हणाले, ‘तुला साद घालतोय जनू!’ (साद म्हणजे हाक. ‘साद घालती हिमशिखरे’ अशी कविता आहे मराठीत.) एकदम रडूच आलं. घरातले सगळे कुत्रा पाळायच्या total against आहेत. मारमालेडला आवडतात पेट्‌स, पण ती म्हणते, ‘तुमच्या दोघींचं करता करता वाट लागतेय माझी. आणखी एक बाळ नको.’ मी आले घरी. पण रात्रभर मला त्याचं कुई कुई ऐकू येत होतं. माझं ठरलं. मी त्याला घरी आणणार. मी मेकूडला confidence मध्ये घेतलं. बाकी आमचं पटत नाही. पण मला माहीत आहे, तिला कुत्रा आवडतो. म्हणजे ती सकाळी shorts आणि high pony घालून style मध्ये त्याला walk ला नेऊ शकेल; म्हणून. सकाळी सगळे गेल्यावर मी खाली गेले आणि त्याला वर आणलं. त्याला दूध दिलं, अंघोळ घातली. ते एकदम खूष झालं. आम्ही दिवसभर त्याच्याशी खेळलो. मारमालेड आणि पापाराझी यायच्या वेळी आम्ही ‘कोई मिल गया’ मध्ये जादूला लपवतात तसं त्याला लपवलं. मारमालेड जाम हुशार आहे. त्यामुळं आम्हाला वाटलं की तिला लगेच कळेल. पण तिला कळलंच नाही. पण दुसऱ्या दिवशी सकाळीच ती कॉफी करत असताना मिस्टर पपी खोलीबाहेर पळाले आणि तिच्या पायात आले. तिनी ’awwww’ म्हणून त्याला उचलून घेतलं. आम्हाला वाटलं झालं आपलं काम. पण लगेच तिच्या लक्षात आलं की हा माझा उद्योग आहे. 

मग पुढचा अर्धा तास आमचं खूप भांडण झालं. मी सांगितलं तिला की मी नाही आणलं त्याला, त्यानी ठरवलं माझ्याबरोबर यायचं. पण तिनी आणि पापाराझीनी ऐकलंच नाही. मला क्‍लियर सांगितलं, की त्याला सोडून यायचं. मी पण भारी आहे. मिस्टर पपीला घेऊन मीच घर सोडलं. मी त्या square मध्ये दिवसभर त्याच्याबरोबर बसले. रात्रीपण घरी गेले नाही. मग रात्री मारमालेड आणि पापाराझी मला घरी न्यायला आले. मी म्हणाले, ‘मी येणार नाही.’ तर मारमालेड म्हणाली, ‘ओके, मग आम्ही ह्याला एकट्याला घेऊन जातो.’ माझा विश्‍वासच बसेना. मी रडायलाच लागले. पापाराझी म्हणाला, ‘तुला इतका आवडलाय ना तो? मग नेऊ त्याला. पण मला सांग, आपण कुठं गेलो तर कोण करणार त्याचं. म्हणून नाही म्हणत होतो.’ तर वॉचमनकाका म्हणाले, ‘जा घेऊन त्याला, तुमाला जमनार न्हाई तेव्हा मी करीन त्याचं. साद घालत होता तुला रात्रभर.’ मी मारमालेडला घट्ट मिठी मारली. तेवढ्यात मला दिसलं, गिडवानी अंकल हे सगळं बघत होते. ते म्हणाले, ‘हा हा हा हा ! You never choose the dog, the dog chooses you!’ ह्यानं मला choose केलं आहे म्हणल्यावर मी त्याला कसं सोडू? जाताजाता मारमालेड म्हणाली, ‘अगं पण नाव काय ठेवायचं ह्याचं?’ मी म्हणाले, ‘हा मला साद घालत होता ना. म्हणून ह्याचं नाव साद!’ 
ईई.. माझ्या डायरीवर शू केली सादनी.. पण त्याला allowed आहे. मला पुसायला पाहिजे पण. ओके बाय गुडनाईट... 

Tags

संबंधित बातम्या