देव आमचा मित्र 

विभावरी देशपांडे
सोमवार, 20 मे 2019

साराची डायरी
 

परवा पार्सल खूप दिवसांनी घरी आली. सॉरी.. आज्जी खूप दिवसांनी आली. (खूप दिवस ती घरी नसली की तिला हाक मारायची सवयच जाते. पार्सलचं खरं नाव आज्जी आहे हे मी विसरूनच जाते. परवापण असंच झालं. ती आली तर मी खूप excite झाले... आणि एकदम ओरडले, ‘पाऽऽर्सल आऽऽऽली!’ सगळे एकदम शॉक. मारमालेडलाच माहीत होतं हे नाव, त्यामुळं ती फसकन हसली. पण मला सॉलिड टेंशन आलं. पार्सल जरा सिरीयस टाइप्स आहे. पण मग ‘मा’ म्हणाली, ‘अहो.. तिला वाटलं तिचं पार्सल आलं. सरू.. पार्सल आली काय... पार्सल आलं म्हणतात मराठीत.’ मला एरवी सारखी करेक्‍शन केलेली आजिबात आवडत नाही. पण आत्ता आवडली. 

हं.. तर मी काय सांगत होते? पार्सल खूप दिवसांनी आली. ती यायच्या आधी २ दिवस आमच्याकडं वॉर झोन असतो. मारमालेड आग लागल्यासारखी घर आवरायला लागते. पापाराझ्झी घरातल्या सगळ्या ‘औषधां’च्या बाटल्या रद्दीवाल्या पवनला देतो. (ते दोघं अजूनही माझ्यासमोर त्यांना औषधाच्या बाटल्या म्हणतात. हू आर दे किडींग? पण मीपण त्यांना बरं वाटावं म्हणून ‘मला काहीच कळत नाही’ असा पपी फेस करते.) यावेळीही दोघांनी हे मिशन केलं. पण ‘मा’ची एक मोठी ऑर्डर होती काल. त्या गडबडीत एक मोठं काम राहिलं, ते म्हणजे देवपूजा! 

खरंतर हे काही बिग डील नाहीये. म्हणजे पार्सल काही अशी टेरर नाहीये. तिला पूजा आवडते, ती करते. तिला माहीत आहे की ‘पा’चा देवावर विश्‍वास नाहीये आणि ‘मा’ अजून कन्फ्युज्ड आहे. म्हणजे तिचं अजून ठरत नाहीये की देव असतो का नसतो. म्हणजे मोस्टली ती म्हणते की नसतो. पण काहीतरी इंपॉर्टंट किंवा डेंजरस झालं की तो असतो. म्हणजे एकदा मेकूड आठला घरी येणार होती ती ११ पर्यंत आली नाही. तिचा फोनपण बंद होता. तेव्हा मा आधी खूप रडली आणि मग देवघरासमोर जाऊन बसली. पण मेकूड घरी आल्यावर ती देवाला ‘थॅंक यू’ म्हणायला विसरली. असं कन्फ्युजन आहे. माझंपण आहे थोडंसं. पण आय कॅन हॅंडल इट. पार्सल मात्र खूप हाय लेव्हल भक्त आहे. रोज पूजा, मंत्र, उपास वगैरे सगळं. एक दिवसपण ब्रेक नाही. त्यामुळं देवांवर बसलेली धूळ पाहून ती अपसेट झाली. ‘मा’ आणि ‘पा’ तिला शेंड्या लावतात की तू नसताना आम्ही रोज पूजा करतो. तिनं सगळे देव घेऊन काका नंबर एक, आत्या नंबर एक आणि आत्या नंबर दोन असं तीन काँटिनेंट्‌समध्ये फिरू नये म्हणून तिला ते असं सांगतात आणि ती यायच्या आधी देवांना चकाचक अंघोळ आणि मेकओव्हर देतात. पण काल दोघंही विसरले. पार्सल काही बोलली नाही. पण तिच्याकडं बघून कळत होतं, की अपसेट आहे. ती नीट जेवलीपण नाही आणि जाऊन झोपली. ‘पा’ आणि ‘मा’ मग हळूच तिच्या खोलीत गेले. मी पण त्यांच्या मागं गेले आणि लपून ऐकायला लागले... 

‘आई सॉरी... माझं चुकलं. दोन दिवस खूप गडबड होती’ - मा. 
‘........’ - पार्सल. 
‘आई.. आम्हाला माहीत आहे तुला चालत नाही देवाकडं दुर्लक्ष झालेलं. पण कधीकधी गडबडीत नाही जमत सगळं..’ पा. 
‘मला माहितीये ते, म्हणून मी देव घेऊन जात होते..’ - पार्सल. 
‘आई तू चार देशात फिरतेस. कशाला न्यायचं ओझं?’ - पा. 

‘ओझं? ओझं नाहीये ते. गरज आहे माझी. तुला आठवतं आहे ना? एक दिवस पूजा करायची राहिली आणि अण्णा...’ पार्सल पुढं बोलूच शकली नाही. रडायला लागली. 

तेव्हा मला कळलं, पार्सल देवाला क्‍लोज आहे असं नाहीये. तिला देवाची भीती वाटते. कारण पा कॉलेजमध्ये असताना एक दिवस घरच्या देवांची पूजा राहिली आणि त्याच दिवशी अण्णाआजोबा ॲक्‍सिडेंटमध्ये गेले. म्हणून पार्सल एवढी हायपर होते. मला गम्मतच वाटली. देव आपल्याला प्रोटेक्‍ट करतो म्हणजे तो आपला मित्र असायला पाहिजे. मग त्याला घाबरायचं काय? आणि एक दिवस पूजा केली नाही म्हणून तो डायरेकट ॲक्‍सिडेंट करणार असेल तर अशा देवाचा उपयोग काय? 

मी रात्री तिच्या खोलीत गेले. तिच्या कुशीत शिरले आणि म्हणाले, ‘आज्जी.. मी देवाला सांगितलं आहे, रोज पूजा जमेलच असं नाही. जमेल तेव्हा करू आणि तुला ते मान्य नसेल तर तू आमचा मित्र नाहीस. तू दुसरीकडं जाऊ शकतोस. तो ओके म्हणालाय. तू त्याला घाबरू नकोस. तो चिल आहे.’ पार्सलनं एकदम मोठा हुंदका दिला आणि हसायला लागली. मला घट्ट जवळ घेऊन माझी पापी घेतली. ती कधी असं करत नाही. पण बहुतेक तिला पटलं माझं. 

खरंतर मी कुठल्या देवाबिवाला असं काही सांगितलंच नव्हतं. कारण सोपं आहे. देव नसेल तर कुणाला काही सांगून फायदा नाही आणि असेल, आणि तो जर एवढा भारी असेल तर त्याला हे काही सांगायची गरजच नाही. इतकं बेसिक लॉजिक मला कळतं आहे, तर त्याला कळतच असणार की! पण पार्सलला कळेल की नाही मला माहीत नव्हतं. म्हणून मी तिला सांगितलं असं. ती चिल होऊन झोपली. आता मी पण झोपते. ओके बाय गुडनाईट...

संबंधित बातम्या