माझा सायन्स प्रोजेक्ट
साराची डायरी
आमच्या सोसायटीत एक हिरवंगार झाड आहे, लांब लांब फांद्यांचं. ते खूप उंच नाहीये, पण ढब्बू आहे. नानी म्हणाली, ‘झाड ढब्बू नसतं, त्याचा विस्तार मोठा असतो.’ असेल. विस्तार तर विस्तार. त्या झाडाच्या फांद्या खाली आल्या आहेत. कसलं झाड आहे ते मी विसरले. पण त्या फांद्यांवर सहज हात पोचतो. परवा त्या झाडाच्या एका पानावर मला एक रंगीबेरंगी caterpillar दिसली. आम्हाला मागच्या टर्मला सायन्समध्ये शिकवलं आहे. अळीच्या तोंडातून येणाऱ्या थुंकीनी ती एक घर बनवते. त्याला ककून म्हणतात आणि मग तिची वेळ झाली, की तो ककून फोडून ती बाहेर येते. तेव्हा तिचं फुलपाखरू झालेलं असतं. मला जादूच वाटली. मला पाहायची होती ती जादू. म्हणून मी हळूच त्या अळीला उचललं आणि एका काडेपेटीत ठेवलं.
मी ठरवलं, की रोज तिला खायला द्यायचं आणि तिचा एक फोटो काढायचा. तिचं फुलपाखरू झालं, की त्या फोटोंचा एक कोलाज करून भिंतीवर लावायचा. माझं समर प्रोजेक्ट. मी फक्त नानीलाच ही आयडिया सांगितली. कारण माझ्या top class आयडिया फक्त तिलाच समजतात आणि आवडतात. पण यावेळी नाही आवडली तिला. ती म्हणाली, ‘तिला असं बांधून कशाला ठेवायचं? तिला जिथं राहायचं आहे तिथं राहून तिचा कोष विणू दे..’ मला रागच आला नानीचा. नाहीतरी ती अडकणार होतीच ना तिच्या ककूनमध्ये! मी तिला फक्त सेफ जागा करून दिली आहे आणि फ्री मध्ये खायला पण मिळतंय तिला! मग प्रॉब्लेम काय असणार तिला? नानीचं उगाच काहीतरी.
मी खूप नीट लक्ष देत होते तिच्याकडं. दर अर्ध्या तासानं काडेपेटी उघडून तिला खायला द्यायचे आणि फोटो काढायचे. पण त्यामुळं जे व्हायचं ते झालं. मेकूडनं लगेच कम्प्लेंट केली. ‘सरस्वती अभ्यासाला बसली, की शंभर वेळा काडेपेटी उघडून फोन घेऊन टाइमपास करते!’ झालं! मारमालेड आणि पापाराझ्झीनी मला लांबलचक लेक्चर दिलं.
‘तुला सिरीयसनेस कसा कळत नाही? पाचवीत आहेस आता. पाच वर्षात दहावी आहे.’
‘आर्टसला पण admission मिळत नाही चांगल्या कॉलेजमध्ये सहज.’
‘..आणि मुद्दा मार्क्सचा नाहीये. तुला माहीत आहे आम्ही टिपिकल parents नाहीयोत. पण sincerely कष्ट करायची सवय कशी लागणार?’
‘मी तुझ्याएवढी होते तेव्हा... हाताक्द्बाला अब्स्ताक्द्÷फप्त्नाहा अलाबागाराजालान्बाग्द अहादेझ्बाक्ज्ल्डफ्झ्बा (चुकीचं लिहीत नाहीये. या वाक्यानंतर मला सगळं असंच ऐकू येतं...’
ते दोघं खूप वेळ बोलले मग. बहुतेक अर्धा तास. जेव्हा ते दमले तेव्हा गप्प झाले. मग
मी म्हणाले, ‘मी science चा प्रोजेक्ट
करून बघत होते. Biology मध्ये आहे आम्हाला हे.’
मारमालेडला पटलं माझं बहुतेक. पण तेवढ्यात मेकूड पुन्हा पचकली, ‘लास्ट टर्मच्या syllabus मध्ये होतं ते. आत्ता नाहीये..’
हिला काय वाट्टेल ते लक्षात राहतं यार! झालं! आत्ता गप्प बसलेली मारमालेड पुन्हा on झाली ‘आधी जे syllabus मध्ये आहे ते तरी कर! मग कर extra काय ते! सगळी सुट्टी पडली आहे. आम्ही तर सुट्टीत पण रोज एक पान लिहायचो. स्घ्दास्ज्काक्लाल्का अज्भ्दस्क्ल्जा;ला अह्गाकला... (सेम! या वाक्यानंतर पण सेम होतं माझं) सगळं ऐकून घेतलं. आत आले आणि माझं पुस्तक उघडलं. ती काडेपेटी माझ्या समोरच होती. एकदम मला काय वाटलं माहीत नाही. मी ती उचलली आणि धावत खाली गेले. माझ्या अळीला उचलून मी परत झाडावर ठेवलं. मला कळलं नानी काय म्हणत होती ते. मला वाटलं मी उगाच अडकवून ठेवलंय तिला. आत्ता मला वाटतं आहे तसंच वाटत असेल का तिला? मला choice नाहीये. मला असंच करावं लागणार आहे. पण तिचं तसं नाहीये.
जरा वेळ वाईट वाटलं मला. पण थोड्या दिवसांनी जेव्हा तिचं फुलपाखरू होईल तेव्हा मी परत भेटीन की! आणि मी नक्की ओळखीन तिला. Hundred percent!
आता मला अभ्यास करायचा आहे. ओके बाय गुड नाईट...