व्होटिंगचं महत्त्व 

विभावरी देशपांडे
सोमवार, 29 एप्रिल 2019

साराची डायरी
 

मी  आता मारमालेडला मा आणि पापाराझ्झीला पा असा short form वापरणार आहे. एकतर ते लिहायला सोपं आहे आणि मा आणि पा कूल पण आहे. आई आणि बाबापेक्षा खूप जास्त कूल. सगळे लक्षात ठेवा. हां तर.. परवा मी खेळून आले तर मा (म्हणजे मारमालेड, आहे ना लक्षात?) चं अख्खं कपाट जमिनीवर आलं होतं. म्हणजे कपाटातल्या २०५६७ वस्तू. मी आत गेले तर ती तिच्या कॉलेजच्या फेयरवेल पार्टीचा हवा-हवाईचा ड्रेस घालायचा प्रयत्न करत होती. ती मधून मधून असं करते. हा ड्रेस झाला म्हणजे ती लग्नाआधी होती तेवढी बारीक झाली असा अर्थ होतो. तो almost बसला म्हणून ती जोरात किंचाळली. तेवढ्यात पापाराझ्झी म्हणजे पा बाहेरून ओरडला. ‘मोनिका.. सापडलं का?’ मा नी जीभ चावली आणि आणि २०५६७ गोष्टींमध्ये dive मारली. मी पटकन बाहेर आले. नाही तर मा नी तिचा क्‍यूट फेस करून मला आवरायला मदत करायला लावली असती. बाहेर नानी आणि नानांकडं पा, मा ची complaint करत होता. 

‘दर वेळचं आहे हिचं. इतकी महत्त्वाची डॉक्‍युमेंट्‌स नीट ठेवायची नाहीत म्हणजे काय? Pan card कुठं आहे? माहीत नाही. पासपोर्ट मीच ठेवतो, आधार कार्ड परवा तांदुळाच्या डब्यात होतं आणि आता... व्होटिंग कार्ड सापडत नाही. एक वर्ष झालं मी तिला आठवण करतो आहे, व्होटिंग कार्ड शोध, व्होटिंग कार्ड शोध. पुढच्या वर्षी इलेक्‍शन आहे. सिरीयसली घेतच नाही.’ 

एक वर्ष आधी? पा ग्रेटच आहे. इलेक्‍शन खूपच सिरीयसली घेतो तो. मोदी पण घेत नसतील एवढं! 
(Actually घेत असणार! कारण नाना आणि पा खूप वेळा बोलत असतात त्याबद्दल. मोदींची strategy, ---  campaign, ------- brand management.’ मोठे मोठे शब्द वापरून दोघं सतत बोलत असतात. बाकी नाना आणि पा ची फार ग्रेट फ्रेंडशिप नाहीये. पण इलेक्‍शन्स आली की ते बेस्ट फ्रेंड्‌स होतात, असं मेकूड म्हणाली. मागच्या इलेक्‍शनला मी पाच वर्षांची होते. मला आठवत नाहीये. मा म्हणते मी सारखी ‘अब की बार मोदी सरकार’ असं ओरडायचे. (कारण सगळेच तसं म्हणायचे.) पण यावेळी मला कळत नाहीये की नाना आणि पा ला नक्की ते आवडतात की नाही. परवा मोघे आजोबा आणि कृष्णन अंकलचं भांडणच झालं. मोघे आजोबा म्हणत होते पाच वर्षांत खूप डेव्हलपमेंट झाली आहे आणि कृष्णन अंकल म्हणत होते, ’NOTHINGA! HE HAS DONE NOTHINGA!’ GO AHEADA! VOTE FOR HIMMA!’ 

मी नानीला म्हटलंपण, ‘एवढं काय होतं सगळ्यांना इलेक्‍शन आलं की? इतके का सगळे हायपर होतात.’ ती म्हणाली, ‘हे बघ, तुझी एखादी खूप important वस्तू आहे. तुला तिची काळजी घ्यायला कुणीतरी हवंय. कारण तू एकटी नाही काळजी घेऊ शकत. तर तू कुणाला देशील ती?’ मला अज्जिबात expected नव्हता हा प्रश्‍न. मी विचार केला. वस्तू काय आहे त्याच्यावर आहे. असं कसं सांगणार? त्या माणसाला पण ती वस्तू important वाटली पाहिजे ना! म्हणजे मी समजा माझी मोरपिसं शेजारच्या रोहनला दिली, तर ‘हा काय कचरा आहे?’ असं म्हणून तो फेकून देईल ना! समजा माझं chocolate मेकूडला दिलं तर तीच खाऊन टाकेल ना! मी खूप वेळ विचार करत होते. नानी म्हणाली, ‘रात्री सांग.’ पण रात्रीपर्यंत मला एक नाव ठरवताच आलं नाही. ती म्हणाली, ‘आलं लक्षात? आपली वस्तू जपायला आपल्याला विचार करून माणूस ठरवायला लागतो. तर आपला आख्खा देश कुणी सांभाळायचा हे सिरीयसली नको घ्यायला? विचार नको करायला?’ मला हंड्रेड पर्सेंट पटलं तिचं. मी ठरवलं, जेव्हा मी १८ वर्षांची होईन तेव्हा मी इलेक्‍शन्स खूप सिरीयसली घेणार आहे. मा सारखं नाही करणार. मी पण खूप विचार करणार आहे. पण कसला विचार करायचा हे मला अजून कळत नाहीये. आणखी एक कन्फ्युजन आहे. इतके सगळे लोक इतका सगळा विचार करून व्होटिंग करतात तरीपण ते सगळ्याबद्दल तक्रार का करतात? त्यांना तरीपण करेक्‍ट माणूस का सापडत नाही? आम्ही व्होटिंग करून class monitor, head prefect सिलेक्‍ट करतो आणि वर्षभर त्याचं सगळं ऐकतो. आमचं selection एकदम परफेक्‍ट असतं. म्हणजे खरंतर १८ च्या आधीच्या मुलांनाच व्होटिंगची परवानगी असली पाहिजे. आता जे कोण ‘पीएम’ होतील त्यांना मी पत्र लिहिणार आहे आणि हा रूल बदलायला सांगणार आहे. पण आत्ता मला झोप आली आहे. ओके बाय गुड नाइट...

संबंधित बातम्या