‘क्रेझी’ बायका 

विभावरी देशपांडे
सोमवार, 22 एप्रिल 2019

साराची डायरी
 

कालपासून मेकूड जरा sad sad च आहे. मला वाटलं तिचा नवीन ’we are just friends’ पण गायब झाला की काय? तसे तिचे हार्टब्रेक्‍स होत असतात पण सध्याचा ‘जस्ट फ्रेंड्‌स’ जरा सिरीयस आहे असं वाटतं आहे. मला वाटलं परत काहीतरी झालं का काय! पण सकाळीच भेटला तिला तो. कारण काहीतरी वेगळं होतं. ते मला नंतर कळलं. फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर! इतके दिवस तिच्या सगळ्या फ्रेंड्‌स मेकूडला समजावत होत्या, की यावेळी रुमर नाहीये, फरहान खरंच तिच्याशी लग्न करणार आहे. पण हिला पटतच नव्हतं. पण काल फरहाननी स्टोरी टाकली म्हणे instagram वर. ’Together forever’ अशी. ‘म्हणून! मला काही कळतच नाही. ज्यांना आपण ओळखत नाही, ज्यांना आपण भेटलो नाहीये, आपण आहोत हे पण ज्यांना माहीत नाहीये. त्यांच्यासाठी इतकं वेडं का व्हायचं? बोरच आहे. 

पण गंमत माहितीये का? फक्त मेकूडच नाहीये अशी, मारमालेड पण आहे. Can you believe? गेले काही महिने काय वाट्टेल ते झालं तरी ती साडेआठला घरी येतेच येते. एरवी ती एकही मराठी सिरीयल अज्जिबात पाहत नाही. सारखी शिव्या घालते त्यांना. पण गेले काही महिने एक सिरीयल कम्पल्सरी पाहते. मी म्हटलं भारी स्टोरी असेल. पण तसं नव्हतं. मागच्या आठवड्यात गंमत झाली एक. तेव्हा मला खरं काय ते कळलं. पापाराझ्झीचे केस खरंतर पांढरे झालेत. पण तो न चुकता ते कलर करतो. त्याला कुणाला कळू द्यायचं नाहीये. पण गेला एक महिना त्यानी केसच कलर नाही केले. मारमालेड रोज त्याला आठवण करत होती, पण हा बरोब्बर तेवढंच विसरत होता. शेवटी मारमालेड वैतागली आणि म्हणाली, ‘असं कसं विसरतोस तू? किती पांढरे दिसतायेत. तू केस कलर करणार नसलास तर मी नाही येणार शिरीनच्या पार्टीला!’ एरवी ती अशी चिडली की तो गप्प बसतो. पण यावेळी एकदम चिडलाच... ‘काय आहे सारखं कलर कर कलर कर! माझे थोडेसे पांढरे केस चालत नाहीत आणि त्याचे इतके पांढरे झालेत तरी तुला आवडतोच तो!’ ती म्हणाली, ‘काय बोलतो आहेस? कोण तो?’ तिनी हळूच येऊन आमच्या खोलीचं दार लावलं. (त्या दोघांना वाटतं दार sound proof आहे. पण आम्हाला त्यांची सगळी भांडणं नीट ऐकू येतात.) 

‘तोच.. काय एवढं आहे त्यात कळत नाही मला..’ पापाराझ्झी. 
‘प्लीज राहुल, तो तो करू नकोस. एवढं असेल तर नाव सांग’ मारमालेड. 
‘जाऊ दे मला काय करायचं आहे? तू आणि तुझा तो’ पापाराझ्झी. 
(जरा सिरीयस व्हायला लागलं होतं आता..) 
‘ठीक आहे, नाही ना सांगायचं? नको सांगूस!’ मारमालेड. 
‘तोच... तोच... सुबोध भावे!’ पापाराझ्झी. 
‘हा हा हा हा हा हा हा हा हा...’ मारमालेड. 
‘ई! एवढंच ना!’ मी आणि मेकूड. 

‘हसू नकोस. त्याची ती सिरीयल मिस करायची नाही म्हणून काय काय करतेस तू. तीन वेळा स्वीगी केलं आपण मागच्या आठवड्यात. इतका काही खास नाहीये बरं का तो!’ पापाराझ्झी. 

याच्यापुढचं भांडण त्यांनी त्यांच्या खोलीत कंटिन्यू केलं असावं. कारण काहीच ऐकू आलं नाही. पापाराझ्झीचं बरोबर आहे. मारमालेड जामच वेडी आहे सुबोध भावेसाठी. (आमच्या सोसायटीत राधा राहते, तिच्या आईबाबांचा फ्रेंड आहे तो. तर मारमालेडनी एकदा तिच्या आईला जेवायलाच बोलावलं घरी! एवढी काही फ्रेंडशिप पण नाहीये त्यांची, तरीपण..) 

तर मारमालेड एवढी मोठी असून अशी क्रेझी असू शकते तर मेकूड का नाही? मी हे नानीला सांगितलं, तर ती लबाड टाइप्स हसली आणि तिनी तिच्या पिशवीतल्या छोट्या पिशवीतल्या छोट्या पिशवीतून एक जुना black and white फोटो काढला. म्हणाली, ‘हा बघ माझा डार्लिंग! देव आनंद!’ 
मी खचलेच. माझ्या family मधल्या सगळ्या बायका वेड्या आहेत. Thank God मी नाहीये. 

काय? काय म्हणाली मेकूड? हा Daniel Radcliff किती लेम आहे??? आई शप्पथ! आता मेली ती. त्याच्याबद्दल असं कसं म्हणू शकते ती? किती भारी आहे तो. मला आता जाऊन मेकूडला धुवायचं आहे. ओके बाय गुड नाईट...

संबंधित बातम्या